विद्यार्थ्यांच्या दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा जवळ आली आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात. यामध्ये अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांचा समावेश असतो. यामध्ये मुस्लिम मुली या बुरखा घालून परीक्षा द्यायला येतात. यावरून काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारण सुरु आहे. यावर राज्याच्या विविध भागातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
प्रत्येक विद्यार्थ्यासाठी परीक्षा महत्वाची असते. दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा अवघ्या एका महिन्यावर आल्या आहेत. अशातच राज्याचे मत्स्यपालन आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे मुस्लिम विद्यार्थिनींबाबत अजब मागणी केली आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षेच बुराखा घालून येणाऱ्या विद्यार्थीनींना प्रवेश नको या मागणीचे पत्रदेखील मंत्री राणे यांनी दादा भुसे यांना दिले आहे.
मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालू द्या - विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार
या मागणीला राज्याच्या अनेक भागातून विरोध दर्शवला जात आहे. काही ठिकाणी या संदर्भात निदर्शने केली जात आहेत. नुकतेच औरंगाबादमधील विभागीय सचिव डॉ. वैशाली जामदार यांनी देखील या मागणीला विरोध केला आहे. त्यांनी परीक्षेच्या वेळी मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालून देण्याची मागणी केली आहे. त्यांनी हे पत्र औरंगाबाद शिक्षण मंडळ विभागाच्या केंद्रसंचालकांना लिहले आहे.
वैशाली जामदार यांनी या पत्रात लिहले आहे, “माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेब्रु/मार्च-२०२४ च्या परीक्षेस मुस्लिम विद्यार्थीनींना परीक्षेच्या वेळी बुरक्षा परिधान करुन परीक्षा देण्याबाबत परवानगी देण्यात यावी. तसेच परीक्षेच्या वेळी आवश्यकता वाटल्यास प्रकरणपरत्वे तपासणीसाठी महिला पोलिस अधिकारी किंवा महिला शिक्षक कर्मचारी यांची नेमणूक करण्यात यावी. यासंदर्भात कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या जाणार नाहीत. याची कटाक्षाने दक्षता घ्यावी.”
मंत्री दादा भुसे यांचे उत्तर
मंत्री नितेश राणे यांच्या मागणीवर आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, “कॉपीमुक्त परीक्षा हे आपल्या शिक्षण विभागाचं अभियान राहिलेलं आहे. कॉपी कुणी करणार नाही याची विभाग काळजी घेत आहे. परीक्षा केंद्रात कॅमेरे बसवलेले आहेत. पोलीस बंदोबस्त देखील आहे. पर्यवेक्षक आहेत, या सर्वांच्या माध्यमातून कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही याची विभाग काळजी घेत आहे.”
पुढे ते म्हणतात, “बुरखा घातलेला असू दे किंवा विना बुरखा घातलेला असू दे, कोणी विद्यार्थी कॉपी करणार नाही.”
नितेश राणे यांच्या मागणीला विरोध करताना काही मुस्लिम विद्यार्थ्यांनी देखील विरोध केला आहे. मुंबई विद्यापीठाचे सीनियर रिसर्च स्कॉलर शहबाज मनीयार म्हणतात, “सध्या राज्यात धक्कादायक घटना घडल्या आहेत. या महत्वाच्या विषयापासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी राणेंनी अशी विचित्र मागणी केली आहे. राणेंकडे बघितल तर ते मध्यमांमध्ये चर्चेत राहण्यासाठी अशी वक्तव्य करत असतात. परीक्षेसाठी बुरखा घालून गेल्यानंतर त्यांच्याकडे कॉपी सापडली आहे अशा घटना घडल्या नाहीत. सच्चर समितीच्या रिपोर्टनुसार मुस्लिम मुलींचे शिक्षण घेण्याचे प्रमाण मुलांपेक्षा कमी आहे. मुस्लिम विद्यार्थिनींना बुरखा घालून सुरक्षित वाटत असले किंवा त्या शिक्षण घेत असतील तर समाजाच्या दृष्टीने ही सकारात्मक गोष्ट आहे.”
पुढे ते म्हणतात, “काही दिवसांपूर्वी मुंबईतील एका कॉलेज ने विद्यार्थिनींना बुरखा, जीन्स टॉप घालून येण्यास मनाई केली होती. त्यावर मुंबई हाय कोर्टाने सांगितले कॉलेज हे ठरवू शकत नाही काय घातले पाहिजे काय नाही. कलम १९ नुसार सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. राणेंनी आतापर्यंत खूप मागण्या केल्या आहेत. बरीच स्टेटमेंट दिली आहेत. परंतु त्याचे पुढे काहीही झाले नाही. ते सध्या राज्याचे मंत्री आहेत. त्यांनी हे लक्षात घेतले पाहिजे मंत्री म्हणून सर्व जाती धर्म त्यांच्यासाठी आहेत.”
राणेंच्या मागणीला सरकारची पाठ
मंत्री नितेश राणे यांनी केलेल्या मागणीला राज्य सरकारने देखील गांभीर्याने घेतले नाही. बोर्ड परीक्षेत बुरख्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. विविध स्तरावरून मंत्री राणेयांच्या मागणीला विरोध होत आहे. अशी बेताल मागणी करून नितेश राणे वारंवार पोस्टर बॉय बनण्याचा प्रयत्न करतात. राणे हे मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनी दोन समाजात दरी निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असे राजकीय विश्लेषक सांगतात.
त्यामुळे मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला सरकारने पाठ फिरवली आहे असे म्हणता येते.
मुस्लिम मुलींनी घाबरून जाऊ नये - शेख अब्दुल रहीम
राणेंच्या मागणीवर महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, “आम्ही औरंगाबाद विभागीय सचिव डॉ, वैशाली जामदार यांना पत्र दिले आहे. या पत्रातून त्यांना बुरखा घालून परीक्षेला बसण्यास परवानगी मिळावी असे सांगितले आहे. लवकरच परवानगी मिळेल.’
ते पुढे म्हणतात, “मी मुस्लिम विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना आवाहन करतो की त्यांनी घाबरून जाऊ नये. लवकरच परवानगी मिळेले. आपण सर्वांनी येणाऱ्या परीक्षांसाठी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे.”
नितेश राणे यांचे पत्र
नितेश राणे यांनी दादा भुसे यांना दिलेल्या पात्रता म्हटले आहे, इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यावर विद्यार्थ्यांचं संपूर्ण भविष्य अवलंबून आहे. सदर परीक्षा पारदर्शकपणे कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार जसे कॉपी मुक्त परीक्षा होणे अपेक्षित आहे. याकरता शासनस्तरावरुन वेळोवेळी सूचना दिल्या जातात. एखादा परीक्षार्थी बुरखा घालून प्रवेश केंद्रावर आला तर कुणी परीक्षार्थी बुरखा घालून इलेक्ट्रॉनिक उपकरणाचा वापर करत आहे की नाही, हे तपासणे शक्य नाही.”
- फजल पठाण
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter