'एकात्मता यात्रे'तील काश्मिरानुभव'

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 Months ago
Kashmir School Students
Kashmir School Students

 

संतोष फरांदे, पुणे 
 
पुण्यातील ‘राष्ट्रीय सेवा योजने’च्या पथकाने‘ राष्ट्रीय एकात्मता यात्रा’ या उपक्रमांतर्गत जम्मू-काश्मीरचा दौरा केला. तेथे विविध शाळांमध्ये विज्ञानाच्या कार्यशाळा घेतल्या. या दौऱ्यात घेतलेल्या अनुभवांची नोंद.

फर्ग्युसन कॉलेजचा ‘राष्ट्रीय सेवा योजना विभाग’ २०१६ पासून दरवर्षी ईशान्येकडील राज्यांमध्ये राष्ट्रीय यात्रा आयोजित करत आहे. पण यावर्षी २०२४ मध्ये आपल्या ‘पृथ्वीवरील नंदनवन’ अशा जम्मू-काश्मीरची निवड करण्यात आली. दहशतवादी कृत्यांबाबत तिथे निर्माण झालेल्या स्थितीविषयी वाचायला मिळत असे.

त्यामुळे मनात अस्वस्थता होती; पण पक्कं ठरवलं होतं की, काहीही झालं तरी ‘राष्ट्रीय एकात्मता यात्रे’साठी जम्मू-काश्मीरलाच जायचे. आम्ही तिथे ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’अंतर्गत माध्यमिक शाळेतील इयत्ता सहा ते आठच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाच्या कार्यशाळा आयोजित करण्यासाठी जाणार होतो. यासाठी आमच्या राष्ट्रीय एकात्मता यात्रेचे मुख्य भागीदार ‘लेंड अ हँड इंडिया’कडून कार्यशाळा कशी घ्यायची, याचे दोन दिवसांचे प्रशिक्षण मिळाले होते.

तेथील स्थानिक काश्मिरी आणि जम्मूतील लोकांना विनंती केली की, आम्ही १४ दिवसांसाठी आपल्याकडे राहण्यासाठी येत आहोत. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. राष्ट्रीय सेवा योजनेचे एकूण २१ विद्यार्थी- विद्यार्थिनी आणि तीन शिक्षक अशी आमची ‘टॉप २४’ टीम तयार झाली. जम्मू ते श्रीनगर प्रवासादरम्यान भारत सरकार जम्मू-काश्मीरमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी करत असलेल्या कामाचे ठिकठिकाणी दर्शन घडले.

मोठमोठ्या डोंगरांच्या, पर्वतांच्या मधोमध खोल दऱ्यांमधून, नद्यांमधून मोठमोठे खांब उभे करून त्यातून रस्ते, कित्येक किमीचे बोगदे, पूल तयार होत आहे. श्रीनगरला पोहोचताच आम्ही चार गटांत विभागलो. एक गट कुपवाडा, एक गट बडगाम आणि दोन गट श्रीनगर शहरात पाठवण्यात आले.

आप कौन है?

नायब राज्यपालांचे पत्र नसल्याने सुरवातीला अडथळा निर्माण झाला. ऐंशी शाळांमध्ये शैक्षणिक कार्यशाळा घेण्याचे उद्दिष्ट घेऊन आम्ही गेलो होतो. शाळांच्या गेटवरील सुरक्षारक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य आणि शिक्षक, ‘‘आप कौन है?, आप कहॉँ से आये है, क्या चाहिये?’’ असे अनेक प्रश्न विचारत असत. अशावेळी स्थानिक मित्रांच्यामुळे व त्यांच्या ओळखीमुळे शाळांमध्ये प्रवेश मिळणे शक्य झाले.

बडगाममध्ये अबरार भट, कुपवाडामध्ये दानिश अहद, श्रीनगरमध्ये ‘युवा सोच, युवा भारत’ तसेच जम्मूमध्ये पलोडा संचिता बक्षी, उधमपूरमध्ये ‘युवा सोच युवा भारत’ यांचे सहकार्य मिळाले. शाळेचे कर्मचारी सुरुवातीला संशयी नजरेने पाहत असत; परंतु भेटीचा उद्देश कळला की, ते हसतमुखाने स्वागत करीत. तिथल्या मुली हुशार आहेत.

एक वेळ मुलं उत्तर द्यायला, बोलायला लाजतील; परंतु मुली लाजत नव्हत्या. तिथल्या विद्यार्थ्यांना गरज आहे ती योग्य मार्गदर्शनाची, अद्ययावत शिक्षणाची, नवनवीन शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याची. तेथील मुलींना मोठे होऊन डॉक्टर, इंजिनियर, सनदी अधिकारी, पोलिय अधिकारी होण्याची मनीषा आहे.

आमच्या राष्ट्रीय एकात्मता यात्रेतील कुपवाडा येथील एक गट, श्रीनगरमधील दोन आणि बडगाम येथील एका गटाने मिळून एकूण ४० शाळांमध्ये सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पर्यावरण, भूगोल, जीवशास्त्र, प्राणीशास्त्र आणि गणित या विषयांवर कार्यशाळा घेतल्या. कार्यशाळेच्या माध्यमातून ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’ अंतर्गत ४००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा एक आगळावेगळा विक्रम केला.

बडगाममध्ये आमचा पाच जणांचा ग्रुप अब्रार भाई यांच्या घरी राहिला. त्यांच्या घराच्या लगतच समोर मशीद होती आणि पहाटे ३:२५ वाजता अजान ऐकू यायची, तर आम्ही सकाळी ६.०० वाजता मराठी भावगीते, भक्तिगीतही ऐकायचो; परंतु यामुळे एकमेकांना कोणतीही समस्या नव्हती. आम्ही एकमेकांच्या धार्मिक श्रद्धा, चालीरीती, परंपरांचा आदर करत असू. त्यांनी आमचे उत्तम आदरातिथ्य केले. महाराष्ट्रातून आम्ही नेलेल्या पदार्थांचा त्यांनीही आवडीने आस्वाद घेतला.

जम्मूतील पलोदा या ठिकाणी आमच्या कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजनेची माजी विद्यार्थी असलेल्या संचिता बक्षीच्या घरी आम्ही तीन दिवस राहिलो. त्यांनी आमची खूप चांगली काळजी घेतली. काश्मिरी पदार्थ मोठ्या प्रेमाने खाऊ घातले. आमचे तिथले आजोबा म्हणायचे की, ‘तुम्ही आमचे पाहुणे आहात आणि पाहुणे हे देवाचे रूप आहेत. स्वतःचे घर समजा. वसुधैव कुटुंबकम्. आपण सर्व एक आहोत’ असे तेथील बक्षी दादाजी म्हणत होते.

काश्मीर म्हणजे निसर्गाचा चमत्कार. भारतातूनच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यांतून अनेक पर्यटक या ठिकाणी निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी येतात. त्यामुळे येथील अर्थव्यवस्थेला भक्कम आधार व चालना मिळतो. राज्याच्या आर्थिक प्रगतीला हातभार लागतो आहे.

जसे की घोडेस्वार, प्रवासी कंपन्या, पर्यटन गाड्या, हॉटेल्स, मार्केट, पारंपरिक वस्तू विकणारे विक्रेते, हस्तकला निर्मित वस्तू, त्यांना व्यवसाय व रोजगार मिळतो. पर्यटन हाच येथील रोजगाराचा उत्पन्नाचा, प्रमुख स्त्रोत आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा सोनेरी मुकुट (सोने का सरताज) आहे, आणि याचमुळे पाकिस्तानचा त्यावर डोळा आहे.

आपली खरी ताकद ही आपले पायदळ, नौसेना, वायुसेना, मजबूत लोकशाही व भक्कम केंद्र सरकार, आपला परस्पर बंधुभाव, विविधतेतील एकता ही आहे. आपल्यासाठी राष्ट्र प्रथम आहे. सर्व कारणामुळेच जम्मू-काश्मीर आपल्या ताब्यात घेण्याचे शेजाऱ्यांचे स्वप्न स्वप्नच राहणार आहे.

राष्ट्रीय एकात्मता यात्रेच्या काळामध्ये आम्ही ज्यांच्याकडे राहिलो व पाहुणचार घेतला ते स्थानिक कश्मीरी यजमान, ज्यांच्याकडे आम्ही जेवण केले ते हॉटेलचे मालक, स्थानिक कारचालक, मालक यांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर, ते म्हणतात की केंद्र सरकारमुळे ‘यहाँ अब शांती और अमन है’ अब सब सुरक्षित आहे! सबको आजादी है!

ही परिस्थिती बदलण्यात आपले लष्कर, राज्य राखीव पोलिस दल, सीमा सुरक्षा दलाचे जवान, जम्मू काश्मीर पोलिस विभागाला त्यांच्या शौर्याला, साहसाला आणि त्यागाला आपण सलाम केला पाहिजे. त्यांच्यामुळेच आपण आपल्या नंदनवनाचे संरक्षण करू शकतो.

जम्मू-काश्मीरच्या राष्ट्रीय एकात्मता यात्रेतून आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. या प्रवासातून आम्ही शिकलो की आपण जरी रंग, रूप, वेश, भाषा, खानपान, रितीरिवाज, प्रांत, धर्म, यात भिन्न असलो तरी सुद्धा आपण सर्वजण एक आहोत. आपण भारतीय आहोत. आपल्यात विविधतेमध्ये एकता आहे आणि हीच खरी आपली ताकद.

- संतोष फरांदे,
(सहयोगी प्राध्यापक)
 

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter