"काही देशविरोधी शक्ती त्यांच्या स्वार्थासाठी आपल्या देशात दुही माजविण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे याचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण एक व्हायला हवे आणि या देशविरोधी शक्तींना पराभूत करायला हवे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी केले.
गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील वडताल येथील स्वामीनारायण मंदिराच्या २०० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्यांनी व्हर्चुअल पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधला.
"आपला देश २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र होण्यासाठी देशवासीयंमध्ये एकता आणि देशाची अखंडता महत्त्वाची आहे, परंतु, दुर्दैवाने काही लोक आपल्या समाजात जात, धर्म, भाषा, लिंगभाव, शहरी-ग्रामीण अशी फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, यामागे त्यांची संकुचित मानसिकता आणि त्यांचे छुपे व स्वार्थी हेतू आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताला विकसित राष्ट्र बनवण्याची महत्त्वपूर्ण पायरी म्हणजे आत्मनिर्भरता, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदी यांनी केले. स्वामी नारायण मंदिराशी निगडित असणाऱ्या सर्व साधू-संतांनी देशातील प्रत्येक नागरिकाला देश विकसित करण्याच्या कार्यात जोडावे, आवाहन मोदी यांनी यावेळी केले.
पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
जगभरातील तील नेते जेव्हा मला भेटतात तेव्हा भारतीय युवकांनी त्यांच्या देशात काम करावे अशी इच्छा व्यक्त करतात
भारतीय युवक आपल्या देशाप्रमाणेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अपेक्षांची पुर्तता करत आहेत
स्वामी नारायण मंदिरातील साधकांनी आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी परदेशातून जे भाविक येतील त्यांना या मेळ्याचे आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगावे
जगभरात स्वामी नारायण मंदिरे आहेत, या मंदिरांनी आपापल्या देशांतून किमान शंभर नागरिकांना भारतात कुंभ मेळ्यासाठी पाठवावे