मोदी बनले 'या' इस्लामी देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 4 Months ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रुनेईचे सुलतान दारुसलाम हसनल बोलकिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रुनेईचे सुलतान दारुसलाम हसनल बोलकिया

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी (३ सप्टेंबर) सकाळी  ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर रवाना झाले. नरेंद्र मोदी हे ब्रुनेईला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान बनले आहेत. या एक दिवसीय दौऱ्यानंतर ते ४ सप्टेंबरला ब्रुनेईहून सिंगापूरला जाणार आहेत.

भारत आणि ब्रुनेई यांच्या राजनैतिक संबंधांना ४० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी ब्रुनेईला भेट देत आहेत. ब्रुनेईमध्ये भारतीय समुदायाची संख्या १४ हजारांच्या आसपास आहे. ब्रुनेईमधील डॉक्टर आणि शिक्षकांमध्ये भारतीयांची संख्या लक्षणीय आहे.

दोन्ही देशांमधील संरक्षण सहकार्याच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींचा ब्रुनेई दौरा महत्त्वाचा आहे. दोन्ही देशांना संरक्षण सहकार्यात संयुक्त कार्यगट स्थापन करायचा आहे. याशिवाय पीएम मोदींच्या दौऱ्यात ऊर्जा संबंध आणि अंतराळ क्षेत्रातही सहकार्य वाढण्याची शक्यता आहे.

ब्रुनेई दौऱ्याबाबत पीएम मोदी म्हणाले, 'मी माझ्या पहिल्या द्विपक्षीय दौऱ्यावर ब्रुनेईला जात आहे. मी सुलतान हाजी हसनल बोलकिया आणि राजघराण्यातील इतर सदस्यांना भेटणार आहे. यामुळे आपले ऐतिहासिक संबंध नव्या उंचीवर जाण्यास मोठी मदत मिळेल.'

ते पुढे म्हणाले, '४ सप्टेंबरला मी ब्रुनेईहून सिंगापूरला रवाना होणार आहे. मी तेथे राष्ट्रपती थर्मन षणमुगररत्नम, पंतप्रधान लॉरेन्स वोंग, वरिष्ठ मंत्री ली सिएन लूंग आणि निवृत्त ज्येष्ठ मंत्री गोह चोक टोंग यांना भेटण्यास उत्सुक आहे. डिजिटलायझेशन आणि शाश्वत विकासाच्या नवीन आणि उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये भागीदारी अधिक घट्ट करण्यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरेल.'

शेवटी पंतप्रधान मोदी म्हणाले, 'आमच्या 'ऍक्ट ईस्ट' धोरणासाठी आणि इंडो-पॅसिफिक व्हिजनसाठी दोन्ही देश (सिंगापूर आणि ब्रुनेई) महत्त्वाचे भागीदार आहेत. मला विश्वास आहे की माझ्या भेटीमुळे ब्रुनेई, सिंगापूर आणि आसियान प्रदेशातील आमची भागीदारी आणखी मजबूत होईल. दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांची संघटना असलेल्या आसियानमधील सिंगापूर हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे.'