"एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नव्हते. मित्र पक्षाची यादी वेळेवर हाती आली नाही. उमदेवारी अर्ज परत घेण्यासाठी आजची शेवटची मुदत असल्याने निर्णय घेण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे सर्वांना विचारून विधानसभेत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे," असे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सोमवारी (ता. ४ ) अंतरवाली सराटी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.
समाजाची बैठक घेऊन विधानसभेत उमेदवार उतरविण्याचा निर्णय जरांगे यांनी काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार उमेदवारांचे प्रस्ताव मागविले होते. अशा उमेदवारांना अंतरवाली सराटीमध्ये बोलावून त्यांची मतेही जाणून घेतली होती. त्यानंतर निवडणुकीची पुढील रणनीती आखण्यावर भर दिला होता. त्यानंतर विविध समाजघटकांची बैठक बोलावून मराठा, दलित, मुस्लिम एकत्रीकरणावर एकमत झाल्याचे त्यांनी नुकतेच जाहीर केले होते. मतदारसंघ निवडणे, उमेदवारांची निश्चिती यासाठी जरांगे यांनी रविवारी (ता. तीन) उशिरापर्यंत इच्छुक उमेदवार व नागरिकांसोबत चर्चा केली होती. पंधरा ते वीस जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी केली होती. याबाबतचा अंतिम निर्णय ते आज सकाळी जाहीर करणार होते. या पार्श्वभूमीवर ते नेमका काय निर्णय घेतात, याबाबत लक्ष लागले होते. अंतरवाली सराटीत आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले.
जरांगे यांनी सांगितले, "रविवारी मतदारसंघांची चाचपणी केली. मित्रपक्षाकडून आज सकाळपर्यंत यादी आली नाही. आमची सुमारे पंचवीस मतदारसंघांबाबत चर्चा झाली होती. काही मतदारसंघांबाबतचा विषय प्रलंबित होता. एका जातीवर निवडणूक लढवणे शक्य नव्हते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख होती. वेळ कमी राहिल्याने सर्वांना विचारून विधानसभेत उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारण हा आपला खानदानी धंदा नाही. राज्यात ज्यांनी अर्ज भरले आहेत, त्यांनी ते मागे घ्यावेत."
जरांगे म्हणाले, "ही निवडणूक आता आपल्याला लढायची नाही. ज्यांनी आपल्यावर अन्याय केला त्यांना या निवडणुकीत जनता धडा शिकवेल. कोणाला पाडायचे व कोणाला निवडून आणायचे हे लोकांनी ठरवावे. मतदारसंघ ठरवले होते, उमेदवारीसाठी अनेक इच्छुक होते. निश्चिती करून उमेदवारांची नावे घोषित करायच होती. माघार घ्यायची असती तर ही प्रक्रिया केली नसती. समाजाला अडचणीत आणायचे नाही. गनिमी कावा करून समोरच्यांना धडा शिकवला जाणार आहे. ज्यांना निवडून आणायचे त्यांच्याकडून समाजाने लेखी घ्यावे. मी कोणाला पाडा म्हणत नाही व निवडून आणा म्हणत नाही, तो निर्णय समाज घेणार आहे. मला कोणी डिवचले तर मात्र लोकसभा निवडणुकीप्रमाणे कार्यक्रम होणार. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला, संघटना, अपक्षांना पाठिंबा दिला नाही."
चौदा दिवस राज्यात फिरणार
■ "महायुती, महाविकास आघाडीचा माझ्यावर दबाव नाही. समाज ठरवतो त्याप्रमाणे मी काम करतो. दबावाला भीत नाही. समाजासाठी पुढील चौदा दिवसांत राज्यात फिरणार आहे. समाजासोबत ज्यांना पाडायचे आहे, त्यांना पाडणार. ज्यांनी त्रास दिला त्यांना राजकारणात सोडणार नाही," असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला. निवडणुकीनंतरही आरक्षणाचा लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ म्हणाले, "देर आए दुरुस्त आए, मराठा समाजाचे बांधव मोकळेपणाने मतदान करतील. सर्व पक्षांतून जे उमदेवार उभे आहेत, त्यापैकी ६० ते ७० टक्के उमेदवार मराठा समाजाचे आहेत. त्यामुळे जरांगे यांचा निर्णय योग्य आहे."