मराठा, दलित, मुस्लिम एकत्र येण्यावर एकमत - मनोज जरांगे

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 Months ago
पत्रकारांशी संवाद साधताना सज्जाद नोमानी आणि अन्य नेते
पत्रकारांशी संवाद साधताना सज्जाद नोमानी आणि अन्य नेते

 

वडीगोद्री (ता. अंबड)

"राज्यात गरिबांना न्याय मिळावा यासाठी सत्ता परिवर्तन होणार आहे. त्यासाठी मराठा, मुस्लिम, दलित एकत्र येण्यावर एकमत झाले आहे. समीकरण जुळले आहे. विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार कोण? मतदारसंघ कोणते? याबाबतचा एकत्रित निर्णय तीन नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणार आहे," अशी माहिती मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी दिली.

विधानसभा निवडणुकीची पुढील रणनीती ठरविण्यासाठी जरांगे यांनी आवाहन केल्यानुसार गुरुवारी (ता. ३१) अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे मराठा, दलित नेते-प्रतिनिधी, मुस्लिम धर्मगुरूंची बैठक झाली. या बैठकीला जरांगे यांच्यासह राजरत्न आंबेडकर, आनंदराज आंबेडकर, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू सज्जाद नोमानी आदी उपस्थित होते. 

विधानसभा निवडणुकीबाबत सविस्तर चर्चा होऊन या घटकांनी एकत्र येण्यावर एकमत झाले. मराठा, ओबीसी, शेतकरी, मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

जरांगे म्हणाले, "मराठा, दलित, मुस्लिम एकत्रित येऊन सत्ता परिवर्तन करणार. याशिवाय येत्या दोन दिवसांत ओबीसी, वारकरी संप्रदाय, महानुभाव पंथ, लिंगायत, बंजारा आदी समाज घटक, पंथांच्या प्रतिनिधींसोबत चर्चा करून आमचे संघटन अधिक मजबूत करणार आहोत. निवडणुकीसाठी आमचे उमेदवार, मतदारसंघ निश्चितीची यादी तीन नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. निश्चित केल्या जाणाऱ्या उमेदवारांचेच अर्ज कायम राहतील. इतरांनी अर्ज भरले असले तरी ते चार नोव्हेंबरला मागे घेतील. लोकशाही मार्गाने उमेदवार निवडले जातील," अशी माहिती जरांगे यांनी दिली. 

"काहीही झाले तरी मी आता मागे हटणार नाही. आम्ही धर्म परिवर्तन करायला आलो नाही तर सत्ता परिवर्तनासाठी एकत्र आलो आहोत. याद्वारे अन्याय, संकट परतवून लावणार आहोत. आम्हाला संपवायला निघालेल्यांना आम्ही राजकारणातून संपविणार आहोत," असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिला.

अन्य नेत्यांचे म्हणणे
"देशात महाराष्ट्र हे महत्त्वाचे राज्य आहे. देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात आहे. राज्यात स्नेह, प्रेम मोठे आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मावळ्यांमध्ये मुस्लिमांचाही समावेश होता. देशात हिंदू, मुस्लिम, बौद्ध आदी धर्मांचे विभाजन करण्याचे काम झाले," असे मुस्लीम धर्मगुरू सज्जाद नोमानी यांनी सांगितले. 

तर, मनोज जरांगे यांच्यासोबत चर्चा झाली असून आम्ही एकत्र येऊन निवडणुकीमध्ये काम करणार आहोत. आजच्या बैठकीमुळे दलित समाजाला मोठी संधी मिळाल्याचे मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले. 

जरांगेंमुळे गोरगरीब समाजासाठी विधानसभा निवडणुकीची दारे मोकळी होत आहेत. प्रस्थापित पक्षांकडे उमेदवारी मागण्यासाठी जेवढी गर्दी होते, त्यापेक्षा मोठी गर्दी अंतरवाली सराटी येथे होत आहे. हा मोठा बदल आहे, असे राजरत्न आंबेडकर यांनी सांगितले.