छत्तीसगडमध्ये सोमवारी नक्षलवादी आणि जवान यांच्यामध्ये चकमक झाली. यामध्ये आतापर्यंत एकूण १९ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय, मोठ्या प्रमाणात शस्त्रे देखील जप्त करण्यात आले आहेत.
सोमवारी (दि.२०) सकाळपासून कुल्हाडीघाटच्या भालुदिघी टेकड्यांवर सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, चकमकीनंतर करण्यात आलेल्या शोध मोहिमेदरम्यान, दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले, त्यापैकी एक महिला आहे. तर काल (दि.२१) सकाळी सुरक्षा दलाच्या जवानांना १९ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. घटनास्थळावरून अनेक स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
सध्या उडालेल्या या चकमकीत नक्षल चळवळीला मोठा झटका बसला आहे. या चकमकीत मोठे कॅडरचे नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चकमकीत ओडिशा राज्य नक्षलवादी प्रमुख जयराम उर्फ चलपती याचा सुद्धा सुरक्षा दलाने खात्मा केल्याचे सांगण्यात येत आहे. चलपती याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस होते. तसेच, या चकमकीत सीसीएम मनोज आणि गुड्डू यांच्या सुद्धा मृत्यू झाला आहे.
सोमवारी झालेल्या चकमकीनंतर सर्च ऑपरेशनसाठी E३०, कोबरा २०७, सीआरपीएफ ६५ आणि २११ बटालियन, एसओजी नुआपाडा यांचे संयुक्त पथक रवाना झाले. आतापर्यंत १९ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळाले आहेत. आजही सर्च ऑपरेशन सुरूच राहणार आहे. सर्च ऑपरेशन संपल्यानंतर कारवाईबाबत सविस्तर माहिती दिली जाईल.