भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाने 'सौगात-ए-मोदी' समाज उपयोगी उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचा उद्देश रमजान आणि ईदच्या काळात गरजू मुस्लिम कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा आहे. देशभरातील ३२ लाख गरीब मुस्लिम कुटुंबांना आवश्यक वस्तूंचे कीट वितरित करण्यात येणार आहे. हा उपक्रम भाजप देशपातळीवर राबवणार आहे. यामुळे देशभरातील मुस्लिम कुटुंबांना ईदी मिळणार आहे.
३२ लाख कुटुंबांपर्यंत मदतीचा हात
या उपक्रमाच्या माध्यमातून भाजपाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे ३२,००० पदाधिकारी देशभरातील ३२,००० मस्जिदींना संपर्क साधून गरजू कुटुंबांपर्यंत मदतीचा हात पोहोचवतील. या अभियानाची अधिकृत घोषणा भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केली. या वेळी भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी या उपक्रमावर सविस्तर चर्चा करून गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याची तयारी केली आहे. यामुळे रमजानच्या पवित्र काळात गरीब आणि वंचित घटकांना मदत मिळणार आहे.
'सबका साथ, सबका विकास' या तत्त्वावर आधारित उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सबका साथ, सबका विकास’चा नारा दिला आहे. या ब्रीदवाक्याप्रमाणे समाजातील प्रत्येक घटकाचा विकास होणे आवश्यक आहे.‘सौगात-ए-मोदी’ उपक्रम हाच संदेश समाजात रुजवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
या अभियानात वितरित केल्या जाणाऱ्या कीटमध्ये जीवनावश्यक वस्तू असणार आहेत. प्रत्येक किटमध्ये खजूर, सुके मेवे, साखर, शेवई, तसेच कपड्यांचे साहित्य असेल. महिलांसाठी सुटांचे कापड आणि पुरुषांसाठी कुर्ता-पायजमा दिला जाणार आहे. एका कीटची किंमत अंदाजे ५०० ते ६०० रुपये असणार आहे.
हा उपक्रम केवळ रमजान आणि ईद पुरताच मर्यादित नसणार आहे. गुड फ्रायडे, इस्टर, नवरोज आणि भारतीय नववर्ष यांसारख्या विविध सणांमध्येही या उपक्रमातून मदतीचा हात पुढे करण्यात येणार आहे. त्यामुळे हा उपक्रम केवळ मुस्लिम समाजापुरता मर्यादित न राहता इतर धर्मीय गरजू लोकांनाही लाभ देणार आहे.
दिल्लीतील निझामुद्दीन दर्गाह परिसरात मंगळवारी या मोहिमेचा अधिकृत शुभारंभ झाला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान देशभर पसरवले जाणार आहे. महाराष्ट्रातील भाजपचे कार्यकर्ते राज्य आणि जिल्हास्तरावरही या उपक्रमाचे आयोजन करून गरजूंपर्यंत मदत पोहचवणार आहेत.
या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भाजपा अल्पसंख्याक मोर्चाने आपले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना संघटित केले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला किमान १०० लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचे उद्दिष्ट दिले आहे.
अल्पसंख्याक मोर्चाचे मीडिया प्रमुख यासीर जिलानी यांनी स्पष्ट केले की, ‘सौगात-ए-मोदी’ हा फक्त मदतीचा उपक्रम नसून भाजपाच्या मुस्लिम समाजावरील कल्याणकारी योजनांचा भाग आहे. हा उपक्रम भाजपाच्या धोरणांतर्गत मुस्लिम समाजाचा विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे.