मराठीला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 17 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या घोषणेला अवघे काही दिवस उरले असताना केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठीसोबतच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात दर्जा मिळणार आहे. अभिजात मराठीच्या घटस्थापनेनंतर आज राज्यभर जल्लोष करण्यात आला असून विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्या निर्णयांची औपचारिक घोषणा केली. मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने सहप्रभारी पदाची जबाबदारी सोपविली आहे.

यावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, "मराठी भाषा ही भारताचा अभिमान आहे. या अद्वितीय भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल अभिनंदन. हा सन्मान म्हणजे मराठी भाषेने आपल्या देशाच्या इतिहासात दिलेल्या समृद्ध सांस्कृतिक योगदानाचा गौरवच आहे. मराठी भाषा ही कायमच भारतीय वारशाचा आधारस्तंभ राहिली आहे. मला खात्री आहे की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने ही भाषा शिकण्यासाठी असंख्य लोकांना प्रेरणा मिळेल."

मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी महाराष्ट्रात तसेच अन्य राज्यांमध्येही केंद्रांची उभारणी करण्यात येईल. सांस्कृतिक मंत्रालयाकडून याबाबतची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांत शिक्षण मंत्रालयातर्फे या केंद्रांची उभारणी होईल. उत्तर भारतातही ही केंद्रे असतील असे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले. भाषेचे प्राचीनत्व सिद्ध करणारे १५०० ते २००० वर्षांपासूनचे साहित्य, काव्य, ग्रंथसंपदा, शिलालेख आणि अन्य पारंपरिक पुराव्यांच्या आधारे अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय झाला आहे.

मराठीसोबतच पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात दर्जा मिळणार आहे. आतापर्यंत देशात तमीळ, संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि उडिया भाषांना अभिजात दर्जा मिळाला आहे. त्यात आता मराठीसह पाच भाषांची भर पडणार आहे. अभिजात भाषेच्या दर्जापासून मराठीला वंचित ठेवले जात असल्याचा मुद्दा राजकीय पक्षांकडून सातत्याने उपस्थित केला जात होता. गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यिक, विचारवंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून हा विषय मांडला जात होता.

आजचा दिवस मराठी भाषा गौरव दिन

मुंबई - आजचा दिवस (३ ऑक्टोबर) मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. आजचा हा दिवस यापुढे ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.

‘जगभरात, सातासमुद्रापार पोचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस आहे,’ अशा शब्दांत शिंदे यांनी या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे प्रदीर्घ लढ्याला यश मिळाले आहे,’ असे ते म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलताना म्हणाले, "हा दिवस उजाडावा यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे. अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे."

तर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, "मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या ऐतिहासिक निर्णयाने जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल, मराठी भाषा ज्ञानभाषा, अर्थार्जनाची भाषा बनण्यास मदत होईल. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे मी मनापासून आभार मानतो."

या निर्णयावर बोलताना विद्यमान संमेलनाध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे म्हणाले, "मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल भारत सरकारचे आभार. मराठी भाषेत जी वैविध्यपूर्णता आहे, तेवढी वैविध्यता क्वचितच अन्य भाषांत असेल. संत परंपरेनुसार तर आधुनिक साहित्यापर्यंत साहित्याचा आणि प्रादेशिक भाषांतील बोलीचा विचार करता एवढी श्रीमंत भाषा म्हणून मराठीकडे पाहावे लागेल. भारतीय भाषेच्या अभिजात निकषांवर ही भाषा किती टिकते, याबद्दल रंगनाथ पठारे याच्या समितीने केलेल्या कामाचा आणि संशोधनाचाही महत्त्वाचा वाटा आहे."

निर्णयाचे स्वागत करताना महाराष्ट्र राज्य मराठी भाषा अभिजात समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे म्हणाले, "मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकारने नेमलेल्या समितीने इतर भाषांपेक्षा अत्यंत चांगला प्रस्ताव तयार करून दिला होता. आता उशिरा का असेना दर्जा मिळाला असल्याने ही खूप आनंदाची बाब आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात मराठी भाषा बोलणारे लोक आहेत. त्यांच्या पूर्वजांची भाषा ते विसरलेले नाहीत. यामुळे आता हा अभिजात दर्जा मिळाल्यानंतर भाषेच्या कक्षेत बांधून ठेवण्यासाठी बळ मिळावे."