मुस्लिम शासक आणि होळीचा रंगबिरंगी इतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 9 h ago
मुघलकालीन होळी खेळतानाचे चित्र
मुघलकालीन होळी खेळतानाचे चित्र

 

 जाहिद खान

भारतात साजऱ्या होणाऱ्या असंख्य सणांमध्ये होळी हा एक असा सण आहे जो  विविध धर्मातील लोकांना  जोडण्याचे महत्त्वाची महत्त्वाची भूमिका बजावत आला आहे. भारतातील मुस्लिम, जैन आणि शीख यांसारखे अल्पसंख्याक समुदायांमध्येही हा सण मोठ्या उत्साहात आणि कोणत्याही धार्मिक भेदभावाविना त्यांच्या हिंदू बांधवांसोबत साजरा केला जात असल्याचा इतिहास आहे.   

सामान्य जनता असो वा राजवटीतील उच्च अधिकारी असोत, होळी नेहमीच सर्वांचा आवडता सण राहिला आहे. मुघल साम्राज्याच्या काळातही हा सण मोठ्या उत्साहात आणि कोणत्याही भेदभावाविना साजरे केले जात होते. होळीला मुघल शासकांकडून राजकीय मान्यता मिळाली होती. मुघल दरबारात अनेक दिवस होळीचा जल्लोष चालत असे. दरबारातील उमराव देखील सामान्य जनतेसोबत होळी खेळत असत. मुघल सम्राट स्वतः या सणात उत्साहाने सहभागी होत असत आणि आपल्या हिंदू राण्यांनादेखील होळी खेळण्यास प्रोत्साहन देत असत.  

धार्मिक कट्टर मानल्या जाणाऱ्या मुघल सम्राट औरंगजेबच्या काळातही होळी आनंदाने साजरी केली जायची. या उत्सवात मुस्लिम कुलीन वर्ग हिंदू बांधवांसोबत या उत्सवात मनापासून सहभागी होत असे. औरंगजेबचे चरित्रकार भीमसेन यांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, 'औरंगजेबच्या काळात होळीच्या सणानिमित्त खान जहान बहादुर कोटलाशाह हे राजा सुब्बानसिंग, रायसिंग राठोड, राय अनूपसिंग आणि मोखमसिंग चंद्रावत यांच्या घरी जाऊन होळी साजरी करत असत.' विशेष म्हणजे खान बहादुरचे पुत्र मीर अहसान आणि मीर मुहसिन हे राजपूतांपेक्षा अधिक जोमाने होळी खेळत असत. औरंगजेबच्या नाराजीला न जुमानता त्याच्या घरातील मंडळीदेखील होळीच्या जल्लोषात सहभागी होत असत.  

मिर्झा क़तील यांनी त्यांच्या 'हफ्त तमाशा' या अठराव्या शतकातील पुस्तकातही होळीविषयी महत्त्वाचा उल्लेख आहे. त्यांनी लिहिले आहे की, "अफगाण आणि काही विद्वेषी लोक वगळता सर्व मुसलमान होळी खेळतात. अगदी एखादा लहानसा व्यक्तीही मोठ्या प्रतिष्ठित व्यक्तीवर रंगाची उधळण करत असे आणि कोणीही याला गैर मानत नसे."  

मुघल शासक आपल्या राण्यांसोबत हरममध्ये होळी खेळत असत. मुघल बादशहा जहांगिरला होळीचा सण विशेष प्रिय होता. जहांगिरच्या होळी खेळतानाचे प्रसिद्ध चित्र 'गॅलरी ऑफ ऑस्ट्रेलिया'मध्ये दिमाखात मांडले आहे.मुघल हरममध्ये होळीच्या दिवशी विशेष बाजार भरत असे.  

मुघल सम्राट अकबर तर होळी खेळण्यासाठी खास तयारी करीत असे. संपूर्ण वर्षभर तो होळी खेळण्यासाठी अशा साहित्यांच्या शोधात असे ज्यामुळे रंग दूरवर उडवता येतील. होळीच्या दिवशी अकबर सर्व भेदभाव मिटवत जनतेसोबत होळी खेळत असे.  

मुघल साम्राज्यापुरतेच नाही, तर बंगालमध्येही मुस्लिम नवाबांनी होळी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे. नवाब मुर्शीद कुली खान, अली वर्दी, सिराजुद्दौला आणि मीर जाफर यांच्या होळी खेळण्याबाबत इतिहासत नोंदी आढळतात. त्यात लिहिले आहे की, अली वर्दीच्या भाच्यांनी मोती तलावाच्या बागेत सात दिवस होळी खेळली होती. त्यासाठी रंगीत पाणी, अबीर आणि केशर यांची मोठी व्यवस्था करण्यात आली होती.  

होळी म्हटली की अवधच्या नवाबांचा उल्लेख तर होणारच! अवधचे नवाब नेहमीच जनतेबरोबर सण-उत्सव साजरे करायचे. त्यांच्या दरबारात होळीच्या अनेक दिवस आधीच कार्यक्रम सुरू होत असत आणि लोक मोठ्या संख्येने त्यात सहभागी होत असत. मात्र, ब्रिटिश इतिहासकार आणि कट्टरपंथीय हिंदू-मुस्लिम समुदायातील काही लोकांना हा सर्व सहिष्णुतेचा आणि ऐक्याचा रंग कधीच आवडला नाही.  

भारतीय संस्कृतीत सण केवळ आनंदाचे निमित्त नाहीत, तर ते परस्पर सहिष्णुतेचे आणि सामंजस्याचे प्रतीक आहेत.आणि होळीच्या रंगांनी आणि मुघल इतिहासातील सांस्कृतिक ऐक्याच्या या परंपरेने भारतातील बहुविधतेत आणि सहिष्णुतेत अनोखे रंग भरले आहेत.

- जाहिद खान


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter