शहेबाज म. फारूक मनियार
तेलंगणाच्या ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन या पक्षाची स्थापना १९२७मध्ये झाली. स्थापनेवेळी पक्षाचे नाव ‘मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एमआयएम) होते. पक्षाच्या स्थापनेत नवाब महमुद नवाज खान किलेदार यांची प्रमुख भूमिका होती. हैदराबाद संस्थानाचे भारतात विलीनीकरण झाल्यावर १९५८मध्ये अब्दुल वाहिद ओवैसी यांनी पक्षाला पुनर्जीवित केले आणि पक्षाचे नाव बदलून ‘ऑल इंडिया मजलीस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’ (एआयएमआयएम) असे करण्यात आले.
अब्दुल वाहिद ओवैसी यांच्यानंतर त्यांचा मुलगा सुल्तान सलाहूद्दीन ओवैसी यांनी पक्षाची सूत्रे सांभाळली. पक्षाचे विद्यमान प्रमुख आणि खासदार असदूद्दीन ओवैसी हे सुल्तान सलाहूद्दीन ओवैसी यांचे पुत्र आहेत. एमआयएमची राजकीय विचारधारा ही प्रमुख्याने मुस्लिम प्रश्नांभोवती केंद्रित आहे. हैद्राबादच्या जुन्या शहरापूरता मर्यादित असलेला हा पक्ष असदूद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखाली इतर राज्यातदेखील पसरला.
महाराष्ट्रात एमआयएमचा चंचुप्रवेश नांदेड महानगरपालिका निवडणुकांच्या माध्यमातून झाला. २०१२च्या नांदेड महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमचे अकरा नगरसेवक निवडून आले होते. पुढे २०१४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पहिल्याच प्रयत्नात एमआयएमचे दोन आमदार निवडून आले. त्यावेळी औरंगाबाद मध्य विधानसभा मतदारसंघातून इम्तियाज जलील तर भायखळा विधानसभा मतदारसंघातून वारिस पठाण विजयी झाले होते.
राज्यात एमआयएमची घोडदौड सुरू राहिली आणि विविध महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे नगरसेवक निवडून आले. औरंगाबाद, मुंबई, नांदेड, सोलापूर, अमरावती, धुळे इ. शहरांमध्ये एमआयएमने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. २०१९ लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सोबतच्या युतीमुळे इम्तियाज जलील हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदारही झाले. २०१९च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत धुळे शहर मतदार संघातून फारूक शाह, तर मालेगाव मतदारसंघातून मुफ्ती इस्माईल कास्मी आमदार झाले.
मात्र एमआयएमची राज्यातील ही घोडदौड फारकाळ टिकली नाही. काही काळातच पक्षाच्या धोरणातील उणीवा आणि पक्ष वाढीतील मर्यादा प्रकर्षाने जाणवू लागल्या. ज्या नांदेड महानगरपालिकेतून पक्षाने २०१२मध्ये महाराष्ट्रात पदार्पण केले होते, त्या महानगरपालिकेत २०१७मध्ये एमआयएमला एकही नगरसेवक जिंकून आणता आला नाही. एमआयएमने २०१४मध्येजिंकलेल्या औरंगाबाद मध्य आणि भायखळा या विधानसभेच्या दोन्ही जागा, २०१९मध्ये गमावल्या. २०१९ मध्ये जिंकलेली औरंगाबाद लोकसभेची जागा २०२४मध्ये गमावली. २०१९ मध्ये जिंकलेली धुळे शहर विधानसभेची जागा २०२४मध्ये गमावली. २०२४ विधानसभेत पक्षाने १६ जागा लढवल्या. पण मालेगाव मध्य या केवळ एकाच जागेवर त्यांना कसाबसा विजय मिळवता आला.
मालेगावचा अपवाद वगळता महाराष्ट्रात एमआयएमला लोकसभेची किंवा विधानसभेची पूर्वी जिंकलेली एकही जागा पुन्हा जिंकता आली नाही. २०२४च्या विधानसभेच्या निवडणुकीत मालेगावची जागादेखील केवळ १६२ मतांच्या निसटत्या फरकाने कायम राखण्यात एमआयएमला यश आले. म्हणूनच, महाराष्ट्रात मुस्लिम राजकारणाला वेगळे वळण देण्याची संधी मिळूनदेखील एमआयएमला अपेक्षित कामगिरी करण्यात आलेले अपयश आणि या विधानसभा निवडणुकीत पक्षाची झालेली वाताहत यांची कारणमीमांसा करणे आवश्यक ठरते.
मर्यादित मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघ
महाराष्ट्रामध्ये मुस्लिम समाजाची लोकसंख्या ही जरी ११.५ टक्के असली तरी मुस्लिम बहुल मतदारसंघांची संख्या फार मर्यादित आहे. मालेगाव मध्य (८०%), शिवाजीनगर मानखुर्द (५३%), भिवंडी पूर्व (५१%), मुंबादेवी (५०%), भिवंडी पश्चिम (५०%) हे पाच विधानसभा मतदारसंघ सोडले तर इतर मतदारसंघात ५० टक्के पेक्षा कमी मुस्लिम मतदार आहेत. त्यातही उर्वरित मतदारसंघापैकी केवळचार मतदारसंघात ४० टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार आहेत.
तेलंगणामध्ये जुन्या हैद्राबाद शहरात मुस्लिमबहुल (५५ टक्क्यांहून अधिक) मतदारसंघांचे प्रमाण अधिक आहे. त्याप्रमाणात ते महाराष्ट्रात नाहीत. त्यामुळे प्रामुख्याने मुस्लिम मतां राजकारण करून जिंकून येणासारखे वातावरण एमआयएमला महाराष्ट्रात उपलब्ध नाही. त्यामुळे महाराष्ट्रात मालेगाव मध्य विधानसभेची जागा वगळता इतर जागांवर फक्त मुस्लिम मतांच्या आधारावर जिंकून येणे फार कठीण आहे.
मुस्लिमबहुल मंतदारसंघांपैकी शिवाजीनगर-मानखुर्द, भिवंडी पूर्व आणि भिवंडी पश्चिम हे मतदारसंघ उत्तर भारतीय मुस्लिमबहुल मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात समाजवादी पक्षाचा चांगला जम आहे. शिवाजीनगर-मानखुर्द आणि भिवंडी पूर्व मतदारसंघात समाजवादी पक्षाचे पूर्वीपासून मुस्लिम आमदार आहेत. त्यामुळे एमआयएम पक्षाला महाराष्ट्रात वाढण्यास मुळातच फार कमी वाव आहे.
मुस्लिम मतांसोबत हिंदू मतांचे ध्रुवीकरण
एमआयएमचे राजकारण प्रामुख्याने भावनिकतेच्या आधारावर आणि मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणावर आधारित आहे. महाराष्ट्रातील काही मुस्लिमबहुल विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण होऊन विरोधी मतांचे विभाजन झाले तरच एमआयएम पक्षाचा उमेदवार जिंकून आल्याचा इतिहास आहे. मालेगावचा अपवाद वगळता औरंगाबाद मध्य, भायखळा आणि धुळे शहर मतदारसंघात हा पॅटर्न आपल्याला दिसून येतो.
मात्र हा पॅटर्न फक्त एकदाच काम करतो आणि पुढच्या निवडणुकीत मात्र एमआयएम उमेदवारांची मतांची संख्या वाढूनही त्यांचा पराजय होतो. हिंदू मतांचे विरोधी उमेदवाराच्या पक्षात झालेले ध्रुवीकरण आणि टळलेले मतविभाजन या पराभवाचे मुख्य कारण आहे. औरंगाबाद मध्य, भायखळा आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघाची मागील दोन ते तीन निवडणुकांची आकडेवारी पाहिल्यास आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल.
औरंगाबाद मध्य मतदारसंघातून २०१४मध्ये एमआयएमचे इम्तियाज जलील शिवसेना आणि भाजप मधील मतविभागणीत विजयी झाले होते. मात्र २०१९ आणि २०२४च्या निवडणुकीत एमआयएमची मते वाढूनदेखील हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाल्याने एमआयएमच्या नसीर सिद्दीकी यांचा पराभव झाला.
भायखळा मतदारसंघातून २०१४मध्ये एमआयएमचे वारिस पठाण हे भाजप, कॉंग्रेस आणि इतर पक्षांच्या मतविभाजनात निवडून आले होते. मात्र २०१९ आणि २०२४च्या निवडणुकीत हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाल्याने एमआयएमच्या उमेदवाराचा पराभव झाला.
धुळे शहर मतदारसंघातून २०१९मध्ये एमआयएमचे फारूक शाह हे शिवसेना, लोकसंग्राम आणि इतर पक्षांच्या मतविभाजनात निवडून आले होते. मात्र २०२४च्या निवडणुकीत एमआयएमची मते वाढूनदेखील हिंदू मतांचे ध्रुवीकरण झाल्याने एमआयएमच्या फारूख शाह यांचा पराभव झाला.
कमकुवत पक्ष संघटना
एमआयएमने सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात चांगले यश मिळवल्यावर त्यांना जम बसवण्याची संधी होती. मात्र ही संधी पक्षाने गमावली. राज्य, जिल्हा आणि तालुका पातळीवर पक्षाचे सक्षम संघटन निर्माण झाले नाही. पक्षाच्या वेगवेगळ्याआघाड्या नाहीत. पदाधिकाऱ्यांच्या वेळेवर नेमणूक होत नाहीत. इम्तियाज जलील पक्षाचे प्रदेशअध्यक्ष असताना त्यांचे लक्ष केवळ औरंगाबाद जिल्हयापूरते मर्यादित होते असे म्हटले जाते. महाराष्ट्रभर पक्ष संघटनेचे जाळे विस्तारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले नाहीत असाही आरोप होतो.
निवडणूक जिंकण्यासाठी पक्षाकडे पदाधिकारी आणि प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फौज लागते. परंतु पक्ष संघटनाच कमकुवत असल्याने पक्षात प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली नाही. ओवैसी बंधूंच्या भावनिक भाषणांच्या आधारे निवडणूक जिंकू या भ्रमात पक्षाचे नेते वावरतात. भावनेच्या आधारावर एखाद्यावेळेस निवडणूक जिंकता येऊ शकते, मात्र शाश्वत राजकारण उभे राहू शकत नाही. शाश्वत राजकारण हे पक्ष संगठन आणि पक्ष धोरणावर उभे राहते. महाराष्ट्रातील एमआयएम पक्षाकडे सध्या या दोन्ही गोष्टींचा वानवा आहे.
व्यक्ति केंद्रित राजकारण
एमआयएमचे महाराष्ट्रात सक्षम पक्ष संघटन नाही. त्यामुळे त्यांचे राजकारण हे मुस्लिमबहुल भागात काही व्यक्तींच्या सभोवताली केंद्रित झालेले आहे. उदाहरणार्थ, औरंगाबाद येथे इम्तियाज जलील, मुंबईत वारिस पठाण, नांदेड येथे मोईन सय्यद, सोलापूरात फारूक शाब्दी, मालेगाव मध्ये मुफ्ती इस्माईल, धुळ्यात फारूक शाह, पिंपरी चिंचवड मध्ये रूहीनाज शेख इ. एमआयएमचे महराष्ट्रातील राजकारण हे केवळ काही व्यक्तींपुरते मर्यादित राहिल्याने महाराष्ट्रात पक्षवाढीस मोठ्या मर्यादा आल्या आहेत.
कार्यकर्त्यांचा झालेला अपेक्षाभंग
महाराष्ट्रात पूर्वीपासून मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांनी फार अपेक्षेने एमआयएममध्येप्रवेश केला होता. महाराष्ट्रातील मुस्लिम प्रश्नांची जान असलेल्या जावेद पाशा कुरेशी या लेखक-विचारवंतानेदेखील पक्ष प्रवेश केला होता. पक्षाने त्यांना राज्य प्रवक्तेपदही दिले होते. मात्र माध्यमांमधून भूमिका मांडण्याची संधी त्यांना पक्षाने कधीच दिली नाही. आपल्या क्षमतांचा वापर पक्ष करून घेत नसल्याचे लक्षात येताच त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
पुण्यातील अंजुम इनामदार, लातूर येथील मोहसीन खान, अंबाजोगाईचे रमीज शेख अशा महाराष्ट्रातील प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांनी एमआयएम पक्षाकडून अपेक्षाभंग झाल्याने पक्षाशी फारकत घेतली.
एकला चलो रे ची भूमिका
सध्याचे महाराष्ट्रासहित भारताचे राजकारण हे युती आणि आघाड्यांचे राजकारण बनले आहे. महाराष्ट्रात तर आजच्या तारखेला स्वबळावर निवडणूक लढवण्यास मोठे पक्षदेखील धजवत नाहीत. भाजपसारखा राष्ट्रीय पक्षही इतर पक्ष फोडून त्यांच्यासोबत युती करून निवडणूक लढवत आहे. अशात एमआयएम मात्र अजूनही ‘एकला चलो रे’ च्या भूमिकेत आहे.
२०१९मध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी सोबत झालेली युतीदेखील पक्षाला फारकाळ टिकवता आली नाही. खरेतर या युतीमुळेच इम्तियाज जलील २०१९मध्ये खासदार झाले होते. परंतु ही युती तुटल्याने २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. २०२४ विधानसभा निवडणुकीतदेखील पक्षाचा केवळ एक उमेदवार निवडून आला तो याचमुळे.
एमआयएमला महाराष्ट्रात दीर्घकालीन शाश्वत मुस्लिम राजकारण उभे करायचे असल्यास त्यांना पक्षामध्ये आमुलाग्र बदल करावे लागतील. फक्त मुस्लिम मतांच्या बळावर महाराष्ट्रात निवडणूक जिंकणे शक्य नाही. त्यामुळे पक्षाला इतर प्रमुख पक्ष किंवा जातघटकांशी युती करावी लागेल. पक्ष संघटन मजबूत करावे लागेल. प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी उभावी लागेल. कार्यकर्त्यांना कार्यक्रम आणि धोरण द्यावे लागेल. भावनिक घोषणा आणि भाषणांनी निवडणुकीत एखाद दुसऱ्या जागेवर विजय मिळेलही पण दीर्घकालीन राजकारण मात्र उभं राहू शकत नाही. पक्षाने वेळीच धोरणांमध्ये बदल केला नाही तर एमआयएम महाराष्ट्राच्या राजकारणातून हळूहळू अप्रासंगिक होत जाईल यात शंका नाही.