नवी दिल्ली, २६ जानेवारी २०२५
दिल्लीतील कर्तव्यपथावर आज ७६वा प्रजासत्ताक दिन विविधतेचे जिवंत चित्र आणि भारताच्या लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन म्हणून साजरा करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियंतो या सोहळ्याचे मुख्य अतिथी होते. भारतीय लोकशाहीच्या दृढतेचे, समृद्ध वारशाचे आणि प्रगतीच्या दिशेने होणाऱ्या प्रयत्नांचे शानदार चित्रण या कार्यक्रमातून झाले.
सोहळ्याची सुरुवात:
सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर वीरांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात केली. राष्ट्रपती मुर्मू यांनी तिरंगा फडकावून आणि २१ तोफांच्या सलामीने परेडची सुरूवात झाली. सकाळी १०:३० वाजता ही भव्य परेड कर्तव्यपथावर सुरू झाली.
सांस्कृतिक आणि लष्करी प्रदर्शन:
या वर्षीच्या परेडचे विशेष महत्त्व होते, कारण यावर्षी भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांचा जयंतीसमारंभ साजरा करण्यात आला होता. यावर्षीच्या परेडचे थीम होते - 'स्वर्णिम भारत: वारसा आणि विकास'. कर्तव्यपथावर एकूण ३१ चित्ररथ सादर करण्यात आले, ज्यात १६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे तर १५ केंद्रीय मंत्रालयांचे होते. यात भारताच्या सांस्कृतिक वारस्यापासून ते आधुनिक विकासाच्या प्रगतीपर्यंतचा प्रवास दर्शविण्यात आला.
उत्तर प्रदेशाच्या चित्ररथात महाकुंभाचे चित्रण करण्यात आले होते, जे सामाजिक सौहार्द आणि आध्यात्मिक एकात्मतेचे प्रतीक आहे. हरियाणाच्या चित्ररथात महाभारतातील दृश्ये साकारण्यात आली होती, ज्यामध्ये भारतीय महाकाव्यातील शाश्वत मूल्ये दर्शविण्यात आली होती. तर संस्कृती मंत्रालयाच्या चित्ररथात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बी.आर. आंबेडकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली होती, ज्यामध्ये सामाजिक न्याय आणि समतेच्या दिशेने देशाची वचनबद्धता दर्शविण्यात आली होती.
लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन:
भारतीय लष्कराने ब्रह्मोस क्षेपणास्त्र, पिनाका रॉकेट सिस्टीम यांसारख्या आधुनिक संरक्षण प्रणालींचे प्रदर्शन केले, ज्यामुळे स्वावलंबी संरक्षण व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले. पहिल्यांदाच लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या एकत्रित सामर्थ्याचे दर्शन घडवणारा त्रिसेवा चित्ररथ परेडमध्ये सादर करण्यात आला.
डेरडेव्हिल्स आणि हवाई प्रदर्शन:
कॉर्प्स ऑफ सिग्नल्सच्या ‘डेरडेव्हिल्स’ मोटरसायकल प्रदर्शन संघाने त्याच्या कौशल्यपूर्ण कसरतींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. तसेच, भारतीय वायुदलाच्या ४० विमानांनी कर्तव्यपथाच्या आकाशाला विविध रंगांनी रंगवले. या हवाई प्रदर्शनात मिग-१७, सुखोई, आणि राफेलसारख्या विमानांनी भारताच्या हवाई सामर्थ्याचे प्रतिक दाखवले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त काय म्हणाले पंतप्रधान मोदी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यां विविधता आणि एकतेला भारताच्या सामर्थ्याचा पाया म्हटले. "आपली विविधता हे आपले सर्वात मोठे सामर्थ्य आहे," असे सांगत त्यांनी भारताच्या सांस्कृतिक कार्यक्रमांत ५,००० हून अधिक कलाकारांच्या सहभागाचे कौतुक केले. त्यांनी भारताच्या तंत्रज्ञान आणि नवोन्मेषामध्ये झालेल्या प्रगतीवर भर दिला आणि भारताला ‘विश्वगुरू’ बनवण्यासाठीच्या संकल्पाची पुनरावृत्ती केली.
मोदींनी सांप्रदायिक सौहार्दाचे महत्त्व अधोरेखित केले आणि घटनेत अंतर्भूत मूल्यांनुसार शांती व सहकार्य टिकवून ठेवण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. त्यांच्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले, "प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज आपण आपल्या गौरवशाली प्रजासत्ताकाची ७५वी साजरी करत आहोत. या प्रसंगी आपण त्या सर्व महान विभूतींना वंदन करू, ज्यांनी आपले संविधान तयार करून हे सुनिश्चित केले की आपली विकास यात्रा लोकशाही, प्रतिष्ठा आणि एकता यावर आधारित असेल."
जगाला दिसले भारताचे सामर्थ्य:
परेड केवळ लष्करी सामर्थ्याचेच नव्हे तर भारताच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीचेही प्रतिक होती. विविध राज्यांच्या चित्ररथांनी ‘लखपती दीदी’ सारख्या महिलांना सक्षम बनवणाऱ्या योजनांपासून ‘स्वच्छ भारत’ अभियानापर्यंतच्या विविध उपक्रमांचे दर्शन घडवले. या चित्ररथांनी समावेशक विकास आणि शाश्वत प्रगतीच्या दिशेने भारताच्या बांधिलकीला अधोरेखित केले.
इंडोनेशियन तुकडीच्या सहभागामुळे आंतरराष्ट्रीय संबंधांना नवा आयाम मिळाला. इंडोनेशियाचा सैन्य बँड आणि मार्चिंग तुकडीने यंदाच्या परेडमध्ये सहभाग घेतला, ज्यामुळे भारत-इंडोनेशियाच्या मैत्रीचे बंध दृढ झाले.
सांप्रदायिक सौहार्द आणि विविधता:
परेडमधील विविध पारंपरिक नृत्ये, संगीत, देवतांचे चित्रण आणि विविध सणांच्या सादरीकरणाने भारताच्या सांस्कृतिक विविधतेला न्याय दिला. एक स्पष्ट संदेश दिला गेला की, भारताचे खरे सामर्थ्य हे त्याच्या संस्कृती, धर्म आणि भाषांतील एकतेत आहे.
नारीशक्तीचे प्रदर्शन:
या वर्षीच्या परेडमध्ये तिन्ही दलातील महिला अधिकाऱ्यांनी तुकड्यांचे नेतृत्व केले, ज्यामुळे संरक्षण दलांमधील लिंग समानतेचा संदेश मिळाला. महिलांच्या राष्ट्रीय बांधणीतील योगदानाला अधोरेखित करत 'नारीशक्ती' या संकल्पनेवर भर देण्यात आला.
एकूणच, कर्तव्यपथावर ७६वा प्रजासत्ताक दिन सोहळा भारताच्या प्रगतीचा, लोकशाही मूल्यांचा आणि सांस्कृतिक विविधतेचा उत्सव ठरला. एकता आणि विविधतेतील सामर्थ्याचा हा उत्सव भारताला एक उज्वल भविष्याकडे नेणारा संदेश देणारा ठरला. त्यातून जगाला भारताच्या सामर्थ्याचे आणि विविधतेचे दर्शन घडले.