काश्मिरी राजकारण्यांचे दहशतवादाविरोधात खडे बोल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 11 h ago
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि  पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद गनी लोन
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद गनी लोन

 

"जनतेच्या सहकार्यानेच दहशतवादाचा पराभव होऊ शकतो, त्यामुळे सरकार दहशतवादाविरुद्धच्या जनतेच्या मोहिमेला आणखी बळकटी देईल." असे जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी सोमवारी बोलताना स्पष्ट केले. लोकांना दुरावणारे निर्णय टाळावेत, असा इशाराही यावेळी अब्दुल्ला यांनी दिला. 

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सभागृहात मांडण्यात आलेल्या ठरावावरील चर्चेचा समारोप करताना मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला  म्हणाले, “जनता आमच्यासोबत असेल तेव्हाच दहशतवाद किंवा अतिरेकीवाद संपेल. जनतेचा दहशतवादाविरुद्धचा रोष पाहता, योग्य पावले उचलली तर दहशतवाद संपवू शकतो.”

ते पुढे म्हणाले, “आम्हाला असे कोणतेच पाऊल उचलायचे नाही, जेणेकरून जनता आमच्यापासून दुरावेल. बंदुकीने दहशतवाद नियंत्रित होऊ शकत नाही. परंतु, लोकांचा पाठिंबा असेल तर दहशतवाद संपवता येईल. मला वाटत आहे आता ती वेळ आली आहे.” 

जम्मू-काश्मीरमधील मोठ्या प्रमाणात झालेल्या निषेधांचा संदर्भ देताना अब्दुल्ला म्हणाले की, "श्रीनगरमधील जामिया मस्जिदमध्ये  शुक्रवारच्या नमाजपूर्वी प्रथमच दोन मिनिटे मौन पाळण्यात आले. याचा अर्थ आपण समजू शकतो. आपण या बदलला अधिक मजबूत करू शकतो."

सज्जाद लोन यांची प्रतिक्रिया 
पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष सज्जाद गनी लोन यांनी सोमवारी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, "पहलगाममधील निष्पाप पर्यटकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने काश्मिरी जनतेला हादरून सोडले आहे. परंतु येथील लोक आता हिंसाचार सहन करणार नाहीत."

२२ एप्रिलला झालेल्या हल्ल्याचा निषेध करणाऱ्या जम्मू-काश्मीर विधानसभेच्या ठरावावर बोलताना लोन म्हणाले की, "लोकांना दंडात्मक कारवाईने मागे ढकलले जाऊ नये तर त्यांना सकारात्मकतेने सहभागी करून घेतले पाहिजे."

ते पुढे म्हणाले की, "जम्मू-काश्मीरच्या अनेक भागांतील हजारो लोक पर्यटनावर अवलंबून आहेत. असे हल्ले म्हणजे संपूर्ण पिढीच्या उपजीविकेवर हल्ला आहे. ३५ वर्षांनंतर आमच्या पाहुण्यांवरील हल्ल्याचा इतका स्पष्ट निषेध झाला आहे याबद्दल आम्ही देशाचे आभारी आहोत."

ते पुढे म्हणतात, “राजकारणापलीकडे जाऊन सांगतो, काश्मिरी समाजात एकेकाळी हिंसाचाराला काही प्रमाणात सामाजिक मान्यता होती. परंतु आता हे चित्र बदलत आहे. हिंसाचाराला वैध मानणाऱ्यांची संख्या सातत्याने घटत आहे.”

सज्जाद लोन यांच्या वडिलांचा उल्लेख
सज्जाद लोन यांचे वडील आणि हुर्रियत नेते अब्दुल गनी लोन हेही दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले होते. सज्जाद लोन म्हणाले की, "पहलगामच्या घटनेने काश्मिरी समाजात मोठा बदल घडवला. आज प्रत्येक गल्ली-मोहल्ल्यातून लोक हिंसाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत. काश्मिरी आता हिंसाचार स्वीकारायला तयार नाहीत. हिंसाचाराला सामाजिक मान्यता मिळण्याच्या युगाचा हा अंत आहे.”