Maharashtra Election 2024 : 'या' दिवशी होणार महाराष्ट्रात मतदान

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 3 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. नुकतीच निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली. यामध्ये निवडणूक आयोगाकडून बहुप्रतिक्षित असणाऱ्या महाराष्ट्रसह झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. राज्यात आचारसंहिता लागू झाली असून आतापासूनच सर्व राजकीय पक्षांवर विशिष्ट निर्बंध लागले आहेत. २५ नोव्हेंबरला सध्याच्या सरकारचा कार्यकाळ समाप्त होत आहे. तर पुढील ४१ दिवसात राज्याला नवीन सरकार मिळणार आहे. २०१९ निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक चढ-उतार आणि सत्तासंघर्ष पाहायला मिळाला आहे.
 
महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा 
नुकतीच निवडणूक आयोगाची दिल्ली येथे पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. निवडणुकांची घोषणा करताना राजीव कुमार म्हणाले, " महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणूका एकाच टप्प्यात होतील. संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान पार पडेलमहाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान घेतले जाईल तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.”  

असा असणार निवडणुकांचा कार्यक्रम
निवडणूक प्रक्रियेची माहिती देताना राजीव कुमार म्हणाले, “ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांना  २३ ते २९ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० ऑक्टोबरला उमेदवारी अर्जाची छाननी करण्यात येईल. तसेच उमेदवारला त्याचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस असेल.“

मतदार आणि मतदान केंद्रांची माहिती 
महाराष्ट्रातील मतदार आणि मतदान केंद्रांची माहिती देताना राजीव कुमार म्हणाले, “ या विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण ९ कोटी ३ लाख मतदार भाग घेतील. यामध्ये ४ कोटी ९३ लाख पुरुष तर ४ कोटी ६० लाख महिलांचा समावेश आहे. तसेच १८ लाख ६७ हजार नवमतदार, ६ लाख २ हजार दिव्यांग तर १२ लाख ५ हजार ज्येष्ठ मतदार असतील. याशिवाय महाराष्ट्रात एकूण १ लाख १८६ मतदान केंद्र आहेत. यामध्ये ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ तर शहरी भागात ४२ हजार ६०४ मतदान केंद्र आहेत.”     

राजीव कुमार यांनी निवडणुकीची घोषणा करताना जास्तीत जास्त महाराष्ट्रातील मतदारांनी मतदान करावे असे आवाहन देखील केले. तसेच यावेळी त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या जम्मू काश्मीर आणि हरियाणा च्या जनतेचे आभार मानले. ते म्हणाले,  "हरियाणा आणि जम्मू कश्मीरमध्ये निवडणुका पार पडला. यामध्ये कोणत्याही प्रकारची हिंसा पाहायला मिळाली नाही. याठिकाणच्या मतदारांनी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडून मतदान केले. लोकशाहीचा उत्सव साजरा केला."

निवडणूक आयोगाच्या देणार विविध सुविधा 
  • व्होटर ॲपवर मतदार सर्व माहिती तपासू शकतात

  • तुमचा उमेदवार कोण हे ॲपवर पाहण्याची सुविधा

  • मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्यांसाठी घरातून मतदानाची सुविधा 

  • तुमचा बुथ कुठे आहे याची माहितीही ॲपवर मिळणार 

  • पैसे, मद्य, ड्रग्जचं वाटप यावर कडक नजर ठेवण्यात येणार

  • पोलिसासंह सर्व अधिकाऱ्यांचं कडक लक्ष असणार 

  • प्रत्येक बूथवर सर्व सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न 
 
ऐतिहासिक  समीकरणांची निवडणूक 
यंदाची महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक समीकरणांची असणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या फूटी नंतर पहिल्यांदा राज्यात निवडणूका होत आहेत. महायुती आणि महाविकास एकमेकांसमोर लढणार आहेत. याशिवाय शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना स्वतःला सिद्ध करावे लागणार असून  त्यांना पूर्वीच्याच पक्षाचे आव्हान असणार आहे. 

महाराष्ट्र विधानसभेचे २०१९ चे निकाल 
भाजप – १०५ , शिवसेना – ५६, राष्ट्रवादी – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ०३, प्रहार जनशक्ती – ०२, एमआयएम – ०२, समाजवादी पक्ष – ०२, मनसे – १, माकप – १, जनसुराज्य शक्ती – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, शेकाप – १, रासप – १, स्वाभिमानी – १, अपक्ष – १३ 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter