दंतेवाडामध्ये झाली देशातील सर्वात मोठी नक्षलवादी कारवाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

छत्तीसगडमधील दंतेवाडा-नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. पोलिसांशी झालेल्या चकमकीत आतापर्यंत ३० नक्षलवादी ठार झाले आहेत. यापैकी ७ जणांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. अजूनही चकमक सुरूच आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे.

अबुझमद भागात ही चकमक
मिळालेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या नक्षलवाद्यांकडून जवानांनी मोठ्या प्रमाणात स्वयंचलित शस्त्रेही जप्त केली आहेत. नक्षलवाद्यांकडून एके ४७ ही जप्त करण्यात आली आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे. ऑपरेशनमध्ये सहभागी सर्व जवान सुरक्षित आहेत. चकमकीची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, जिल्ह्यातील अबुझमद भागात ही चकमक झाली.

ते म्हणाले की, नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या अबुझमद भागात माओवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यावर नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांतील सुरक्षा दलांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानासाठी पाठवण्यात आले होते. दुपारी एकच्या सुमारास नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलांनी आतापर्यंत सात नक्षलवाद्यांचे मृतदेह, एके ४७ आणि एसएलआर आणि इतर अनेक शस्त्रे जप्त केली आहेत. या चकमकीत सर्व जवान सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अबुझमदमध्ये २ तास गोळीबार सुरू होता. यानंतर गोळीबार पूर्णपणे थांबल्यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. शोध मोहीम राबवली असता नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. नक्षलवाद्यांकडून स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. एक दिवस आधी सुरक्षा दलांना नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यातून नक्षलवाद्यांची माहिती मिळाली होती, त्यानंतर जवानांना नक्षल ऑपरेशनवर पाठवण्यात आले होते.

सीएम विष्णुदेव साईही बस्तर दौऱ्यावर
सीएम विष्णुदेव साईही शुक्रवारी बस्तर दौऱ्यावर आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत विधानसभा अध्यक्ष रमण सिंह आणि वनमंत्री केदार कश्यपही उपस्थित होते. दंतेवाड्यात मुख्यमंत्र्यांनी अनेक भेटवस्तू दिल्या होत्या. दंतेवाडा येथे पोहोचताच सीएम विष्णुदेव यांनी त्यांच्यासोबत माँ दंतेश्वरीचे दर्शन घेतले.