आज संपन्न होणार महाकुंभमेळा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 8 h ago
महाकुंभ २०२५
महाकुंभ २०२५

 

गेल्या ४५ दिवसांपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू आहे. करोडो भाविकांना या महाकुंभमेळ्यात सहभाग घेतला. आज कुंभाचा शेवटचा दिवस असून प्रयागराजच्या रेल्वे स्थानकावर गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. यासाठी रेल्वे प्रशासनाने योग्य उपाययोजनादेखील केल्या आहेत. 

महाकुंभ दर १२ वर्षांनी आयोजित केला जातो. कुंभमेळ्यात स्नान केल्याने मोक्ष मिळतो असा भाविकांना विश्वास आहे. मागील ४४ दिवसांत ६५ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र संगमात स्नान केले आहे. प्रयागराजच्या संगमात होणाऱ्या स्नानाच्या आणि व्यवस्थेच्या बाबतीत काही विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले असले तरी, ते यशस्वीपणे सोडवले गेले आहेत.

महाकुंभाला येणाऱ्यांच्या संख्येची तुलना १९३ देशांच्या लोकसंख्येशी केली गेली आहे. योगी सरकारच्या मते, महाकुंभात येणारे भाविक जगातील हिंदूंच्या लोकसंख्येच्या निम्म्या लोकसंख्येइतके आहेत.

महाकुंभाच्या शेवटच्या स्नानाच्या पार्श्वभूमीवर, २५ फेब्रुवारीच्या संध्याकाळपासून प्रयागराज शहरात वाहनांना प्रवेश बंद करण्यात आले. कुंभमेळ्यात वाहने जाऊ दिली जात नाहीत. रात्रीपासूनच संगमकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठी गर्दी असते. संगम घाटावर स्नान झाल्यावर, गर्दी होऊ नये म्हणून भाविकांना घाट रिकामा करण्यास सांगितले जात आहे.

महाकुंभाच्या शेवटच्या स्नान महोत्सवाच्या निमित्ताने रेल्वे प्रशासनाने प्रयागराजच्या आठ रेल्वे स्थानकांवरून ३५० नियमित आणि विशेष गाड्या चालवण्याची तयारी केली आहे. दर चार मिनिटांनी गाड्या उपलब्ध होणार आहेत. महाशिवरात्रीसाठी प्रयागराज, लखनऊ आणि वाराणसी विभागातील डीआरएमनीदेखील आपल्या पदभाराचा स्वीकार केला आहे. काही विशेष गाड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

महाकुंभ २०२५ मध्ये शेवटचे अमृत स्नान २६ फेब्रुवारी रोजी होणार आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांच्या त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, बंगाल आणि इतर राज्यांतील लाखो यात्रेकरू प्रयागराजमध्ये जमा झाले आहेत.

या स्नानानंतर, हे यात्रेकरू आपापल्या घरी परततील. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी उत्तर मध्य रेल्वे, उत्तर पूर्व रेल्वे आणि उत्तर रेल्वे प्रशासनाने तयारी केली आहे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामावर दक्षतेने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाशिवरात्रीच्या स्नानानंतर अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवण्याची व्यवस्था केली गेली आहे. प्रयागराज स्थानकाजवळ अतिरिक्त बोग्या उभ्या ठेवल्या आहेत.

महाकुंभ दरम्यान सुरुवातीला सुमारे १३,५०० रेल्वे गाड्यांची व्यवस्था केली होती. पण ४२ व्या दिवशी विशेष गाड्यांसह १५,००० गाड्या चालवण्यात आल्या आहेत.

केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव रेल्वे यंत्रणेवर लक्ष ठेवून आहेत. रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार आणि तिन्ही रेल्वे मंडळांचे महाव्यवस्थापकही कार्यक्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. महाकुंभासाठी येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी अतिरिक्त रेल्वेगाड्या चालवण्याचे निर्देश रेल्वेमंत्र्यांनी दिले आहेत.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter