नंदनवनातील पर्यटनाला 'असा' आला बहार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू-काश्‍मीरमध्ये सध्या उन्हाळी पर्यटन जोमात सुरू आहे. दल सरोवर, मुघल बागांसह ट्युलिपच्या फुलांचे आकर्षणाने काश्‍मीरला भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ होत आहे. यंदा जानेवारीपासून आतापर्यंत पाच लाख २५ हजार २७२ पर्यटकांनी नंदनवनाला भेट दिली आहे. हिमवर्षावाबरोबरच सध्या चैत्रातील फुललेल्या काश्‍मीरचा अनुभव पर्यटक घेत आहे. वाढत्या पर्यटनामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठे बळ मिळत असून पर्यटनावर उपजीविका करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

त्याठिकाणी असलेल्या पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, "पर्यटनासाठी २०२५ हे वर्ष अलीकडच्या काळातील सर्वोत्तम ठरत आहे. गुलमर्ग येथे मार्च महिन्यात आयोजित खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेमुळेही पर्यटकांची पावले काश्‍मीरकडे वळली आहेत. यानिमित्त काश्‍मीरला आलेल्या साहसी क्रीडाप्रेमींचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले."

दल सरोवरातील शिकाराचे मालक मुश्‍ताक अहमद यांनी सांगितले की, "दल सरोवर पुन्हा एकदा पर्यटकांनी बहरले आहे. पर्यटक शिकारा फेरीचा आनंद लुटत आहेत. पर्यटनावर पोट असणाऱ्या आमच्यासारख्यांसाठी ही आनंदाची बाब आहे."

तर दल सरोवरातील दुसऱ्या शिकाराचे मालक बशरत अहमद यांनी सांगितले की, "जानेवारीपासून आम्ही खूप व्यग्र झालो आहोत. गेल्या वर्षीच्या तुलनेत माझ्या गाडीचे आरक्षण दुप्पट झाले आहे. हीच स्थिती पुढेही कायम राहील, अशी आशा आहे."