'आयसी-८१४' विमानामध्ये माझे वडीलही होते-परराष्ट्रमंत्री जयशंकर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 4 d ago
s.jayshanakar
s.jayshanakar

 

"दहशतवाद्यांनी १९९९ मध्ये अपहरण करून कंदाहारला नेलेल्या आयसी ८१४ या विमानात माझे वडील होते आणि त्याच वेळी मी तरुण सरकारी अधिकारी म्हणून परराष्ट्र विभागात कामही करत होतो." अशी आठवण आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी आज सांगितली. अशा स्थितीत, एक नातेवाईक आणि एक सरकारी अधिकारी अशा दोन्ही पातळ्यांवर मला जबाबदारी सांभाळावी लागली होती, असे जयशंकर यांनी आज येथे एका कार्यक्रमात सांगितले.

आयसी-८१४ विमान अपहरण घटनेबाबत नुकतीच एक वेब सीरिज प्रसिद्ध झाली असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे. स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावर असलेल्या जयशंकर यांना कार्यक्रमादरम्यान एकाने याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी, मी ही वेब सीरिज पाहिलेली नसली तरी यामध्ये अपहरणाची घटना हाताळणाऱ्या सरकार आणि प्रशासनाचे चित्र फारसे चांगले दाखविण्यात आले नसल्याचे समजते, असे सांगितले. मात्र, या घटनेशी निगडित एक वैयक्तिक आठवण असल्याचे जयशंकर यांनी सांगितले. ते म्हणाले, "अपहरण झालेल्या त्या विमानात माझे वडीलही होते. त्यावेळी मी परराष्ट्र विभागात अधिकारी म्हणून ही परिस्थितीही हाताळत होतो, आणि दुसऱ्या बाजूला प्रवाशांची सुटका करण्यासाठी सरकारवर दबाव आणणान्या प्रवाशांच्या नातेवाईकांच्या गटाचाही मी एक हिस्सा होतो. वास्तविक, अपहरणाबाबत समजले तेव्हा 'मी घरी येऊ शकणार नाही.'

असे सांगण्यासाठी मी माझ्या आईशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, माझी पत्नीही नोकरी करत असल्याने मला तेव्हा फार लहान असलेल्या माझ्या मुलाला खाऊ घालण्यासाठी घरी जावे लागले. त्यावेळी मला समजले की अपहृत विमानात माझे वडीलही आहेत." मला सरकारी अधिकारी आणि नातेवाईक अशा दोन्ही बाजूंचे दृष्टिकोन समजत होते. अशा परिस्थितीत असलेला मी एकमेव व्यक्ती होतो." सुदैवाने, या घटनेत कोणाचाही मृत्यू झाला नाही, असेही जयशंकर यांनी सांगितले.

'आमचे ऐकून घेण्याचीही तयारी ठेवा'
"भारतातील राजकारणावर इतर देशांतील नेते बोलत असतील तर माझा काहीच आक्षेप नाही. पण त्या नेत्यांच्या देशातील राजकारणाबाबत मी काही बोललो, तर ते ऐकून घेण्याची तयारी ठेवा," असा इशारा जयशंकर यांनी या कार्यक्रमात दिला. काही देशांचे राजनैतिक अधिकारी काही निवडक विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी घेत असल्याबद्दल एकाने जयशंकर यांना प्रश्न विचारला, तेव्हा त्यांनी वरील उत्तर दिले.