हज २०२५ : प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 20 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास राज्यमंत्री जॉर्ज कुरियन यांनी हज २०२५ साठी निवडलेल्या ६२० प्रतिनियुक्तींच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ केला. नवी दिल्लीतील स्कोप कॉम्प्लेक्स लोधी रोड येथे हा दोन दिवसीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमात राज्यमंत्र्यांनी प्रतिनियुक्तींना भारतीय हज यात्रेकरूंची सेवा करताना आपली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण निष्ठेने पार पाडण्याचे आवाहन केले.

यंदा हज व्यवस्थापनात सौदी अरेबियातील भारतीय वाणिज्य दूतावासाला (सीजीआय जेद्दा) सहाय्य करण्यासाठी २६६ प्रशासकीय आणि ३५४ वैद्यकीय अशा एकूण ६२० प्रतिनियुक्तींची काटेकोर प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रतिनियुक्तींना हज व्यवस्थापन, त्यांची भूमिका, आरोग्य विषय, गर्दी आणि आपत्ती व्यवस्थापन तसेच हज सुविधा ॲपच्या कार्यप्रणालीची सविस्तर माहिती दिली जात आहे.

हज सुविधा ॲपद्वारे २०२४ च्या हज यात्रेत माहिती प्रसार आणि तक्रार निवारणात महत्त्वाची भूमिका बजावली. ॲपच्या यशस्वी वापरानंतर सरकार यंदा या ॲपचा अधिक प्रभावी उपयोग करण्यासाठी प्रतिनियुक्तींना विशेष प्रशिक्षण देत आहे. भारत सरकारद्वारे देशाबाहेर आयोजित केल्या जाणाऱ्या सर्वात मोठ्या उपक्रमांपैकी एक असलेल्या हज यात्रेच्या यशस्वी व्यवस्थापनासाठी हे प्रशिक्षण महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

कार्यक्रमात अल्पसंख्याक कल्याण मंत्रालयाचे सचिव डॉ. चंद्रशेखर कुमार आणि संयुक्त सचिव सीपीएस बक्षी यांनी प्रतिनियुक्तींचे स्वागत करत हज २०२५ यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रतिनियुक्तींची क्षमता वाढवण्यासह त्यांना प्रशासकीय आणि वैद्यकीय जबाबदाऱ्यांसाठी सज्ज करेल, जेणेकरून भारतीय हज यात्रेकरूंना उत्तम सेवा मिळू शकेल.