केंद्र सरकारने वक्फ बोर्ड विधेयक संसदेत मंजूर करुन घेतल्याने आता देशभरात वक्फ जमिनींसंदर्भात नव्या कायद्याची अंमलबजावणी होणार आहे. देशभरात अनेक ठिकाणी या विधेयकांचे स्वागत करण्यात आले. तर काही ठिकाणी विधेयकाविरुद्ध आंदोलने केली जात आहे. दरम्यान पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे वक्फ बोर्ड विधेयकास विरोध करत उभारलेल्या आंदोलनास हिंसक वळण लागले.
मुर्शिदाबाद येथे ८ एप्रिलपासून गदारोळ सुरु आहे. जंगीपूरात वक्फ विधेयकाविरोधात निदर्शने सुरु असताना पहिला हिंसाचार भडकला आहे. त्यानंतर हळूहळू हे लोन सुती आणि शमसेरगंज इथपर्यंत पसरले आहे. मुर्शिदाबाद येथील मोठ्या भागातील इंटरनेट सेवा बंद करावी लागली. शुक्रवारी हिंसाचारानंतर लोकांना हुसकवून लावण्यासाठी पोलिसांनी चार राऊंड फायर करावे लागले. यात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर संतप्त जमावाने केलेल्या हल्ल्यात एका बापलेकाचा मृत्यू झाला होता.
पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. सी. व्ही. आनंद बोस यांनी मुर्शिदाबाद आणि राज्यातील इतर हिंसाग्रस्त भागांतील परिस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, राजभवनाचा कोअर ग्रुप मुर्शिदाबाद आणि इतर संवेदनशील क्षेत्रांतील परिस्थितीवर प्रत्यक्ष वेळेत सातत्याने लक्ष ठेवून आहे. राज्यपाल बोस यांनी स्पष्ट केले की, या मुद्यावर त्यांची आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात चर्चा झाली आहे. परिस्थितीच्या गांभीर्याला पाहता केंद्र सरकार आणि गृह मंत्रालय देखील पूर्णपणे सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
राज्यपालांनी सांगितले की, कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बीएसएफ आणि स्थानिक पोलिसांसह सर्व अंमलबजावणी यंत्रणांकडून अहवाल मागवण्यात आले आहेत. केंद्र सरकारने पुरेशा संख्येने केंद्रीय सैन्य तैनात केले आहे आणि गरज पडल्यास आणखी सैन्य तैनात करण्यासाठी तयार आहे. सध्या बीएसएफच्या ९ कंपन्या तैनात असून, याशिवाय सीआरपीएफ, आरपीएफ आणि आरआयएफ देखील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. राज्य पोलिसही केंद्रीय सैन्याच्या सहकार्याने क्षेत्रात सक्रिय असून, दंगलखोरांना अटक करण्याची कारवाई सुरू आहे.
लोकांना मदत पुरवली जात आहे
पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉ. बोस यांनी सांगितले की, संकटात सापडलेल्या लोकांना केंद्रीय सैन्याकडून वेळेवर मदत पुरवली जात आहे. त्यांनी इशारा दिला की, जे लोक हिंसा पसरवत आहेत आणि त्यांचे संरक्षक आहेत, त्यांनी हे समजून घ्यावे की आता ही लढाई तीव्र होणार आहे. आता हिंसा आणि गुन्हेगारीविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल आणि कोणालाही कायदा हातात घेण्याची परवानगी दिली जाणार नाही.
डॉ. बोस यांनी पुढे सांगितले की, ही लढाई केवळ कायदा व सुव्यवस्थेची नाही, तर अन्याय आणि हिंसाचाराविरुद्ध समाजाची लढाई आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, न्यायालये, सरकार आणि समाजातील सर्व जबाबदार आणि जागरूक नागरिक एकजुटीने या गुन्हेगारांचा खात्मा करण्यासाठी कठोर भूमिका घेत आहेत.