मराठी... अमृताहुनी गोड..!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 19 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

मायमराठीच्या प्रदीर्घ इतिहासातील हा सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा, असा दिवस आहे यात शंका नाही. आचार्य अत्रे असते तर त्यांनी ‘गेल्या दहा हजार वर्षात’ असा आनंद झाला नाही, असे म्हटले असते. तमाम मराठीजनांना हर्ष होईल, अशी ही घटना आहे. ‘अमृतकाला’तच ही अमृताहुनि गोड बातमी आली, त्याचे स्वागत दोन्ही बाहू पसरून करायला हवे.

जी भाषा अजाणत्या वयातच जिभेवर चढली, ती अभिजात भाषा होती, ही भावनाच मराठी मनासाठी कृतार्थतेची आहे. अभिजात भाषेचा दर्जा मराठीलाही मिळावा, यासाठी गेली अनेक वर्षे मराठीप्रेमींनी जंगजंग पछाडले. बारा वर्षापूर्वी अभ्यासकांची एक विशेष समिती स्थापन करण्यात आली होती. प्रा. रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील या समितीने सखोल संशोधनाअंती पाचशे पानांचा अहवाल सरकारला सादर केला.

ही भाषा किमान अडीच हजार वर्षे जुनी असून तिचा आजवरचा प्रवास अभिजात दर्जासाठी आवश्यक असलेल्या निकषांना पुरुन उरणारा आहे, असे त्या अहवालात सप्रमाण सिद्ध करण्यात आले. तरीही हे घडण्यासाठी दशकभराचा वेळ का जावा लागला, हे एक कोडेच आहे. मग पाठपुरावा समितीही नेमण्यात आली. तसेच अनेकांनी ‘अभिजात दर्जा मिळाला तर काय उजेड पडणार आहे?’ असा काहीसा नकारात्मक सूरदेखील लावला.

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे घरोघरच्या ‘पप्पा-मम्मी’ आणि शाळेतल्या ‘टीचर-मॅम’ या मंडळींना फारसा फरक पडणार नाही, हे तर खरेच. पण दिवसेंदिवस मराठीचे जे मातेरे होत चालले आहे, त्याला काही प्रमाणात तरी आळा घालण्यासारखे उपक्रम राबवता येतील, हे नसे थोडके. ‘झाले गेले गंगेस मिळाले’ असे म्हणून मायमराठीच्या नव्या बिरुदासाठी मराठीजनांनी आता सिद्ध व्हावे हे इष्ट.

मराठी भाषेसह प्राकृत, पाली, आसामी आणि बंगाली या भाषांनाही अभिजात दर्जा बहाल करण्यात आला आहे. मराठीचा एक मुद्दा राजकारणाच्या धुळवडीतून एकदाचा बाहेर गेला, ही आणखी एक स्तुत्य बाब. नाहीतरी ते एक तोंडीलावणेच होते. आता यापुढे तरी मराठीची हेळसांड आटोपती घेऊन अभिजात दर्जाला शोभेसा मायमराठीचा वापरही अभिजात प्रकारे होईल, असे स्वप्न बघू या.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठीचे काही निकष 
• भाषेचा नोंदवलेला इतिहास हा अतीव प्राचीन स्वरूपाचा म्हणजे 1500-2000 वर्षं जुना हवा.
• या भाषेत प्राचीन साहित्य हवं.
• भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावं, ती कोणत्या भाषेतून उसनी घेतलेली नसावी. 
•'अभिजात' भाषा ही आजच्या भाषेपेक्षा निराळी हवी.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter