महाराष्ट्र, झारखंड विधानसभेप्रमाणेच विविध राज्यांतील पोटनिवडणुकांसाठीचा प्रचार आज सायंकाळी थांबला. नेहमीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही पैशाचा महापूर आला होता. विविध ठिकाणांवरून तब्बल १ हजार ०८२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या दोन राज्यांत २०१९ मध्ये जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाच्या तुलनेत यंदा जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचे प्रमाण हे सातपटीने अधिक असल्याचे आढळून आले आहे. याखेपेस महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांतून ८५८ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तत्पूर्वी २०१९ मध्ये महाराष्ट्रातून १०३.६१ कोटी रुपये तर झारखंडमधून १८.७६ कोटी रुपये जप्त करण्यात आले होते.
जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोकड, मद्य, अमली पदार्थ, भेटवस्तू आदींचा समावेश आहे. महाराष्ट्रात तपास मोहिमेमध्ये स्थानिक पोलिस यंत्रणेप्रमाणेच सक्तवसुली संचालनालय देखील सहभागी झाले होते. याच केंद्रीय तपाससंस्थेने पालघर जिल्ह्यातून ३.७० कोटींची रोकड जप्त केली होती. बुलडाण्यातून ४ कोटी रुपयांचा गांजा तर रायगडमधून ५.२० कोटी रुपयांच्या चांदीच्या विटा जप्त केल्या होत्या. झारखंडमधूनही मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.