हिमवृष्टीमुळे काश्मीर खोऱ्यात जनजीवन विस्कळित झाले असून रेल्वे वाहतूक, विमान सेवा खंडित होण्याबरोबरच श्रीनगर-जम्मू राष्ट्रीय महामार्ग देखील बंद राहिला. काश्मीरमध्ये कालपासून मध्यम ते अधिक प्रमाणात हिमवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. यात श्रीनगर शहरासह खोऱ्यातील मैदानी भागांचा समावेश आहे. दक्षिण काश्मीरमध्ये मैदानी भागात प्रचंड प्रमाणात हिमवृष्टी तर मध्य काश्मीरमध्ये मध्यम स्वरूपाची हिमवर्षाव झाला आहे. उत्तर काश्मीरमध्ये मैदानी भागात किरकोळ ते मध्यम हिमवृष्टीची नोंद झाली. हिमवृष्टीचा आनंद घेताना पर्यटकांना अडकून पडण्याची वेळ आली. मात्र लष्कराने कारवाई करत त्यांना सुखरूपपणे बाहेर काढले.
जम्मू काश्मीरच्या गुलमर्ग आणि तनमर्ग येथे अडकून पडलेल्या ६८ पर्यटकांना काल रात्री लष्कराने मोहीम राबवत सुरक्षितपणे बाहेर काढले. हिमवृष्टीमुळे रस्तेमार्ग बंद पडला होता. त्यामुळे तीस महिला, आठ मुलांसह ६८ जण खोऱ्यात अडकून पडले होते. लष्कराने बचावकार्य राबवत ६८ जणांना सुरक्षित ठिकाणी नेले. त्यांच्या निवाऱ्यांची आणि औषधोपचाराची व्यवस्था करण्यात आली. हिमवृष्टीमुळे श्रीनगर-लेह आणि मुघल रोड बंद पडला. तसेच श्रीनगर-जम्मू महामार्गावर सुमारे दोन हजारांपेक्षा अधिक वाहने अडकून पडली होती. शिवाय आज सकाळी श्रीनगर विमानतळावरून ८० टक्के उड्डाणे रद्द करण्यात आल्याने प्रवाशांना विमानतळावर बराच काळ ताटकळत बसावे लागले.
दरम्यान, उत्तर भारतात पाऊस आणि दाट धुक्याचे सावट राहिले. दाट धुक्यामुळे दिल्लीत चौदापेक्षा अधिक रेल्वेगाड्यांना विलंब झाला. दिल्लीत गेल्या चोवीस तासांत सुमारे नऊ मिलीमीटरचा पाऊस पडला. गेल्या पंधरा वर्षांत डिसेंबर महिन्यातला हा सर्वाधिक पाऊस होय. तसेच राजस्थानच्या अजमेरमध्ये डिसेंबर महिन्यात गेल्या चोवीस तासांत २१.४ मिलिमीटर विक्रमी पाऊस नोंदला गेला.त्यामुळे गेल्या चौदा वर्षांत डिसेंबरमधील सर्वाधिक पाऊस म्हणून नोंद झाली आहे. उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरपूर येथे वादळी वाऱ्यासह पावसाने एका घराची पडझड झाली. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. पाऊस आणि थंडीच्या लाटेमुळे गाझियाबाद व मेरठ येथे आठवीपर्यंतच्या शाळांना सुटी देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत पावसाची नोंद झाली.
श्रीनगरमध्ये आठ इंच हिमवृष्टी
जम्मू काश्मीरची राजधानी श्रीनगर येथे सुमारे आठ इंच हिमवृष्टीची नोंद झाली आहे. गंदरबल येथे सात इंच बर्फ पडल्याची नोंद झाली आहे. लोकप्रिय पर्यटनस्थळ सोनमर्ग येथे सुमारे आठ इंच हिमवृष्टी झाली आहे. श्रीनगर-लेह महामार्गावरील जोझिला पास भागात सुमारे पंधरा इंच हिमवृष्टीची नोंद झाली आहे. बडगाम जिल्ह्यात सात ते दहा इंच हिमवृष्टी झाली. अनंतनाग जिल्ह्यातील मैदानी भागात सुमारे १७ इंच हिमवृष्टी झाली. दक्षिण काश्मीरच्या वरच्या भागात दोन फुटापेक्षा अधिक हिमवृष्टी झाल्याची नोंद आहे.
काश्मीरमधील हिमवृष्टी