पहलगाममधील पर्यटकांना मदरशाने दिला आश्रय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 7 h ago
पर्यटकांना मदत करताना मदरशातील व्यक्ती.
पर्यटकांना मदत करताना मदरशातील व्यक्ती.

 

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील बैसारण मेदानात दहशतवाद्यांनी सैलान्यांवर हल्ला केला. या क्रूर हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक नागरिक जखमी झाले. या संकटाच्या काळात स्थानिक काश्मिरी लोकांनी दाखवलेली माणुसकी आणि धैर्य यामुळे सगळ्यांचं मन जिंकलं. पहलगाममधील स्थानिकांनी आपली घरं आणि मदरसे पर्यटकांसाठी खुले केले. स्वतःचा जीव धोक्यात घालून अनेक पर्यटकांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं.

पर्यटकांनी घेतला मदरशामध्ये आश्रय 
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आले. यामुळे अनेक पर्यटक रस्त्यावरच अडकले होते. या हल्ल्याने पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण होते. त्यांना मदतीची गरज असताना स्थानिक मुस्लिमांनी स्वतःची घरे उघडत पर्यटकांना मदत केली. तर दुसरीकडे राजौरीच्या मंजाकोट येथील जामिया झिया-उल-इस्लाम मदरशाने संकटात सापडलेल्या सुमारे ५० पर्यटकांना आश्रय दिला. या मदरशाच्या व्यवस्थापकांनी सांगितलं, “मी या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. काश्मिरमध्ये शांततापूर्ण वातावरण आहे. दहशतवाद्यांनी या शांततेला भंग केलं आहे.”

पुढं ते म्हणतात, “आमची (मदरशाची)  दारं सर्वांसाठी खुली आहेत. अडचणीत असलेल्या प्रत्येकाला मदत करण ही आमच्या धर्माची इस्लामची शिकवण आहे. आमच्या मदरशाने त्याच शिकवणीचे पालन केलं आहे. आम्ही या पर्यटकांसाठी राहण्याची, जेवणाची आणि सुरक्षेची व्यवस्था केली आहे.” 

पर्यटकांची सेवा केला नंतर मदरशातील नागरिकांनी पर्यटकांना निरोप दिला. निरोप देताना त्यांनी पर्यटकांना भेटवस्तू आणि शुभेच्छा देऊन सन्मानाने पाठवलं.  

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दहशतवाद्यांशी भिडला आदिल 
या हल्ल्यात स्थानिक काश्मिरी तरुण सय्यद आदिल हुसेन शहा याने आपल्या प्राणाची पर्वा न करता पर्यटकांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पहलगामच्या बैसारण मेदानात घोड्यांवर सैर करवणारा सय्यद आदिल हा त्याच्या कुटुंबाचा एकमेव कमावता सदस्य होता. हल्ल्यादरम्यान त्याने एका दहशतवाद्याची रायफल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण दहशतवाद्यांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या. सय्यद आदिल याने वीरमरण स्वीकारलं. त्याच्या अंत्ययात्रेला जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनीही हजेरी लावली. ते म्हणाले, “आदिलने पर्यटकांना वाचवण्यासाठी दहशतवाद्यांशी झुंज दिली. त्याच्या कुटुंबाला सरकारकडून सर्वतोपरी मदत देकरण्यात येईल.” 

पहलगाम हल्ल्यादरम्यान अनेक स्थानिकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता पर्यटकांना वाचवलं. काहींनी आपली घरं खुली केली, तर काहींनी धोकादायक भागातून सैलान्यांना सुरक्षित ठिकाणी नेलं. एका स्थानिक मार्गदर्शकाने गोळीबाराचा आवाज ऐकताच घोड्यांवरून जखमींना तातडीने रुग्णालयात पोहोचवलं. काश्मिरी लोकांनी दाखवलेल्या या माणुसकीमुळे अनेकांचे प्राण वाचले. स्थानिकांनी बाजारपेठा, शाळा आणि व्यवसाय बंद ठेवून या हल्ल्याचा निषेध केला आहे. काश्मीरमधील अनेक वृत्तपत्रांनी आपल्या पहिल्या पानावर काळा रंग छापून सामूहिक शोक व्यक्त केला.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter