समाजाला एकत्र करण्यासाठी, आपापसात बंधुभाव निर्माण करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव सुरू केल्याचे बोलले जाते. गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रभर धार्मिक सलोखा आणि सौहार्दाची कैक उदाहरणे पाहायला मिळतात. पण तुम्ही मस्जिदमध्येच गणपतीच्या स्थापनेबद्दल कधी ऐकले आहे का?
मोहरम, ईद किंवा गणेशोत्सव असो, सांगली जिल्ह्यात हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन नेहमीच घडते. महाराष्ट्रात हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येत मोठ्या उत्साहात सण साजरे करतात. त्याविषयीच्या अनेक परंपरा आपल्याला महाराष्ट्रभर पाहायला मिळतात. गोटखिंडी गावातही अशीच एक अनोखी परंपरा आहे जिला हिंदू-मुस्लीम सौहार्दाचे अनोखे उदाहरण म्हणता येईल.
सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील गोटखिंडी हे गाव गेली कित्तेक वर्षांपासून धार्मिक सौहार्दाचा वारसा जपत आहे. हिंदू मुस्लिम एक्याचे दर्शन देणारा गणेशोत्सव म्हणून पूर्ण महाराष्ट्रात या गोटखिंडी गावाचा लौकिक आहे.
मस्जिदमध्ये बसतो गणपती
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी दरगाह आणि मस्जिदच्या आवारात गणपती बसवले जातात आणि गणेशोत्सवात त्यांची विधिवत पूजाही होते. गोटखिंडीतील गणेशोत्सवाची परंपराही काहीशी अशीच आहे. तब्बल चार दशकांहून अधिक काळापासून इथल्या गणेशोत्सवात गणपतिची स्थापना चक्क मस्जिदच्या प्रवेशद्वारावर होते. या परंपरेचा इतिहासही रंजक आहे. त्याविषयी माहिती देताना या न्यू गणेश मंडळाचे सचिव राहुल कोकाटे म्हणतात, “ न्यू गणेश मंडळाने ४३ वर्षांपूर्वी गोटखिंडी गावात झुंजार चौकामध्ये नेहमीप्रमाणे हिंदू बांधवांनी गणपती बसवला होता. मात्र त्यावेळी प्रचंड पाऊस झाला आणि मंडळाने बसवलेल्या गणपतीच्या मूर्तीवर पाणी गळू लागले. तेव्हा त्या गणेश मंडळाच्या मागच्याच बाजूला असलेल्या मस्जिदमधील ज्येष्ठ मुस्लीम मंडळींनी गणपतीची मूर्ती मस्जिद मध्ये आणून ठेवण्यास सांगितले.”
पुढे ते सांगतात, “मुस्लिम बांधवांच्या या निर्णयामुळे गणपतीचे पावसापासून रक्षण झाले. पुढच्या वर्षी गावात एक बैठक घेतली गेली. पुढील काळात मस्जिदच्या आवारात गणपतीची स्थापना करण्याचे त्यावेळी ठरले. दोन्ही समाजाने आनंदाने या निर्णयास मान्यता दिली. पूर्वी मूर्तीची स्थापना मस्जिदच्या बाहेरच्या बाजूला व्हायची. आता मस्जिदच्या प्रवेशद्वारावर गणेश स्थापना केली जाते.”
मुस्लिम होतात गणेशोत्सवात सहभागी
गोटखिंडीतील मुस्लीम समाजाने चार दशकांपूर्वी गावातील हिंदूंना मदतीचा आणि सहकार्याचा हात दिला. गणेशोत्सवाच्या काळात मस्जिदच्या आवारात गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्याची परवानगी देऊन त्यांनी हिंदू मुस्लीम ऐक्याचे आणि धार्मिक सौहार्दाचे अनोखे दर्शन घडवले. या गणेशोत्सवासाठी सर्वतोपरी मदतीसाठी गावातील मुस्लिम समाज तत्पर असतो. गणेशोत्सवाच्या काळातही मुस्लीम कार्यकर्ते सेवेसाठी तत्पर असतात. बरेचदा गणपतीची आरती झाल्यानंतर प्रसाद वाटप देखील मुस्लिम बांधवच करतात.
हिंदू मुस्लिम ऐक्य ही गोटखिंडीची परंपरा
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे २००९ मध्ये गणपतीच्या काळातच मोठी दंगल झाली होती. दोन्ही समाजात त्यावेळी मोठी तेढ निर्माण झाली होती. मात्र तिथून अवघ्या काही किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या गोटखिंडी गावात मात्र सर्व काही अलबेल होते. दंगल काळातही इथले हिंदू मुस्लीम ऐक्य आणि धार्मिक सलोखा अबाधित राहिला.
अनंत चतुर्दशी आणि बकरी ईद एकत्र साजरी
गेल्या काही वर्षात दोन-तीन वेळा बकरी ईद आणि अनंत चतुर्दशी एकाच दिवशी आली होती. बकरी ईद मुस्लिम बांधवांच्या प्रमुख सणांपैकी एक तर अनंत चतुर्दशी महत्वाच्या हिंदूंच्या सणांपैकी एक. या परिस्थितीत मुस्लिम समाजाने बकरी ईद साजरी केली नाही. मुस्लिम बांधवांनी कुर्बानी न देता हा सण अनंत चतुर्दशीच्या नंतर साजरा केला.
मोहरम आणि गणेशोत्सवाची माहिती देताना सचिव राहुल कोकाटे सांगतात, “१९८६ मध्ये आणि २०१८-१९ मध्ये मोहरमचा आणि गणेशोत्सवाचा सण एकत्रित आला. यावेळी देखील हिंदू मुस्लिम समाजाने मिळून मोहरमच्या पंजांची स्थापना आणि गणपतीची स्थापना एकाच ठिकाणी केली होती.”
प्रबोधनात्मक कार्यक्रमासाठी हिंदू-मुस्लिम एकत्र
गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील प्रमुख उत्सावांपैकी एक. या सणाचे औचित्य साधून सार्वजनिक मंडळे दहा दिवस विविध सांस्कृतिक उपक्रमांचे, स्पर्धांचे आयोजन करतात. प्रबोधनात्मक कार्य करण्यासाठी न्यू गणेश मंडळाचे हिंदू-मुस्लिम अशा दोन्ही समाजातील युवक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. यावेळी ते एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून गणेशोत्सवातील आयोजित विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पाडतात.
गोटखिंडीतील हिंदू आणि मुस्लीम समाज
थील मुस्लिम समाज हिंदू बांधवांच्या सणसमारंभांमध्ये कायमच उत्साहाने सहभागी होतो.याविषयी गावातील मुस्लिम मंडळी सांगतात, “कोणताही सण असो मंडळाचे सर्व कार्यकर्ते एकमेकांच्या घरी हक्काने जातात. सण-सुद म्हटल की आम्हाला आम्ही हिंदू आहोत, आम्ही मुस्लिम आहोत अशी भावना येत नाही. आम्ही सर्वजण एक आहोत याच भावनेतून आम्ही एकत्रित येऊन विविध सण समारंभ साजरे करतो.”
गोटखिंडीच्या हिंदू आणि मुस्लिमांनी चार दशकांपासून जपलेल्या धार्मिक सौहार्दाची ही परंपरा केवळ महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आदर्शवत आहे.