मुंबईत बोटीच्या भीषण अपघातात १३ मृत्युमुखी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 12 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

'गेट वे ऑफ इंडिया' येथून एलिफंटा बेटाकडे जाणाऱ्या 'नीलकमल' या फेरीबोटीला बुधवारी उरणजवळ दुपारी नौदलाची स्पीड बोट धडकून झालेल्या अपघातात १३ जणांचा मृत्यु झाला. मृतांमध्ये १० प्रवासी, तर एक नौदल अधिकारी आणि स्पीड बोटीवरील दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नौदल, सागरी पोलिस आणि तटरक्षक दलाच्या मदतीने ९९ जणांची सुटका करण्यात आली आहे.

एका खासगी कंपनीची 'नीलकमल' फेरीबोट बुधवारी दुपारी पावणेतीनच्या सुमारास शंभरहून अधिक प्रवाशांना घेऊन 'एलिफंटा 'कडे जात होती. आणिजवळील करंजा परिसरात ती आली असता अनियंत्रित झालेल्या नौदलाच्या स्पीड बोटीने 'नीलकमल'ला धडक दिली. ही धडक बसताच फेरीबोट उलटून काही क्षणांतच समुद्रात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच नौदल, सागरी पोलिस आणि तटरक्षक दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. नौदलाच्या ११ बोटी, सागरी पोलिसांच्या तीन बोटी, तटरक्षक दलाची एक बोट आणि चार हेलिकॉप्टरच्या मदतीने ९९ प्रवाशांना वाचविण्यात यश आले. या प्रवाशांना जेएनपीटी, नेव्ही डॉकयार्ड, अश्विन रुग्णालय, सेंट जॉर्ज रुग्णालय आणि करंजा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

चाचणी सुरू असल्याचा दावा
भारतीय नौदलाच्या माहितीनुसार, करंजा बंदराच्या जवळ स्पीड बोटीच्या इंजिनची चाचणी सुरू होती. फेरीबोटीच्या आसपास असतानाच या स्पीड बोटीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने धडक झाली. यानंतर नौदल, तटरक्षक आणि इतर नौकांनी तातडीने बचावकार्य राबवून अनेक प्रवाशांची सुटका केली. या दुर्घटनेने प्रवासी जलवाहतुकीतील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

'चौकशी करणार'
नागपूर: बोट दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले. 'ही घटना अतिशय दुर्दैवी व दुखद आहे. दुर्घटनाग्रस्तांना योग्य ती मदत करण्यात येईल,' असे त्यांनी सांगितले. मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपयांची मदतही त्यांनी जाहीर केली. तसेच, या घटनेची राज्य सरकार आणि नौदलामार्फत चौकशी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मृतांची नावे
महेंद्रसिंग शेखावत (नौदल), प्रवीण शर्मा व मंगेश (बोट वरील कामगार), महम्मद रेहान कुरेशी, राकेश नानाजी अहिरे, साफियाना पठाण, माही पावरा (वय ३), हर्षदा राकेश आहिरे, निधिश राकेश अहिरे (वय ८), दीपक व्ही., अनोळखी दोन महिला व एक पुरुष.