दल सरोवरात पहलगाम हल्ल्याचा निषेध करताना शिकारा चालक.
काश्मीरच्या दल सरोवर येथे काल पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली देण्यासाठी शिकारा चालकांनी जलप्रदर्शन केलं.
शिकारा चालकांनी हातात फलक घेऊन या हल्ल्याचा निषेध केला. या फलकांवर लिहले होते ‘पर्यटक आमचे पाहुणे आहेत’ निष्पाप लोकांची हत्या थांबवा”. या प्रदर्शनातून कश्मीरी नागरिकांचा राग आणि दुख: व्यक्त झालं.
दल सरोवर कश्मीरच्या सौंदर्याचं आणि शांततेचं प्रतीक आहे. याच तलावावर शिकारा चालकांनी निषेध करताना त्यांची भूमिका मांडली. शिकारा चालक अल्ताफ हुसैन यांनी भावूक होत सांगितलं, “हे पर्यटक आमच्या संस्कृतीला, आमच्या भूमीला जाणून घेण्यासाठी आले होते. त्यांचं स्वागत करणं ही आमची जबाबदारी होती. त्यांची हत्या आमच्या मनावर घाव आहे. आम्ही या हल्ल्यात जीव गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करतो. काश्मीरला शांततेची आणि पर्यटनाची भूमी म्हणून पुन्हा उभं करण्याची आमची इच्छा आहे.” शिकाऱ्यांनी केवळ मृतांना श्रद्धांजली वाहिली नाही, तर दहशतवादाविरुद्ध एकजुटीचं प्रदर्शन केलं.
कश्मीरचं पर्यटन हा स्थानिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे. २०२४ मध्ये २.३६ कोटी पर्यटकांनी कश्मीरला भेट दिली. यात ६५, ००० परदेशी पर्यटकांचा समावेश होता. यामध्ये गुलमर्गने एकट्याने १०३ कोटी रुपयांचा महसूल कमावला. या पर्यटणावर 2.5 लाख कश्मीरी कुटुंबांचं जीवन अवलंबून आहे. शिकारा चालक, हॉटेल कर्मचारी, टॅक्सी चालक, मार्गदर्शक आणि छोटे व्यापारी यांचा उदरनिर्वाह पर्यटकांवर अवलंबून आहे. या हल्ल्यामुळे पर्यटकांनी बुकिंग रद्द केली आहे.
पहलगाम हल्ल्याने कश्मीर हादरलं असून या हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी संपूर्ण कश्मीर बंद ठेवण्यात आलं. श्रीनगर, बारामुला, सोपोर, कुपवाडा येथे निषेध मोर्चे निघाले. हजारो लोकांनी कॅन्डल मार्च काढून मृतांना श्रद्धांजलि वाहिली. मशिदींच्या लाऊडस्पीकरवरून बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन झालं. या निषेध मोर्चामध्ये हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.