पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या फ्रान्स दौऱ्यावर आहेत. मंगळवारी (दि.१२) रात्री त्यांचे राजधानी पॅरीसला जोरदार स्वागत झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी AI समिटमध्ये भाषण केले. तसंच द्वीपक्षीय चर्चाही त्यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मार्सिलो या ऐतिहासिक शहराचाही दौरा करणार आहेत.
AI समिटला संबोधित करताना मोदी म्हणाले, "कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही या शतकामध्ये मानवतेसाठीचा कोड लिहू लागली असून 'एआय'च्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी भारताकडे मोठी बौद्धिक क्षमता आहे. आम्ही या क्षेत्रात केलेल्या कामाचे अनुभव इतरांना सांगायला तयार आहोत. 'एआय'मध्ये जगाला बदलण्याची ताकद असून समाज आणि सुरक्षेसाठी ही अत्यावश्यक बाब आहे."
'एआय'चे फायदे जगासमोर मांडताना त्यांनी सायबर सुरक्षेच्या अनुषंगाने असलेला धोका, दिशाभूल करणाऱ्या माहितीचा सर्वाधिक वेगाने होणारा प्रसार आणि आणि 'डीपफेक' बद्दल चिंता व्यक्त केली पंतप्रधान मोदींनी चर्चा केली. या नव्या क्रांतीचा फायदा घ्यायचा असेल तर आपल्याला या सगळ्याच बाबींवर अधिक गांभीयनि काम करावे लागेल असेही ते म्हणाले. या संमेलनामध्ये जगभरातील विविध देशांचे नेते सहभागी झाले आहेत. यावेळी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन हे देखील उपस्थित होते. पॅरिसमधील एआय कृती परिषदेचा भारत हा सहअध्यक्ष आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की अत्यंत कमी आर्थिक गुंतवणुकीमध्ये भारताने डिजिटल पायाभूत सेवांचा विकास केला आहे. डेटाच्या क्षेत्रामध्ये आम्ही सक्षम झालो असून ही डेटा पॉवर अनलॉक करण्यात आम्हाला यश आले आहे. आमची हीच दृष्टी भारताच्या राष्ट्रीय 'एआय मिशन'चा पाया आहे. 'एआय'मुळे लाखो लोकांच्या जीवनामध्ये बदल घडून येतो आहे. कालानुरूप रोजगाराच्या स्वरूपामध्येही बदल होताना दिसतो.
या क्रांतीमुळे नव्या रोजगारनिर्मितीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे या आव्हानावर देखील आपल्याला लक्ष केंद्रित करावे लागेल. आतापर्यंतचा इतिहास लक्षात घेतला तर तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जात नसल्याचे दिसून येते. आताही 'एआय' मुळे नोकऱ्यांच्या नव्या संधी निर्माण होतील.
वैश्विक दृष्टिकोनाचा पुरस्कार
'एआय'च्या नियंत्रणाबाबत पंतप्रधानांनी वैश्विक दृष्टिकोनाचा पुरस्कार केला. यासाठीचे नियम आणि मानके सर्वांनी एकत्र येऊन निश्चित करायला हवीत. या नव्या नियमावलीच्या माध्यमातून केवळ जोखीमच कमी होता कामा नये तर संशोधनाला चालना मिळावी आणि सर्वांना समान प्रमाणामध्ये त्याचे लाभ उपलब्ध होणे गरजेचे आहे असे ते म्हणाले. एआय कृषी आणि पर्यावरण संवर्धनाच्या आघाडीवर मोठे स्थित्यंतर घडवून आणू शकते त्यामुळे चिरंतन विकास ध्येये गाठण्यासाठीचा आपला प्रवास हा अधिक सुलभ आणि वेगवान होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.