दिवंगत चित्रकार एम. एफ. हुसेन
भारतीय चित्रकलेला हजारो वर्षांचा समृद्ध इतिहास आणि वारसा आहे. भारतातील दिग्गज चित्रकारांपैकी असलेले दिवंगत चित्रकार एम. एफ. हुसेन यांच्या एका चित्राने लिलावात नवा इतिहास रचला आहे. त्यांची 'अनटाइटल्ड' (ग्राम यात्रा) ही पेंटिंग न्यूयॉर्कमधील क्रिस्टीजच्या लिलावात तब्बल १.३८ कोटी डॉलर म्हणजेच सुमारे ११८ कोटी रुपयांना विकली गेली. ही किंमत आधुनिक भारतीय कलाकृतीसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी लिलावाची किंमत ठरली आहे.
न्यूयॉर्क येथील 'क्रिस्टीज ऑक्शन'मध्ये १९ मार्चला पार पडलेल्या लिलावात हुसेन यांचे हे चित्र विकले गेले. हुसेन यांनी साकारलेले ग्राम यात्रा हे चित्र ग्रामीण भागातील १३ विविध भाव प्रकट करणाऱ्या रेखाकृती यात साकारल्या आहेत. नुकतेच स्वातंत्र्य मिळालेल्या देशातील विविधता आणि चैतन्य या चित्रातून रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे.
चित्राचे वैशिष्ट्य
‘ग्राम यात्रा’ हे चित्र १९५४ मध्ये हुसेन यांनी बनवली होती. ती जवळपास १४ फूट लांब आहे आणि त्यात भारतीय गावांचं जीवन १३ वेगवेगळ्या दृश्यांमधून दाखवले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फक्त सात वर्षांनी बनलेली ही पेंटिंग त्या काळातल्या ग्रामीण जीवनाचे आणि नव्या भारताच्या ओळखीचे प्रतीक मानली जाते.
या चित्रामध्ये गावाकडचे साधे जीवन, शेतकरी, गाड्या, गायी आणि महिलांचे दैनंदिन काम दाखवले आहे. क्रिस्टीजच्या दक्षिण एशियाई आधुनिक आणि समकालीन कला विभागाच्या प्रमुख निशाद अवारी यांनी सांगितले, “हे चित्र हुसेन यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची कृती आहे. यात त्यांनी भारताच्या ग्रामीण जीवनाचे महत्त्व आणि स्वातंत्र्यानंतरचे बदलाव दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.”
अवारी पुढे म्हटले की, "या पेंटिंगमध्ये एक शेतकरी उभा आहे, जो एकमेव पुरुष पात्र आहे. हा शेतकरी हुसेन यांचेच स्वरूप असू शकते. हा शेतकरी अशा पद्धतीने उभा आहे ज्या दृश्यात शेत आणि गावाचे वातावरण दाखवले आहे. हा शेतकरी जमिनीचा पालनपोषण करणारा आणि रक्षक आहे." हे चित्र भारतीय आधुनिक कलेसाठी एक मैलाचा दगड मानली जाते.
कोणाकडे होते हे चित्र?
हे चित्र १९५४ मध्ये नॉर्वेचे सर्जन आणि कला संग्राहक लियोन एलियास वोलोडार्स्की यांनी नवी दिल्लीत खरेदी केले होते. ते तेव्हा जागतिक आरोग्य संघटनेसाठी (WHO) भारतात काम करत होते. १९६४ मध्ये त्यांनी ही पेंटिंग ओस्लो यूनिवर्सिटी रुग्णालयाला भेट म्हणून दिले होते. तिथे ती एका निजी न्यूरोसाइंस कॉरिडोरमध्ये ठेवली गेली होती. त्यामुळे गेल्या ७० वर्षांत ती फारच कमी लोकांना पाहायला मिळाली.
ओस्लो यूनिवर्सिटी हॉस्पिटलने जेव्हा ते चित्र विकायचे ठरवले, तेव्हा क्रिस्टीजने ती लिलावात आणण्यासाठी १३ वर्षं मेहनत घेतली. या लिलावतून मिळालेला पैसा आता डॉक्टरांच्या ट्रेनिंग सेंटरसाठी वापरला जाणार आहे. त्या ट्रेनिंग सेंटरला डॉ. वोलोडार्स्की यांचे नाव दिल जाणार आहे.
रेकॉर्ड तोडणारा लिलाव
या लिलावाने याआधीचे सगळे रिकॉर्ड मोडले. याआधी भारतीय आधुनिक कलाकृतीचा रेकॉर्ड अमृता शेरगिल यांच्या ‘द स्टोरी टेलर (१९३७)’ या चित्राच्या नावावर होता. ते चित्र सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबईत ७४ लाख डॉलरला (६३ कोटी ) विकली गेली होती. हुसेन यांची याआधीचे सर्वात महागडे चित्र ‘अनटाइटल्ड (रीइनकार्नेशन)’ सप्टेंबर २०२३ मध्ये लंडनच्या सोथबीजमध्ये ३१ लाख डॉलरला (२६ कोटी) विकले गेले होते. परंतु ‘ग्राम यात्रा’ ने हे सगळे रिकॉर्ड मोडले आणि भारतीय कलेला जागतिक पातळीवर नवी ओळख मिळवून दिली आहे.
चित्र कोणी खरेदी केले?
मिळालेल्या माहितीनुसार, हे चित्र एका अज्ञात संस्थेने खरेदी केले आहे. काहींच्या मते ही संस्था किरण नादर म्युझियम ऑफ आर्ट (KNMA) असू शकते. किरण नादर या भारतातल्या प्रसिद्ध कला संग्राहक आहेत आणि त्यांच्याकडे हुसेन यांचे अनेक चित्र आहेत. परंतु, याबाबत अद्याप अधिकृत माहिती आलेली नाही. लिलावात पाच जणांनी या चित्रासाठी बोली लावली होती, परंतु शेवटी ती या संस्थेने जिंकली असल्याची माहिती मिळत आहे.
हा लिलाव भारतीय आधुनिक कलेसाठी खूप मोठी गोष्ट आहे. निशाद अवारी म्हणाले, “हा एक ऐतिहासिक क्षण आहे. यामुळे हुसेन यांच्या कलेला आणि संपूर्ण आधुनिक भारतीय कलेला नवे स्थान मिळाले आहे. दक्षिण आशियाई कलेचा जागतिक स्तरावर मोठ्या प्रमाणात विस्तार होताना दिसत आहे.”
हुसेन यांचे महाराष्ट्राशी खास नाते
एम. एफ. हुसेन यांचा जन्म १९१५ मध्ये महाराष्ट्रातल्या पंढरपूरमधील बोहरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील कंदील बनवण्याचा व्यवसाय करत. पंढरपुरातील पांढरीच्या डोल्याजवळ त्यांचे घर होते. त्याकाळी ते जोडव्यवसाय म्हणून मंडईत आंबेही विकत. परंतु हा व्यवसाय अडचणीत आल्यावर हुसेन यांचे कुटुंबीय १९२० च्या दरम्यान प्रथम गुजरातला आणि नंतर मुंबईला गेले. त्यांचा बालपणीचा काही काळ पंढरपुरातील झारीवाड्यात गेला आहे.