मुंबईत रमजान म्हणजे फक्त उपवास आणि इफ्तारपुरता मर्यादित नाही, तर तो खवय्यांसाठी एक चविष्ट आणि अविस्मरणीय खाद्ययात्रा असते. मोहम्मद अली रोड मिनारा मशिद आणि परिसरातील गल्लीबोळ रमजानमध्ये खाद्यप्रेमींसाठी ‘स्वर्ग’ बनतात. यंदा या स्वादपूर्ण उत्सवात एका नव्या पदार्थाने खवय्यांची मने जिंकली आहेत ते म्हणजे ‘लैला-मजनू पुलाव’!
‘लैला-मजनू पुलाव’
‘लैला-मजनू पुलाव’ हे नाव जरी रोमँटिक आणि गूढ वाटत असले, तरी त्यामागे अफगाणी खाद्यसंस्कृतीचा अनोखा वारसा दडलेला आहे. मध्य आशियाई आणि काबुली स्वादांनी भरलेला हा पुलाव पारंपरिक बिर्याणीपेक्षा वेगळा आहे. यात सुगंधी बासमती तांदूळ, केशर, बदाम, काजू, मनुका, पिस्ते यांसारखे भरपूर ड्राय फ्रूट्स आणि खास अफगाणी मसाल्यांचा वापर केला जातो. मसालेदार तुकड्यांसोबत हा पुलाव हलक्या आणि सुगंधी मसाल्यांत शिजवला जातो, त्यामुळे त्याला एकदम शाही आणि समृद्ध चव मिळते.
माशाअल्लाह हॉटेलची खासियत
‘माशाअल्लाह हॉटेल’ने यंदा पहिल्यांदाच आपल्या मेनूत ‘लैला-मजनू पुलाव’ समाविष्ट केला आहे. या पदार्थाला खवय्यांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. हॉटेलच्या शेफच्या म्हणण्यानुसार, हा पुलाव आणि त्यासोबत दिला जाणारा ‘अल्फाम तंदुरी’ यांचे कॉम्बिनेशन खवय्यांना प्रचंड भावले आहे. या पुलावाची लोकप्रियता वाढण्यामागे एक खास कारण आहे. मुंबईकरांची नेहमी काहीतरी नवीन चाखण्याची आवड. रमजानमध्ये वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थांचा आनंद घेताना लोक यंदा लैला-मजनू पुलाव’लाही पसंती देत आहेत.
‘लैला-मजनू पुलाव’ची वाढती क्रेझ
रमजानमध्ये मोहम्मद अली रोडवरील प्रसिद्ध पदार्थ म्हणजे बिर्याणी, कबाब, नल्ली निहारी, हलीम आणि शीरखुर्मा. मात्र, यंदा या सगळ्या पदार्थांमध्ये ‘लैला-मजनू पुलाव’ चर्चेचा विषय ठरला आहे. ‘माशाअल्लाह हॉटेल’चे मालक अब्दुल रेहमान सांगतात, "आम्ही हा पुलाव पहिल्यांदा मेनूत ठेवला. पण तो एवढ्या झपाट्याने लोकप्रिय होईल, याची कल्पना नव्हती."
प्रेमीयुगलांच्या गर्दीमुळे नाव
‘माशाअल्लाह हॉटेल’च्या मालक अब्दुल रेहमान यांनी सांगितले, "आमच्या हॉटेलमध्ये मोठ्या प्रमाणात प्रेमीयुगल येतात. त्यांना एकत्र बसून खास काहीतरी शेअर करण्याचा आनंद मिळावा, यासाठी आम्ही हा अनोखा पुलाव तयार केला. त्यावरूनच या नव्या पदार्थाचे नाव ‘लैला-मजनू पुलाव’ असे ठेवले आहे.'रमजान म्हणजे केवळ उपवासाचा नाही, तर चविष्ट खाद्यसंस्कृतीचा सण आहे. या महिन्यात खवय्ये नवनवीन पदार्थांची चव घेण्यासाठी उत्सुक असतात. त्यांच्यासाठी खास ‘लैला-मजनू पुलाव’ सादर केला असून, तो प्रेम आणि स्वादाचा अनोखा संगम आहे. ग्राहकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला आणखी नवे प्रयोग करण्याची प्रेरणा देतो."
खवय्ये म्हणतात
शुभांगी शिंदे या पुलावाविषयी म्हणते, "रमजानच्या काळात काहीतरी नवीन चाखायचं होतं, आणि ‘लैला-मजनू पुलाव’ खरंच अप्रतिम आहे. सुका मेवा आणि अफगाणी मसाले यांचा संगम जबरदस्त आहे. आणि अल्फाम तंदुरीसोबत तर त्याची चव आणखी खुलते."
तर रवींद्र वाळकोडी म्हणतो, "मी अनेक वर्षांपासून रमजानमध्ये मोहम्मद अली रोडला भेट देतो. यंदा पहिल्यांदाच हा पुलाव ट्राय केला आणि त्याची चव एकदम हटके वाटली. हलकी मसालेदार चव, सुगंधी तांदूळ आणि ड्राय फ्रूट्स यामुळे हा पदार्थ नक्कीच खास आहे."
- नितीन बिनेकर
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter