निवडणुकीत सर्वत्र चर्चा मुस्लीम मतदारांचीच

Story by  Saurabh Chandanshive | Published by  Saurabh Chandanshive • 8 Months ago
मुस्लिम मतदार
मुस्लिम मतदार

 

कॉँग्रेस मुस्लिम मतदारांचे लांगुलचालन करते, हा भारतीय जनता पक्षातर्फे वर्षानुवर्षे होणारा आरोप. लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत हा मुद्दा चर्चेला येतोच. गेल्या तिन्ही लोकसभांच्या निवडणुकात मोदीपर्व सुरु झाल्यापासून तर ध्रुवीकरणाची चर्चा केंद्रस्थानी असते. गेल्यावेळी स्मशान-कब्रस्तान वाद झाला. यावेळी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या जुन्या भाषणाचा हवाला देत संसाधनांवर हक्क कुणाचा ही चर्चा प्रथम सुरु झाली आणि गुजरातमधील आणंदच्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वोट जिहाद’चा विषय काढला. कॉँग्रेसने रिंगणात दाखल केलेल्या एका महिला उमेदवाराच्या विधानाला दिलेले ते उत्तर होते.

हिंदू मुस्लिम परस्परसंबंध ही समस्या सर्वत्र आहे का माहित नाही. सांगताही येणार नाही पण निवडणुका आल्या की हा वाद पेट घेतो हे मात्र निर्विवाद सत्य. मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात हे अभ्यासकांनी जवळपास एकमुखाने मांडलेले मत. ही मते आपल्याला मिळणार नाहीत हे भाजपचे नेतेही आता उघडपणे मान्य करतात. जे मतदान आपल्याला होणार नाही त्यावर टीका करत आपल्यांचे ध्रुवीकरण करणे सुरु होते. हिंदू मतपेढी जातीपातीचे अडथळे बाजूला सारुन एक व्हावी, असाही त्यामागचा प्रयत्न असतो. निवडणुकांचे प्रमुख टप्पे सुरु झाले की मग या विषयाला वाचा फुटते. भारतातल्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी ४६ जागी मुस्लिम मतदारांची संख्या ३० टक्क्यांवर आहे. बारामुल्ला, श्रीनगर, अनंतनाग या जम्मू काश्मिरातल्या तीन लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार ९० टक्क्यापेक्षाही जास्त आहेत.

अन्य दोन ठिकाणीही त्यांचे मतदान मोठे आहे. उत्तर प्रदेशातील १३ लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदार ३० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. बिजनौर, मुरादाबाद, अमरोहा, कैराना, मुजफ्फरनगर येथे ते जवळपास ४० टक्के इतके जास्त आहे. पश्चिम बंगालात जवळपास उत्तर प्रदेशाइतकेच ११ मतदारसंघ मुस्लिमबहुल आहेत.

मुर्शिदाबाद हा बांगलादेशाला लागून असलेला जिल्हा. मुस्लिम मतदान जवळपास ६० टक्के, लगतचे जांगीपूर दिवंगत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा मतदारसंघ. तेथेही अल्पसंख्यांक मतदारांची संख्या जास्त. मालदा दक्षिण, मालदा उत्तर येथेही ५० टक्क्यांच्या आसपास अल्पसंख्यांक मतदार. भारतातल्या आसामात घुसखोरीची समस्या. तेथे चार तर केरळात सहा मतदारसंघ ३० टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लिम असलेले. वायनाडची निवड राहुल गांधी मुस्लिम मतदानाची खात्री असल्यानेच करतात, असे मोदी म्हणतातच.

बिहारात चार, तर आंध्रप्रदेशात दोन हे मुस्लिमबहुल मतदारसंघ आहेत. लक्षव्दीप ९५ टक्के मुस्लिम मतदार असलेला भाग. ३० टक्क्यांपेक्षा मुस्लिम लोकसंख्या असलेली ही आकडेवारी २०११ च्या लोकसंख्येवर आधारलेली. २१ साली जनगणना झालेली नाही. सुमारे १६० लोकसभा मतदारसंघात १५ टक्के मुस्लिम लोकसंख्या असावी, असा अंदाज वर्तवला जातो. उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार आणि महाराष्ट्र या चार मोठ्या राज्यातून जे खासदार निवडून पाठवले जातात त्यावर मुस्लिम मतदानाचा प्रभाव असतो. कर्नाटकातही संख्या लक्षणीय असल्याने तेथेही मुस्लिम हा विषय चर्चेत असतोच.

गोष्ट महाराष्ट्रातल्या मुस्लिमांची
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत ११.५६ मुस्लिम आहेत. ते काही विशिष्ट भागात अधिक आहेत. मुंबईतल्या सहाही लोकसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांचा टक्का मोठा आहे. या शिवाय ठाणे, भिवंडी, औरंगाबाद, परभणी, लातूर, धुळे आणि अकोला या लोकसभा मतदारसंघातला मुस्लिम मतदानाचा टक्का राजकीय पक्ष विचारात घेतात. बॅ.अब्दुल रहमान अंतुले हे अल्पसंख्यांक मुस्लिम नेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते अन् नंतर खासदारही. त्यांचे सर्वपक्षीय मित्रवर्तुळ लक्षातर घेता त्यांना कुणी परके मानले नाही.

धार्मिक ध्रुवीकरणाची चर्चा महाराष्ट्रात सुरु झाली ती बॉम्बस्फोटानंतर. पण येथे उत्तर भारतासारखा विखार सार्वजनिक जीवनात दिसला नाही. आज निवडणुकीचे वातावरण असल्याने मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतील का? केले तर ते निकाल फिरवू शकतील का? अशी चर्चा सुरु झाली आहे. विद्यमान विधानसभेत जे मुस्लिम आमदार निवडून आले ते पक्षांतराच्या घडामोडींनंतर भाजपप्रणित महायुतीकडे झुकले आहेत.

राममंदिराच्या प्रतिष्ठापनेनंतर होणारी ही निवडणूक आहे. ती धार्मिक ध्रुवीकरणाच्या आधारावरच लढली जात आहे, असे महाराष्ट्रातले चित्र नाही पण मुस्लिम मतदार काय करणार, हा चर्चेतला मुद्दा तर आहेच. सरकारने राबवलेल्या योजना मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचल्या आहेत. तलाकबाबतचे वेगळे आणि महिलांना न्याय देणारे निर्णयही चर्चेत आहेत. काही ठिकाणी धार्मिक सौहार्द सणासुदीच्या काळात, निवडणुकात बिघडतो.

नेत्यांची भावना भडकवणारी भाषणे त्यामागचे कारण असते. महाराष्ट्रात तसे अपवादानेच घडते. एमआयएम, समाजवादी पक्ष येथे राजकारण करतात पण ते प्रवाहात वेगळे पडत नाहीत. यावेळी तर या महाराष्ट्रात निवडून आलेले मुस्लिम आमदार युतीकडे का गेले? त्यांच्या गरजेमुळे की त्यांच्या नेत्यांनी पक्षांतर केल्यामुळे हे पहावे लागणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत याचे प्रतिबिंब पडेलच.

मृणालीनी नानिवडेकर

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter