भेदभाव दूर करण्यासाठी धर्मनिरपेक्ष नागरी संहिता आवश्यक - पंतप्रधान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 20 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (३१ ऑक्टोबर)  सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे आदरांजली वाहिली. राज्यातील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगरजवळील पटेल यांना समर्पित असलेल्या जगातील सर्वात उंच पुतळ्यावर पोहोचून त्यांनी भारताच्या लोहपुरुषाला आदरांजली वाहिली.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आयोजित 'राष्ट्रीय एकता दिवस' परेडमध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रीय सुरक्षा रक्षकांच्या (NSG) चमूला सलामी दिली. यावेळी उपस्थितांना  पंतप्रधान मोदींनी एकतेची शपथही दिली. या परेडमध्ये नऊ राज्यांचे, एक केंद्रशासित प्रदेशाचे पोलिस, चार केंद्रीय सशस्त्र पोलिस दल, NCC आणि एका बँडसह १६ मार्चिंग तुकड्यांचा समावेश होता.

यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  'एक राष्ट्र, एक निवडणूक' आणि 'एक राष्ट्र, एक नागरी संहिता'सोबतच राष्ट्रीय सामाजिक एकतेसाठी आपल्या वचनबद्धतेवर जोर दिला. भेदभाव दूर करण्यासाठी धर्मनिरपेक्ष नागरी संहिता आवश्यक आहे, असा युक्तिवाद त्यांनी यावेळी केला. 

गुजरातच्या केवडिया येथे राष्ट्रीय एकता दिनाच्या परेडला संबोधित करताना  पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमधील घटनात्मक बदल, विशेषत: कलम ३७० रद्द करण्यावर प्रकाश टाकला. मोदींनी नमूद केले की ७० वर्षांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेची तत्त्वे देशातपूर्णपणे लागू झाली नाहीत. ते म्हणाले, “कलम ३७० हे एका भिंतीसारखे होते. ते आपल्या राज्यघटनेच्या अंमलबजावणीत अडथळा आणत होते,” असे सांगून ते म्हणाले की, कलम आता “कायमचे गाडले गेले आहे.”

जम्मू काश्मीर येथे नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी अधोरेखित केले की जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांनी प्रथमच भारतीय संविधानावर शपथ घेतली आहे. पंतप्रधान मोदींनी सरदार वल्लभभाई पटेल यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहताना, भारताची एकता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्याच्या त्यांच्या समर्पणाची प्रशंसा करताना हे वक्तव्य केले.

“आज आपण सर्वजण वन नेशन आयडेंटिटी – आधारचे यश पाहत आहोत आणि जग त्यावर चर्चाही करत आहे. यापूर्वी, भारतात वेगवेगळ्या करप्रणाली होत्या, परंतु आम्ही एक राष्ट्र एक कर प्रणाली – जीएसटी तयार केली. वन नेशन वन पॉवर ग्रीडने आम्ही देशाचे ऊर्जा क्षेत्र मजबूत केले. वन नेशन वन रेशन कार्डद्वारे गरिबांना उपलब्ध असलेल्या सुविधा आम्ही एकत्रित केल्या आहेत. आम्ही आयुष्मान भारतच्या रूपाने देशातील लोकांना वन नेशन वन हेल्थ इन्शुरन्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे,” असे पंतप्रधान म्हणाले.

“देशातील एकतेसाठी आम्ही आता वन नेशन वन इलेक्शनच्या दिशेने काम करत आहोत. यामुळे भारताची लोकशाही बळकट होईल. भारताच्या संसाधनांचा सर्वोत्तम परिणाम पाहायला मिळेल. यामुळे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी नवीन गती मिळेल." ते पुढे म्हणाले,  "आज भारत धर्मनिरपेक्ष नागरी संहितेकडे म्हणजेच एक राष्ट्र एक नागरी संहितेकडे वाटचाल करत आहे.”