देश हिताला उपकारक असतील तर नवे विचार स्वीकारण्यास आणि जुने सोडून देण्यास मी नेहमीच तयार असतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. समस्यांना तोंड देऊ शकतील अशा माणसांची निवड करण्यातच माझे यश असल्याचेही मोदी यांनी त्यांच्या पहिल्या पॉडकास्ट मुलाखतीच्या माध्यमातून सांगितले.
'झिरोधा' या कंपनीचे सहसंस्थापक निखिल कामथ यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला. मोदी म्हणाले, "पक्ष कोणताही असो, महिलांनी आणि तरुणांनी मोठ्या संख्येने राजकारणात सहभागी व्हायला हवे. त्यांनी राजकीय क्षेत्राबद्दल अजिबात आकस ठेवू नये. चांगल्या व्यक्तींची राजकीय क्षेत्राला आवश्यकता आहे." राजकारणात प्रवेश करताना व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा न बाळगता लोककल्याणाचे व्रत म्हणून राजकारणात यावे, असे आवाहनही मोदी यांनी यावेळी केले.
या पॉडकास्टमध्ये मोदी यांनी त्यांच्या खासगी जीवनासह राजकीय जीवन आणि आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयांवरही चर्चा केली. लोकांमध्ये प्रचंड क्षमता असल्याचे मला जाणवते. मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आणि आताही भविष्यातील कामगिरीसाठी माणसांची निवड करतो. यातच माझे यश असल्याचे मला वाटते, असेही मोदी म्हणाले, 'जुने विचार सोडून देण्याची आणि नवे विचार स्वीकारण्याची वेळ आल्यास, त्यासाठी माझी तयारी आहे; मात्र नवे विचार देशहिताला पूरक असावेत, अशी माझी अट आहे,' असे मोदींनी सांगितले.
सामान्य विद्यार्थी होतो
शालेय जीवनाबद्दल बोलताना, पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी शाळेत असताना सामान्य विद्यार्थी होतो. शैक्षणिक अभ्यासक्रमात रमण्यापेक्षा मी अभ्यासेतर गोष्टींमध्ये अधिक रस घेत असे. मात्र बिरजी भाई चौधरी या माझ्या शिक्षकांना माझ्याबद्दल आत्मीयता होती. त्यामुळेच त्यांनी माझ्या वडिलांना भेटून माझ्याबद्दल चर्चा केली होती." आपल्याला 'अरे-तुरे' करणारे कोणी उरलेले नाही, अशी खंतही मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.
'मेलोडी' मीम्सवरून मजेशीर प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दल समाज माध्यमांत व्हायरल होणाऱ्या मीम्सबाबत पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदाच उघडपणे प्रतिक्रिया दिली. "अशा गोष्टी कायम सुरूच राहतात, मात्र मी अशा गोष्टींकडे डे लक्ष देऊन माझा वेळ वाया घालवत नाही," असे ते म्हणाले.
'माझ्याकडूनही चुका शक्य'
माझ्याकडून कदाचित चुका होऊ शकतील, मात्र युष्ट हेतूने मी कोणतीही गोष्ट करणार नाही हा आपल्या जीवनाचा मंत्र असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. ते म्हणाले, "मी गुजरातचा मुख्यमंत्री बनलो होतो, तेव्हाच मी जनतेसाठी प्रचंड कष्ट करण्याचे ठरविले. मी देखील माणूस आहे, माझ्याकडूनही चुका होऊ शकतात. मात्र, त्यामागे दुष्ट हेतू नसावा."