देशाचा संविधानावर आणि लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अतूट - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 2 d ago
'मन की बात'द्वारे संवाद साधताना पंतप्रधान मोदी
'मन की बात'द्वारे संवाद साधताना पंतप्रधान मोदी

 

लोकसभा निवडणुकीत देशातल्या मतदारांनी संविधान आणि लोकशाही व्यवस्थेवरच्या अढळ विश्वासाचं दर्शन घडवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे अकराव्या भागात ते काल बोलत होते. जगातली सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणूक यशस्वीपणे पार पडल्याबद्दल त्यांनी निवडणूक यंत्रणा आणि मतदारांचं अभिनंदन केलं तसंच देशवासीयांचे आभार मानले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे(एनडीए) केंद्रात तिसऱ्यांदा सरकार सत्तेत आल्यानंतर मोदी यांचा हा ‘मन की बात'चा पहिलाच कार्यक्रम होता.

यावेळी  ‘टी-२०’ विश्‍व करंडक जिंकणाऱ्या भारतीय संघास शुभेच्छा देताना मोदी यांनी ऑलिंपिक स्पर्धांमध्येही भारतीय खेळाडू नक्कीच सरस कामगिरी करतील, असा विश्वास व्यक्त केला. टोकियोमधील प्रशंसनीय कामगिरीनंतर खेळाडूंचे समर्पण आणि तयारी लक्षात घेत भारतीय क्रीडापटूंच्या पुन्हा एकदा जागतिक मंचावर चमकण्याच्या क्षमतेवर पंतप्रधानांनी विश्वास दर्शवला.

पर्यावरण बदलामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. अशा स्थितीत धरणी मातेला वाचविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने एक झाड अवश्य लावावे, असे आवाहन त्यांनी या कार्यक्रमात केले. ते  म्हणाले की, 'मी सर्व देशवासीयांना, जगातील सर्व देशांतील लोकांना त्यांच्या आईसोबत किंवा तिच्या नावाने एक झाड लावण्याचे आवाहन केले आहे. आईच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करण्याची मोहीम झपाट्याने सुरू आहे हे पाहून मला खूप आनंद झाला आहे.'

'वॉकल फॉर लोकल'विषयी पंतप्रधान मोदी म्हणाले की, अनेक भारतीय उत्पादने आहेत ज्यांना जगभरात मोठी मागणी आहे आणि जेव्हा आपण स्थानिक भारतीय उत्पादनांना जागतिक स्तरावर जाताना पाहतो तेव्हा अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. असेच एक उत्पादन म्हणजे अराकू कॉफी. आंध्र प्रदेशातील अल्लुरी सीता रामा राजू जिल्ह्यात या कॉफीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. सुमारे दीड लाख आदिवासी कुटुंबे याची लागवड करत आहेत.

जगभरात भारतीय संस्कृती गौरवली जात असल्याचं सांगताना त्याबाबतची अनेक उदाहरणं प्रधानमंत्र्यांनी मन की बात या कार्यक्रमात दिली. दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन जगभरात जल्लोषात साजरा झाल्याचं सांगून प्रधानमंत्र्यांनी, दरवर्षी योगदिनाचे कार्यक्रम नवनवे विक्रम प्रस्थापित करत असल्याचं नमूद केलं. लवकरच सुरु होणार असलेली जगन्नाथ यात्रा, तसंच अमरनाथ यात्रा आणि पंढरपूरच्या वारीत सहभागी होणाऱ्या भाविकांना प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.