वर्षभरात भारत होणार नक्षलमुक्त - गृहमंत्री शहा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 7 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

केंद्र सरकारच्या नक्षलवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. गुरुवारी (दि. २० ) छत्तीसगडच्या विजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दलांनी २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीत एक जवानही शहीद झाला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या मोहिमेबद्दल माहिती दिली. तसेच वर्षभरात म्हणजे पुढच्या वर्षी ३१ मार्चपर्यंत देश नक्षलमुक्त होणार असल्याची त्यांनी घोषणा केली. 

नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी ७ वाजल्यापासून छत्तीसगडच्या गांगलूर पीएस हद्दीजवळील विजापूर-दंतेवाडा सीमेवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. दोन्ही बाजूंनी बेच्छूट गोळीबार झाला, ज्यात सुरक्षा दलांनी चकमकीत २२ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. चकमकीनंतर सुरक्षा दलाने २२ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त केली. दुःखद बाब म्हणजे, या चकमकीत विजापूर डीआरजीचा १ जवान शहीद झाला आहे. 

अमित शाह यांची प्रतिक्रिया 
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा दलांला मिळालेल्या या यशाबद्दल 'एक्स'वर जवानांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, "नक्षलमुक्त भारत मोहिमेच्या दिशेने आज आपल्या जवानांनी आणखी एक मोठे यश मिळवले आहे. छत्तीसगडच्या विजापूर आणि कांकेरमध्ये आमच्या सुरक्षा दलांनी दोन वेगवेगळ्या ऑपरेशनमध्ये २२ नक्षलवादी ठार केले. मोदी सरकार नक्षलवाद्यांविरोधात 'झिरो टॉलरन्स' ठेवून पुढे जात आहे. भारत देश पुढील वर्षी ३१ मार्चपूर्वी नक्षलमुक्त होईल."

छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी दोन दिवसांपूर्वीच अमित शहा यांची भेट घेऊन राज्यातील नक्षलविरोधी मोहीमेविषयी चर्चा केली होती. राज्यातील नक्षलवाद शेवटचे आचके देत असून त्याच्या खात्म्यासाठी सरकार निर्णायक पावले उचलत असल्याची चर्चा या बैठकीत झाली होती.