वक्फ विधेयकावर संसदीय समितीच्या दिल्लीत २८ बैठका

Story by  आवाज़ मराठी | Published by  Saurabh Chandanshive • 20 d ago
वक्फ विधेयक बैठकीतील सभासद
वक्फ विधेयक बैठकीतील सभासद

 

वक्फ दुरुस्ती विधेयकावर संशोधनासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे (जेपीसी) अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी गुरुवारी या विषयावर आतापर्यंत झालेल्या बैठका आणि राज्यांच्या दौऱ्यांची माहिती दिली. ते म्हणाले की, वक्फ दुरुस्ती विधेयकावर आतापर्यंत दिल्लीत २८ बैठका झाल्या असून त्यामध्ये विविध राज्यांतील प्रतिनिधींशी चर्चा करण्यात आली आहे.  संसदेच्या संयुक्त समितीची बैठक गुरुवारी दुपारी ३ वाजता आयोजित करण्यात आली होती, त्यानंतर पाल यांनी ही माहिती दिली.

ते म्हणाले की, दिल्लीतील या २८ बैठकांव्यतिरिक्त जेपीसीने अनेक राज्यांना भेटी दिल्या आहेत. जेणेकरून या विधेयकावर अधिकाधिक लोकांकडून माहिती आणि सूचना मिळू शकतील. ते पुढे म्हणाले की, आत्तापर्यंत आम्ही मुंबई (महाराष्ट्र), अहमदाबाद (गुजरात), हैदराबाद (तेलंगणा), चेन्नई (तामिळनाडू), बेंगळुरू (कर्नाटक), गुवाहाटी (आसाम) आणि भुवनेश्वर (ओरिसा) या ठिकाणांना भेटी दिल्या आहेत.

ते म्हणाले की, या सर्व राज्यांमध्ये आम्ही विविध शिष्टमंडळांना भेटलो आहोत. सोबतच वक्फ बोर्ड, अल्पसंख्याक आयोग, राज्य सरकारी अधिकारी आणि भारत सरकारच्या सहा मंत्रालयांच्या प्रतिनिधींसोबत आम्ही बैठकाही घेतल्या आहेत. या बैठकांमध्ये इस्लामिक विद्वान, निवृत्त न्यायाधीश, कुलगुरू आणि जमियत-ए-उलेमा सारख्या धार्मिक संघटना यांसारख्या विविध मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. या विधेयकावर संबंधितांशी अधिकाधिक  चर्चा व्हावी, जेणेकरून या विधेयकाशी संबंधित सर्व बाबींवर सखोल समज निर्माण व्हावी, अशी सरकारची इच्छा आहे.

या विधेयकाशी संबंधित विविध मुद्द्यांवर देशभरातून मते जाणून घेण्याचा आणि संबंधितांच्या शंका आणि प्रश्न जाणून घेण्याचा जेपीसीचा मानस आहे. अल्पसंख्याक मंत्रालयानेही गेल्या आठवड्यात जेपीसीचा कार्यकाळ वाढवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. लोकसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी लोकसभा समितीचा कार्यकाळ वाढविण्याचा मुद्दा उपस्थित केला होता.