काश्मिरी तरुण झाले अधिक सक्षम - पंतप्रधान मोदी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 17 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही पाकिस्तानचा अजेंडा राबवू देणार नाही. या पृथ्वीतलावरील कोणतीही शक्ती ३७० वे कलम पुन्हा आणू शकत नाही,' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीर मधील रियासी येथील सभेत बोलताना विरोधकांना ठणकावले. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनीच नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याला पाठिंबा दिला असून, याच पक्षांनी पाकिस्तानचा अजेंडा राबविण्याचे काम केले असल्याचेही मोदी यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "जम्मू काश्मीरला लवकरच पूर्ण राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल, ही संसदेची कटिवद्धता आहे. काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) या तिन्ही पक्षांच्या
घराणेशाहीचे राजकारण संपुष्टात आणण्यासाठी स्थानिकांनी भाजपला मतदान करावे. या निवडणुकीत राज्याच्या भवितव्याचा फैसला होणार असून, विरोधी पक्षांनी नेहमीच जम्मूला सापत्न वागणूक दिली  आहे. 

काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या दोन्ही पक्षांच्या सरकारांनी आपल्या देशातील नद्यांचे पाणी पाकिस्तानात वाहून जाऊ दिले पण आम्ही मात्र त्यावर धरणे उभारली.जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करू आणि तसे आश्वासन संसदेत दिले आहे.त्यामुळे येत्या २५ सप्टेंबर रोजी विक्रमी मतदानाची नोंद व्हायला हवी," असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीरवासीयांना केले. जम्मू काश्मीरच्या तरुणांचा पुन्हा लोकशाहीवर विश्वास बसला आहे. एनडीए सरकारच्या काळात काश्मीरचे तरूण सक्षम झाले, असे प्रतिपादनही मोदी यांनी यावेळी केले.

भाजप उमेदवाराच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज शेर ए काश्मीर स्टेडिअममध्ये सभा झाली. ते म्हणाले, "जम्मू काश्मीरच्या तरुणांसाठी भाजपने रोजगाराच्या अनेक योजना आणल्या आहेत." पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राज्यातील तीन घराण्यांनी आपले राजकीय दुकान चालविण्यासाठी अनेक दशके काश्मीर खोऱ्यात केवळ द्वेष पसरविण्याचे काम केले आहे. या कारणांमुळेच स्थानिक तरुण पुढे जाऊ शकले नाहीत. दिल्लीपासून ते काश्मीरपर्यंतचे नॅशनल कॉन्फरन्स, काँग्रेस आणि पीडीपीचे लोक बिथरले आहेत. कोणत्याही स्थितीत खुर्ची बळकावयाची आणि राज्याला लुटायचे हे त्यांचे धोरणच राहिलेले आहे. काश्मीरच्या जनतेला हक्कापासून वंचित ठेवणे हा त्यांचा अजेंडाच राहिला आहे.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter