दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मते बजावणार निर्णयक भूमिका?

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 2 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल आणि राहुल गांधी

 

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या आणि काल ७० जागांसाठी मतदान पार पडले. यामध्ये भाजप, कॉँग्रेस आणि सत्ताधारी आम आदमी पार्टी हे तीन प्रमुख पक्ष एकमेकांसमोर निवडणूक लढवत होते. ७० जागांसाठी एकूण ६९९ उमेदवार रिंगणात होते. 

दिल्लीच्या निवडणुकीकडे अवघ्या देशचे लक्ष लागले होते. महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीमध्येही निवडणुकांचा आणि प्रचाराचा केंद्रबिंदु ठरला तो मुस्लिम समाज. राजकीय विश्लेषकांच्या मते महाराष्ट्राप्रमाणेच दिल्लीतदेखील मुस्लिम मते निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांनी मुस्लिम मतदारांना आपल्याबरोबर आणण्यासाठी प्रयत्न केले. आता मतदान झाले असून मुस्लिम मतदारांनी कोणाला त्यांच्या कौल दिला आहे ते ८ फेब्रुवारीला निकाल लागळ्यावरच समजणार आहे.

दिल्लीतील मुस्लिम बहुल विधानसभा
दिल्लीत एकूण २२ मुस्लिम बहुल विधानसभा मतदारसंघ आहेत. या २२ आणि इतर मतदारसंघातही मुस्लिम समाजाचा मोठा प्रभाव आहे. याठिकाणी मुस्लिमांची मते घेणार उमेदवार विजयी होतात. ओखला, सीलमपुर, मटिया महल, मुस्तफाबाद, आणि बल्लीमारान या प्रमुख जागा मुस्लिम मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणावर परिचित आहेत. या जागांवर बहुतांश मुस्लिम उमेदवार विधानसभा निवडणुकीत विजयी होतात. या मतदारसंघामध्ये बाबरपुर, सीमापुरी, गांधीनगर, चांदनी चौक, किराडी, सदर बाजार, जंगपुरा, आणि करावल नगर यांसारख्या मतदारसंघ मुस्लिम बहुल आहेत. याठिकाणी मुस्लिम ज्या उमेदवारला मत देतील त्या उमेदवाराच्या जिंकण्याची शक्यता जास्त असते.   

दिल्लीचा मुस्लिम वर्ग कोणासोबत? 
हा प्रश्न विचारण्याआधी आपल्याला गेल्या काही वर्षातील दिल्लीच्या मुस्लिमांसंदर्भातील घडलेल्या घटना पहाव्या लागतील. दिल्लीचा मुस्लिम वर्ग अनेक गोष्टींमुळे चर्चेत असतो. नुकतेच २०२० मध्ये उत्तर-पूर्व दिल्लीत दंगल झाली होती. तसेच कोरोना काळात तब्लीगी जमातवर विविध आरोप करण्यात आले होते. यासह दररोज मुस्लिमांशी निगडीत विविध घटना घडतात. परंतु या घटनांवर सत्ताधारी आम आदमी पार्टीने कोणतीही भूमिका घेतली नव्हती. यामुळे यंदाच्या निवडणुकीत दिल्लीचा मुस्लिम ‘आप’वर नाराज असू शकतो. असे झाल्यास विरोधातील कॉँग्रेस आणि भाजपला चांगली संधी असेल असे काही विश्लेषक सांगतात.   

मुस्लिम वर्ग हा विकासाच्या बाजूने मतदान करतो. महाराष्ट्राच्या निवडणुकीतही मुस्लिम समाजाने हे दाखवून दिले. त्यामुळे दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत मुस्लिम कोणासोबत जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.  

'एनबीटी'ने दिलेल्या अहवालात जाफराबाद परिसरातील मतदाता मोहम्मद यासिन यांच्या मताचा संदर्भ दिला आहे. त्यांनी लिहले की, 'आप'कडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही.’ ओखला विधानसभा मतदारसंघातील फरीद अहमद यांनी देखील असेच मत व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, “दिल्लीच्या मुस्लिम समुदायाकडे सत्ताधारी ‘आप’कडे जाण्याशिवाय दूसरा पर्याय नाही. केजरीवाल यांची आम आदमी पार्टिच भाजप पक्षाला थांबवू  शकतो.”  

राजधानीवर दोन टर्म ‘आप’चे वर्चस्व
राजधानी दिल्लीत सत्ता कोण स्थापन करणार याकडे सर्वत्र चर्चा सुरू आहे. प्रमुख पक्षाचे उमेदवार आम्ही सत्ता स्थापन करणार असे ठणकावून सांगत आहेत. मात्र त्यांचे भविष्य मतदाराच्या हातात आहे. दिल्लीच्या निवडणुकीत २०१५मध्ये पहिल्यांदा आम आदमी पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवले होते. त्यावेळी त्यांनी ७० मधील ६७ जागांवर विजय मिळवला होता. तर २०२०च्या निवडणुकीत आप ने ७० पैकी ६२ जागांवर विजय संपादन केला होता. तर भाजपला ८ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्याआधी दिल्लीमध्ये कॉँग्रेस पक्षाची सत्ता होती. २०१५ आणि २०२० मध्ये आम आदमी पक्षाला मुस्लिम समाजाने पाठिंबा दिला होता. त्यावेळी कॉँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. 

काल दिल्लीतील विधानसभेसाठी मतदान झाले आहे. यावेळी नागरिकांमध्ये आणि विशेषतः मुस्लिम समाजामध्ये उत्साह दिसून आला होता. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली विधानसभा निवडणुकीत एकूण ६०.४४ टक्के मतदान झाले आहे. येत्या ८ फेब्रुवारीला या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राजधानीत सत्ता कोण स्थापन करणार हे येत्या ८ तारखेला कळेलच; परंतु या निकालावर मुस्लिम मतांचा प्रभाव पडणार हे निश्चित आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter