उत्तराखंडमध्ये मदरशांना देता येणार नाही UG आणि PG ची डिग्री

Story by  Fazal Pathan | Published by  Fazal Pathan • 23 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

अलीकडच्या काही वर्षांमध्ये उत्तराखंड सरकारने मदरशांचे नीट निरीक्षण केले. संबंधित सरकारने राज्यातील अवैध मदरशांचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. या कृतीतून उत्तराखंड सरकार मदरशांबद्दल कठोर असल्याचे दिसून आले. 

सर्वोच्च न्यायालयाने मदरशांमधून दिले जाणारे आलिम आणि फाजिल कोर्स बंद केले आहेत. नुकतेच उत्तर प्रदेशच्या एका प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मदरशांमधून देण्यात येणाऱ्या डिग्रीविषयी महत्वाचे विधान केले. सर्वोच्च न्यायालय म्हणाले, “मदरसा बोर्डकडून दिल्या जाणाऱ्या आलिम आणि फाजिल डिग्री असंविधानिक आहे. तसेच ती UGCच्या नियमांविरोधात आहेत. आलिम आणि फाजिल डिग्री फक्त विश्वविद्यालयाकडूनच दिल्या जाऊ शकतात.” 

यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत उत्तराखंड सरकारने मदरशांमधून देण्यात येणाऱ्या डिग्रीवर बंदी घातली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि मदरसा बोर्डाच्या कार्यप्रणालीवर परिणाम होऊ शकतो. या मदरसांमध्ये धार्मिक आणि पारंपरिक शिक्षण दिले जाते. मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी या डिग्र्यांचे मोठे महत्त्व आहे. भविष्यात रोजगाराच्या संधींसाठी संबंधित डिग्र्यां मदत करू शकतात. परंतु मदरशांमधून देण्यात येणाऱ्या डिग्र्या रद्द केल्या तर अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल. सोबत त्यांचे भविष्य अंधारात जाईल.  

मदरसा बोर्ड न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार 
सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतर उत्तराखंड मदरसा बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करणार असल्याचे सांगितले आहे. या निर्णयामुळे उत्तराखंडमध्ये मदरशांमधून आलिम आणि फाजिल  डिग्री देता येणार नाही.

मदरसा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी याविषयी बोलताना म्हणतात, “उत्तराखंड मदरसा बोर्डमध्ये एकूण ४१५ मदरशा नोंदणीकृत आहेत. यामध्ये ४६ हजाराहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. उत्तराखंडमधील मदरसा बोर्ड सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार आहे. त्यामुळे आलिम आणि फाजिल कोर्ससाठी परीक्षा फॉर्म भरवले जाणार नाहीत. आतापर्यंत परीक्षा फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना फी परत केली जाईल.”   

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया  
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जाणकारांच्या म्हणण्यानुसार हा निर्णय मदरशांना राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या संलग्न काम करण्यासाठी महत्वाचा ठरेल. यामुळे  विद्यार्थ्यांना योग्य आणि प्रमाणित डिग्र्या मिळतील. तर दुसऱ्या काही मुस्लिम जाणकारांच्या मते ‘मदरसा प्रणालीचे एक विशिष्ट सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे आणि मदरशांमधून देण्यात येणाऱ्या डिग्र्या रद्द केल्यामुळे मुस्लिमांच्या धार्मिक शिक्षणावर परिणाम होईल.

आलिम आणि फाजिल डिग्री काय आहे? 
मदरसा बोर्डाकडून मिळणारी आलिम डिग्रीला ग्रॅज्युएट (UG) आणि फाजिल डिग्रीला पोस्ट ग्रॅज्युएट (PG) डिग्रीसमान मानले जाते. याशिवाय, तहतानिया (प्राथमिक), फौकानिया (ज्युनियर हायस्कूल), आलिया (हायर सेकंडरी) प्रमाण मान्यता दिली जाते. आलिया स्तराच्या मदरशांमध्येआलिम आणि फाजिल डिग्र्या दिल्या जातात.

डिग्री वैध केली जाणार 
जमीयत उलेमाए हिंदचे जिल्हाध्यक्ष मौलाना अब्दुल मन्नान कासमी यांनी आलिम (UG) आणि फाजिल (PG) डिग्री वैध करण्यासाठी एक नवीन विचार दिला आहे. ते म्हणतात, “हे दोन्ही कोर्सेस बंद करण्यापेक्षा, त्यांना बिहारच्या पद्धतीने कोणत्यातरी विश्वविद्यालयाशी संलग्न करणे चांगले ठरेल.”  यावर मदरसा बोर्डाचे अध्यक्ष मुफ्ती शमून कासमी म्हणतात, "आचार संहिता समाप्त झाल्यानंतर बोर्डाची बैठक बोलावून परीक्षा फॉर्मच्या तारखा वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाईल."

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter