काश्मीर : दहशतवादविरोधी लढ्याला 'असे' मिळणार बळ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Fazal Pathan • 1 d ago
सीआरपीएफचे महासंचालक (डीजी) ज्ञानेंद्र प्रताप सिंह
सीआरपीएफचे महासंचालक (डीजी) ज्ञानेंद्र प्रताप सिंह

 

केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी कारवायांसाठी एक नवीन विशेष कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रिझोल्युट अॅक्शन) बटालियन स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील नीमच येथे सीआरपीएफच्या 86व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सीआरपीएफचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंग यांनी ही घोषणा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार ही बटालियन तयार होणार असून, यामुळे जम्मू-काश्मीरमधील जंगल आणि डोंगराळ भागात दहशतवादविरोधी कारवायांना अधिक बळ मिळणार आहे.  

सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “ही नवीन कोब्रा बटालियन जम्मू-काश्मीरच्या जंगल आणि डोंगराळ भागात विशेषतः जम्मू परिसरात दहशतविरोधी कारवायांसाठी तैनात केली जाईल. गेल्या काही काळात जम्मू परिसरात दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. यापूर्वी 2023 मध्ये कोब्रा बटालियनच्या काही तुकड्यांना काश्मीर खोऱ्यात प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले होते. पण त्यांना प्रत्यक्ष कारवायांमध्ये सहभागी केले नव्हते. सध्या सीआरपीएफच्या नियमित तुकड्या आणि ‘काश्मीर व्हॅली क्विक अॅक्शन टीम (क्यूएटी)’ दहशतवादविरोधी मोहिमा राबवत आहेत. मात्र, नवीन कोब्रा बटालियनच्या स्थापनेमुळे या कारवायांना अधिक गती आणि ताकद मिळेल.” 

देशात नक्षलवाद आणि ईशान्य भारतातील बंडखोरी शिगेला असताना कोब्रा बटालियनची स्थापना 2008-09 मध्ये झाली होती. 2011 पर्यंत सीआरपीएफने 10 कोब्रा बटालियन तयार केल्या होत्या. जम्मू-काश्मीरसाठी स्थापन होणारी ही 11वी बटालियन असेल. ही बटालियन विशेषतः जंगल युद्ध आणि गनिमी तंत्रात पारंगत आहे. या कमांडोंना आधुनिक शस्त्रे, संदेशवहन यंत्रणा आणि टेहळणी उपकरणे पुरवली जातात. याशिवाय, तरुण जवान आणि कमांडर यांच्या समावेशामुळे ही बटालियन अधिक चपळ आणि प्रभावी बनते. 

सीआरपीएफसमोर तरुण अधिकाऱ्यांची कमतरता हा एक सततचा प्रश्न आहे. पण कोब्रा बटालियनसाठी विशेष प्रयत्न केले जातात. 

सध्या कोब्रा बटालियनच्या बहुतांश तुकड्या छत्तीसगडसह इतर नक्षलग्रस्त भागात कार्यरत आहेत. केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद पूर्णपणे संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कोब्रा बटालियनच्या स्थापनेत आयपीएस अधिकारी के. दुर्गा प्रसाद यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी आंध्र प्रदेशच्या ‘ग्रेहाउंड्स’ या नक्षलविरोधी विशेष पथकातील अनुभवाचा उपयोग करून ही बटालियन उभी केली. प्रसाद यांनी नंतर विशेष संरक्षण गटाचे (एसपीजी) संचालक आणि सीआरपीएफचे महासंचालक म्हणूनही सेवा दिली.

सीआरपीएफची स्थापना 27 जुलै 1939 रोजी नीमच येथे ‘क्राउन रिप्रेझेंटेटिव्ह्ज पोलीस’ (सीआरपी) म्हणून झाली होती. स्वातंत्र्यानंतर 1949 मध्ये पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या दलाचे नाव बदलून ‘केंद्रीय राखीव पोलीस दल’ (सीआरपीएफ) केले. आज 3.25 लाख जवानांसह हे जगातील सर्वात मोठे अर्धसैनिक दल आहे. नीमच हे सीआरपीएफचे जन्मस्थान मानले जाते.

जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर कोब्रा बटालियनची स्थापना हा एक महत्त्वाचा निर्णय आहे. यामुळे स्थानिक पोलिस आणि इतर सुरक्षा दलांना बळ मिळेल आणि जंगल-डोंगराळ भागात दहशतवाद्यांविरुद्ध अचूक कारवाया करणे शक्य होईल.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter