वनराई संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, जमाअत-ए-इस्लामी हिंदचे महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही, जावेद पाशा, माजी खासदार कृपाल तुमाने. (फोटो डावीकडून)
भारतात हिंदू-मुस्लीम सहजीवनाचा हजारो वर्षांचा इतिहास आहे. दोन्ही समाजातील लोकांच्या शांततामय सहजीवनातून भारतात 'गंगा-जमनी'संस्कृती आकाराला आली. दोन्ही समाजांनी इथल्या साहित्य-संस्कृती-अध्यात्म आणि अशा सर्वच क्षेत्रात इतकं भरभरून योगदान दिलं आणि त्याने देशाची संस्कृती अधिक समृद्ध झाली. दोन्ही समाजाचे असे सौहार्दपूर्ण संबंध असले तरी काही वेळा अपवादात्मक एखादी हिंसक किंवा तणावपूर्ण घटना घडते ज्याला हिंदू मुस्लीम दंगल असं म्हटलं जातं, आणि संपूर्ण समाजजीवन ढवळून निघते.
असेच काहीचे महाराष्ट्रातील नागपूर येथे घडले. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राची उप-राजधानी आणि सर्वार्थाने शांततापूर्ण शहर म्हणून ओळख असलेल्या नागपूरमध्ये हिंदू-मुस्लीम दंगल झाली. राज्यात आणि देशात कितीही तणावाची परिस्थिती असली तरी इथे आजवर धार्मिक दंगल उसळली नव्हती. १९९२मध्ये बाबरी विध्वंसानंतरही हे शहर शांतच होते. त्यामुळे नुकत्याच झालेल्या दंगलीमुळे नागपूरकरांसोबतच संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला.
पोलिसांनी प्रसंगावधान राखत काही तासांतच दंगलीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे नागपूरच्या एका भागात झालेली दंगल शहरात इतरत्र पसरली नाही. रमजानच्या पवित्र महिन्यात दंगल काही तासांतच आटोक्यात आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला आणि पोलिसांचे आभार मांडले. अकरा पैकी नऊ ठिकाणी संचारबंदी आता शिथिलही करण्यात आली आहे. या दंगलीमुळे सामान्य शांतताप्रेमी नागरिक आणि कार्यकर्ते हादरून गेले असले तरी लगेच कंबर कसत परिसरातील दोन्ही समाजात सौहार्द आणि विश्वासाचे नाते पुन्हा पूर्ववत व्हावेत यासाठी हिंदू आणि मुस्लीम समाजातील मंडळी पुढे आली आहेत.
'फेडरेशन ऑफ आर्गनायझेशन्स फॉर सोशल जस्टिस, सेक्युलॅरिझम ॲण्ड डेमोक्रसी'चे आवाहन
नागपूर शहराला सामाजिक सौहार्दाचा इतिहास आहे. इथे सर्व धर्माचे अनुयायी वर्षानुवर्षे गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. नागपूरमध्ये उद्भवलेल्या दोन गटातील तणावाच्या पार्श्वभूमीवरही नागरिकांनी सौहार्द्र आणि शांतता पाळावी, असे आवाहन फेडरेशन ऑफ आर्गनायझेशन्स फॉर सोशल जस्टिस, सेक्युलॅरिझम ॲण्ड डेमोक्रसीच्या सदस्यांनी केले. राज्यात आणि नागपूर शहरात धर्मनिरपेक्षता आणि लोकशाही मुल्ये रुजवण्यासाठी ही संस्था विशेष उपक्रम राबवते.
छत्रपती शिवाजी महाराजांनीही अफजलखानाच्या वधानंतर त्याचे अंत्यसंस्कार सन्मानपूर्वक करण्याचे आदेश दिले होते. असा शत्रूचाही सन्मान करण्याची आपली परंपरा असताना औरंगजेबावरून समाजात अशांतता निर्माण होणे चुकीचे आहे. नागपूरमध्ये गंगाजमनी संस्कृती नांदते. इथे असे तणाव निर्माण होऊ नयेत. आमच्या फेडरेशनच्यावतीने आम्ही नागरिकांना शांततेसाठी आवाहन करतो आणि शांतता नांदावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे संस्थेच्या अमिताभ पावडे यांनी म्हटले.
पांढरे झेंडे लावणार
संस्थेचे सदस्य जगजितसिंग यांनी यावेळी अनोखा उपक्रमाची माहिती दिली. ते म्हणाले, "नागपूरमध्ये सामाजिक सौहार्द नांदावे, द्वेषाचे राजकारण होऊ नये, यासाठी आमचे फेडरेशन प्रयत्न करणार आहे. इथले सामाजिक सौहार्द्र कायम राहावे, यासाठी आम्ही सारे सदस्य आपापल्या घरांवर व गाड्यांवर पांढरे झेंडे लावणार आहोत व नागरिकांनाही त्यासाठी आवाहन करणार आहोत."
१९६७ नंतर पहिल्यांदाच दंगलीची घटना
१९६७ नंतर नागपूरमध्ये प्रथमच अशी घटना घडली आहे. अशा राजकारणामध्ये सामान्य नागरिक निष्कारण भरडले जातात. समाज चुकीच्या मार्गाने चालला आहे. अशा घटना थांबल्या पाहिजेत. आम्ही फेडरेशनच्या वतीने शांततेचे आवाहन करतो, असे मत विजय बारसे यांनी मांडले. सध्याच्या तणावाच्या परिस्थितीत शांती स्थापन होण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. अशा वेळी कोणतेही वक्तव्य काळजीपूर्वक करणे, ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, असे मत अभ्यासक यशवंत तेलंग यांनी मांडले.
सर्व नागरिकांना समान अधिकार
संविधानाने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आहेत. सारे भारतीय एकमेकांचे बांधव आहेत, ही शिकवण आपल्याला संविधानाने दिली आहे. देश एकसंध ठेवणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. आम्हाला शांतीचा मार्ग मान्य असून सगळ्यांनी शांतता राखावी, असे आवाहन आम्ही फेडरेशनच्या माध्यमातून करतो, असे मत नागपुरातील सामाजिक कार्यकर्ते गौतम कांबळे म्हणाले.
प्रशासनाने योग्य भूमिका घ्यावी
डॉ. अन्वर सिद्दीकी शहरातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी यावेळी आपली भावना बोलून दाखवली. ते म्हणाले, "अफवांमुळे परिस्थिती चिघळणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. द्वेषाचे बी रोवले तर त्या झाडाला द्वेषाचीच फळे येतील, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावे. प्रशासनानेही या परिस्थितीत योग्य आणि न्याय भूमिका घ्यावी."
नागपूर हे मानवतेचे शहर
नागपूर हे मानवतेचे शहर आहे. या नगरीला शांततेची परंपरा आहे. कोरोना काळातही या शहराने सामाजिक सौहार्दाचे उदाहरण घालून दिले. सध्या परीक्षांचा काळ सुरू असून यावेळी अशा घटना घडणे अत्यंत चुकीचे आहे. नागपूरची सौहार्द्राची परंपरा कायम राहावी व सद्भावनेचा विचार लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी आम्हा सर्वधर्म प्रार्थनेचे आयोजन करणार आहोत आणि पोलिसांनीही यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करणार आहोत, असे ज्ञानेश्वर रक्षक म्हणाले.
संविधानाने समता शिकविली
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी आणि संविधानाने आपल्याला समता शिकविली आहे. अशा घटना महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहेत, समाजासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. ते आपण सोडवले पाहिजेत. प्रत्येकाने संविधानाची प्रत हातात घेऊन कार्य करावे, म्हणजे आपल्याला सामाजिक समरसता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही या मूल्यांचा विसर पडणार नाही. आम्ही फेडरेशनच्या वतीने पांढरे झेंडे हातात घेऊन समाजाला शांतीचे आवाहन करणार आहोत, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. त्रिलोक हजारे यांनी सांगितले.
संयम राखत सामाजिक सौहार्द जपलेच पाहिजे
सर्वधर्म समभावाचे प्रतीक म्हणून राज्याच्या उपराजधानीकडे बघितले जाते. सण-उत्सव साजरी करणारी नगरी म्हणून नागपूरची ओळख आहे. येथील सामाजिक सलोख्याला बट्टा लागणार नाही, असेच आपले वर्तन असले पाहिजे. त्यामुळे प्रत्येकाने संयम राखत सामाजिक सौहार्द जपलेच पाहिजे. सध्या जी काही तणावसदृश स्थिती निर्माण झाली आहे, ती तातडीने आटोक्यात यावी, अशी सदिच्छा नागपूरमधील वनराई संस्थेचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी यांनी व्यक्त केली.
एकता आणि सलोखा जपावा
नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात निर्माण झालेली तणावाची स्थिती दुर्दैवी आहे. एकता आणि सलोखा म्हणजे नागपूरचा महाल परिसर. या भागात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने व एकोप्याने नांदतात. हीच परंपरा कायम राहावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सामंजस्याची भूमिका घेऊन शांतता कायम ठेवावी. पोलिस आणि स्थानिक प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करावे, असे आवाहन शिंदे गटाचे माजी खासदार कृपाल तुमाने यांनी केले आहे.
भयग्रस्तांना भयमुक्त करावे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर शहराला आपले कार्यक्षेत्र समजायचे. १९६७ दरम्यान नागपुरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती तेव्हा रुग्णशय्येवर असूनही राष्ट्रसंतांनी गुरुकुंज आश्रमात सर्व धर्माच्या धर्मगुरूंना बोलावून मानवता धर्माचे पालन करण्याचे आवाहन केले होते. खोट्या प्रचाराने, अफवेने सर्वसामान्य लोकांच्या मनात द्वेषाची भावना निर्माण होते. अफवांना बळी पडू नका. सर्व धर्माच्या धर्मगुरूंनी, मुख्य कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन एकात्मतेची सामुदायिक प्रार्थना घेऊन शांतीमार्च काढून भयग्रस्तांना भयमुक्त करावे ,असे आवाहन गुरुदेव युवा मंचचे प्रवर्तक ज्ञानेश्वर दुर्गादास रक्षक यांनी केले आहे.
नागपूरचा इतिहास अत्यंत संयमी व शांतताप्रिय
महाराष्ट्राला पुरोगामी वारसा आहे. सर्व जाती-धर्माची संस्कृती येथे जपली जाते. आपण सर्व संविधानाला मानणारे लोक आहोत. नागपुरात अशी घटना घडणे अतिशय निंदनीय आहे. नागपूरचा इतिहास अत्यंत संयमी व शांतताप्रिय आहे. आजही तो संयम व शांतता नागपुरात असावी. सर्वांनी शांतता राखा. अफवांना बळी पडू नका, असे आवाहन माजी नगरसेविका दर्शनी धवड केली आहे.
घटनेचे समर्थन नाही मात्र चिकित्सा व्हावी
प्रा. जावेदपाशा कुरेशी महाराष्ट्रातील महत्त्वाचे मुस्लीम विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. गेल्या तीन दशकांहून अधिक काळापासून ते सामाजिक कार्यात आहेत. पुढील महिन्यात होणाऱ्या मुस्लीम मराठी साहित्य संमेलनाचे ते निमंत्रक आहेत. नागपुरातील घटनेविषयी ते म्हणतात, "नागपूरला 60 वर्षाच्या दशकानंतर ही घटना घडलेली आहे! याचे समर्थन करताच येत नाही, मात्र चिकित्सा होने अत्यंत गरजेचे आहे!"
मुस्लीम समाजाविषयी आत्मपरीक्षण करताना ते म्हणतात, "मुस्लिम समाजाचे एक मोठे दुखणे आहे. गोळा होणारा मॉप हा कुणीतरी मोठ्या नेत्याने शिस्तबध्द पद्धतीने कॉल केलेला नसतो. त्यामुळे या गर्दीला नेतृत्व नसते. वादाचा मुद्दा काय आणि ते कसे हाताळावे, पोलिस, प्रशासनास कसे भेटावे, काय मागणी करावी याची काहीच रूपरेषा आखलेली नसते, त्यामुळे हे प्रदर्शन 'इस्लाम की खातिर' गोळा झालेल्या भावनिक लोकांचे आरडा ओरडीचे प्रदर्शन होऊन जाते! नेतृत्व कोण्या एकाकडे नसतेच. त्यामुळे इथे कोण कुठून आलाय, काय करतोय, काय करणार आहे याची माहिती कुणालाच नसते. कोण कोण घुसलेत आणि काय करणार आहेत याचीही कल्पना नसते.
.png)
शेवटी प्रा. कुरेशी म्हणतात, "रीतसर तक्रार नोंदवून अन्य मुस्लिमेतर समाज, संघटना यांना सोबत घेऊन सनदशीर मार्गाने आंदोलन करता येते ही समज मुस्लिम समाजात नसल्याने अशा गोष्टी घडतात. मुस्लिम समाजात सामाजिक चळवळ करणारे, समाजाला काय चालले आहे, काय होणार आहे याची जाणीव करून देणारे आणि कितीही वाईट पद्धतीने, धार्मिक पद्धतीने चिथावल्या गेले तरीही संवैधानिक मार्गानेच प्रतिकार आणि प्रतिरोध करण्याची शिकवण देणाऱ्या संघटना, समित्या व संपर्क साधने नसल्याने अशा घटना घडतात.आणि मुस्लिम समाज अधिक त्रासदायक स्थितीत ढकलला जातो!"
'जमाअत-ए-इस्लामी हिंद'चे विशेष आवाहन
बंधुभाव अबाधित ठेवावा, सामाजिक सौहार्द व सद्भावनेसाठी प्रशासनाला सहकार्य करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. कोणीही कायदा हाती घेऊ नये. शहरात शांतता व सामंजस्याची स्थिती निर्माण करण्यासाठी प्रत्येकाने सहिष्णुतेने वागावे, असे आवाहन जमाअत-ए-इस्लामी हिंदचे महाराष्ट्र अध्यक्ष मौलाना इलियास खान फलाही यांनी पत्रकाद्वारे केले. नागपूर शहरातील हिंसक घटनांवर त्यांनी दुःख व्यक्त केले. फलाही यांनी पत्रकात म्हटले आहे की, राज्यात सांप्रदायिक घटनांवर नियंत्रणात मिळविण्यात सरकार अपयशी ठरले. कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येकाला निष्पक्षपणे व पारदर्शकतेने काम करावे लागेल. इतिहासाला शस्त्र बनवून अशांती पसरवणे, अत्यंत चिंताजनक आहे.
आपल्या पत्रकात मौलाना इलियास खान फलाही म्हणतात, "महाराष्ट्रात सर्वधर्म समभाव जोपासला जातो. नागरिकांनी शांतता अबाधित ठेवून भडकवणाऱ्यांपासून दूर राहावे. विभाजनकारी राजकारणाला सर्वोत्तम उत्तर ‘एकता आणि संयम’ आहे. रमजान महिन्याच्या काळात शांती टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे."
शांतता कमिटी स्थापन करणार
माझ्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीतील धार्मिक तणावाची ही नागपुरातील पहिलीच घटना आहे असे मत माजी आमदार अनिस अहमद यांनी व्यक्त केले. इथले मुस्लीम केवळ शिवजयंतीतच सहभागी होत नाहीत, तर रामनवमीचेही उत्साहाने स्वागत करतात. इथला धार्मिक सौहार्द कायम राहावा यासाठी सर्वपक्षीय राजकीय कार्यकर्ते एकत्र येत शांतता कमिटी स्थापन करणार आहेत."
एकूणच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपूरमधील हजरत ताजुद्दीन बाबा यांची दर्गा सर्वधर्मियांच्या आस्थेचे ठिकाण आहे. अशी अनेक सौहार्दाची केंद्रे नागपूरमध्ये आहेत. त्यामुळे इथे हिंदू-मुस्लीम एकोप्याची मुळे घट्ट रुजली आहेत. एखादी दंगल हिंदू-मुस्लीमांमधील वीण उसवू शकत नाहीत, असा आशावाद नागपूरकर व्यक्त करताना दिसत आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter