पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. दरम्यान मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांनी मंगळवारी (दि.११) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या देशाचा सर्वोच्च पुरस्कार ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ देण्याची घोषणा केली. मॉरिशसचा हा सर्वोच्च पुरस्कार मिळवणारे पंतप्रधान मोदी हे पहिले भारतीय ठरले आहेत.
पोर्ट लुईस येथे झालेल्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच रामगुलाम यांनी ही घोषणा केली. यानंतर मॉरिशसच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी रामगुलाम यांचे आभार मानले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, "मी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलाम यांचा निर्णय नम्रतेने स्वीकारला आहे."
मॉरिशसच्या प्रमुखांची भेट घेतल्यानंतर पीएम मोदींनी सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, "राष्ट्रपती धरमबीर गोखुळ यांच्यासोबत खूप चांगली भेट झाली. त्यांना भारताची आणि भारतीय संस्कृतीची चांगलीच ओळख आहे. मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात सहभागी होण्यासाठी मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार. आम्ही विविध क्षेत्रात द्विपक्षीय संबंधांना अधिक प्रोत्साहन देण्याच्या मार्गांवर चर्चा केली."
दुसऱ्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हटले आहे की, "मॉरिशसच्या स्टेट हाऊसमध्ये आयुर्वेदिक उद्यान तयार केले गेले हे कौतुकास्पद आहे. मॉरिशसमध्ये आयुर्वेदाची लोकप्रियता वाढत आहे, याचाही मला आनंद आहे. अध्यक्ष धर्मबीर गोखुळ आणि मी आयुर्वेदिक गार्डनला भेट दिली. मला आनंद आहे की मला ते प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली."