जगभारत अजमेर शरीफ या नावाने सुलतानुल हिंद हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती रहमतुल्लाह अलेह यांची दर्गा प्रसिद्ध आहे. या दर्ग्याचा उरुस सध्या मोठ्या उत्साहात सुरू आहे. जगभरातून मोठ्या संख्येने भाविक या दर्गेला भेट देतात. उरुसात सहभागी होतात. तसेच दर्ग्यावर चादर चढवून आपली श्रद्धा व्यक्त करतात. अजमेर शरीफ दर्ग्याचा उरुस केवळ धार्मिक सोहळा नसून, हा भारतातील सांस्कृतिक ऐक्याचा उत्सव मानला जातो. हा सोहळा धार्मिक आणि सामाजिक सलोखा, एकता, आणि मानवी मूल्यांचा संदेश देतो.
यंदा अजमेर शरीफ दर्ग्याचा उरुसाचे ८१३ वे वर्ष आहे. या उरूसाच्या निमित्ताने देशातील आणि राज्यातील काही महत्वाच्या राजकीय नेत्यांनी देखील अजमेर शरीफ दर्ग्यावर अर्पण करण्यासाठी चादर पाठवली आहे.
अजमेर शरीफ दर्ग्यावर राजकीय व्यक्तींची चादर
महाराष्ट्रातून अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाच्यावतीने ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दरग्यावला चादर पाठवण्यात आली आहे. यासंदर्भात दोन्ही नेत्यानी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट करत माहिती दिली आहे. अजित पवार ट्वीटमध्ये म्हणतात, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यावर चढवण्यात येणारी चादर घेऊन पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आमेर जेतपुरवाला आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. राजस्थानच्या अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या कबरीवर दरवर्षी जगभरातील विविध धर्माचे लोक मोठ्या श्रद्धेने चादर चढवतात. यंदा या उरुसाचे ८१३ वे वर्ष असून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पक्षाच्या वतीने अजमेर शरीफ दर्ग्यात चादर चढवली जाणार आहे. या चादरीला हात लावून ती मोठ्या श्रद्धेने अजमेरकडे रवाना करण्यात आली.”
शरद पवार यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहले, “देशभरात शांतता व बंधूभाव नांदावा आणि देशाचे सामाजिक ऐक्य अबाधीत रहावे; या भावनेने नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने अजमेर शरीफ येथील ख्वाजा मोईनोद्दीन चिश्ती यांच्या उर्स ए मुबारक निमित्त पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सिराज मेहदी यांच्या माध्यमातून चादर पाठवण्यात आली आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर जाऊन ही चादर चढवतील.”
अजित पवार आणि शरद पवारांच्या आधी (दि. २ जानेवारी) देशाचे पंतप्रधान नरेंद्र यांनी ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांना आदरांजली वाहिली. तसेच त्यांनी अजमेर शरीफ दर्ग्यावर अर्पण करण्यासाठी अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू आणि भाजपच्या अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्याकडे चादर पाठवली होती.
यावेळी त्यांनी केलेल्या ट्वीटर पोस्टमध्ये म्हटले होते, ““ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या उरूसनिमित्त विनम्र अभिवादन. हा उरुसानिमित्त सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समाधान घेऊन येवो.”
पंतप्रधान मोदी यांनी दिलेली चादर अर्पण करताना केद्रीय मंत्री किरेन रिजिजू म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नेहमीच धार्मिक सौहार्दाला प्रोत्साहन दिले आहे. अजमेर शरीफच्या उरुसाला पंतप्रधानांच्या वतीने चादर अर्पण करण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. या कृतीतून देशाच्या एकात्मतेचा संदेश दिला गेला आहे."
अजमेर दर्ग्याचा ऐतिहासिक वारसा
अजमेरचा दरगाह शरीफ हा भारतातील सर्वात महत्त्वाच्या आणि पवित्र धार्मिक स्थळांपैकी एक आहे. ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचे समाधीस्थळ आहे. त्यांना गरीब नवाज अर्थात गरिबांवर कृपा करणारा असे म्हटले जाते. मोईनुद्दीन चिश्ती १२व्या शतकातील एक महान सूफी संत आणि चिश्तिया पंथाचे संस्थापक होते.
भारतात आगमन झाल्यावर त्यांनी इस्लामच्या सहिष्णुतेच्या, प्रेमाच्या, आणि सेवाभावाच्या शिकवणींनी भारतातील लाखो लोकांच्या मनावर प्रभाव टाकला. त्यांनी अजमेर येथे राहून धार्मिक सहिष्णुतेचा आणि समाजसेवेचा संदेश दिला. त्यांनी हिंदू आणि मुस्लीम अशा दोन्ही धर्मांच्या अनुयायांना समान प्रेमाने जवळ घेतले आणि मानवतेच्या सेवेचा आदर्श निर्माण केला. त्यांची दरगाह शरीफ भारताच्या धार्मिक सलोख्याचे प्रतीक मानला जातो. येथे जगभरातून सर्वधर्मीय भाविक दर्शनासाठी येतात.
अजमेर उरुस केवळ धार्मिक सोहळा नसून, हा भारतातील सांस्कृतिक ऐक्याचा उत्सव मानला जातो. हा सोहळा धार्मिक आणि सामाजिक सलोखा, एकता, आणि मानवी मूल्यांचा संदेश देतो. दरवर्षी या सोहळ्याला देश-विदेशातून लाखो लोक हजेरी लावतात, ज्यामुळे अजमेरचा हा वारसा जागतिक पातळीवर महत्त्वाचा ठरतो.
उरुस म्हणजे काय?
उरुस हा उर्स या शब्दाचा अपभ्रंश आहे. सुफी संतांच्या पुण्यतिथीच्या दिवशी अनुयायी उर्स साजरा करतात. हा अरबी शब्द असून, त्याचा अर्थ 'विवाह' किंवा 'मिलन' असा होतो. सूफी परंपरेनुसार, संताचा मृत्यू हा ईश्वराशी त्यांच्या आत्म्याच्या मिलनाचा दिवस मानला जातो. म्हणूनच, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter