रक्तपात थांबवा, तरच चर्चा - फारुख अब्दुल्ला

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 d ago
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला
नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला

 

‘जोपर्यंत जम्मू काश्‍मीरमधील रक्तपात थांबवला जात नाही, तोपर्यंत चर्चा होऊ शकत नाही,’ असा इशारा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानला दिला. दरम्यान, गंदरबल हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपविण्यात आला असून गृहमंत्री अमित शहा, नायब राज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे.

गंदरबल जिल्ह्यातील दहशतवादी हल्ल्यानंतर फारुख अब्दुल्ला यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘भारताने कोणते पाऊल उचलावे, हे मला ठाऊक नाही आणि ही बाब केंद्राच्या अखत्यारित आहे. आमच्यासाठी ही गंभीर समस्या असून ती अनेक वर्षांपासून सहन करत आहोत. मी त्यांना अनेकदा हल्ले थांबवण्याचे आवाहन करूनही त्यांच्या स्वभावात फरक झाला नाही. अशा स्थितीत चर्चा कशी होणार? एकीकडे तुम्ही आमच्या निष्पाप लोकांची हत्या करता आणि पुन्हा संवाद सुरू करण्याचे म्हणता? असे कसे चालेल. अगोदर हत्याकांड थांबवा.’

फारुख अब्दुल्ला यांनी हल्ला दुर्दैवी असल्याचे सांगत म्हणाले, असे हल्ले करून काश्‍मीरमध्ये त्यांच्या म्होरक्यांची सत्ता आणण्याचे मनसुबे असतील तर हा त्यांचा चुकीचा समज आहे. या नराधमांना काय मिळणार आहे? दहशतवाद्यांची घुसखोरी अनेक वर्षांपासून आम्ही पाहतोय. आम्ही या नेहमीच समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.

मी पाकिस्तानच्या शासनकर्त्यांना सांगू इच्छितो की, त्यांना भारताशी मैत्री हवी असेल तर त्यांनी हे कारस्थान थांबवावेत. काश्‍मीर पाकिस्तानचा कदापि होणार नाही. पाकिस्तानने काश्‍मीरच्या जनतेला शांततेत राहू द्यावे आणि सन्मान ठेवावा. त्यांनी आपल्या देशाच्या विकासासाठी लक्ष केंद्रित करायला हवे. आम्हाला शांततेत आणि सन्मानाने जगू द्या. आम्हाला विकास करू द्या. तुम्ही आणखी किती दिवस त्रास द्याल.

तुम्ही १९४७ मध्ये टोळ्या पाठवून आणि निर्दोष लोकांची हत्या करून सुरुवात केली. तुम्ही पाकिस्तानची निर्मिती करण्यात यशस्वी ठरलात का? तुम्ही ७५ वर्षांत यशस्वी झाला नाहीत तर आता कसे होणार? आम्ही गरिबी आणि बेरोजगारी संपुष्टात आणू इच्छित आहोत. दहशतवाद्यांच्या माध्यमातून हे साध्य करता येणार नाही.’

ते म्हणाले, या हल्ल्याचा परिणाम काश्मीरच्या जनतेवर थेट होणार आहे. या ठिकाणी रक्तपात सुरू राहिला तर आम्ही कसा विकास करू? हे थांबविण्याची वेळ आली आहे, अन्यथा नंतर त्याचे भयंकर परिणाम होतील.

टार्गेट किलींग

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटविल्यानंतर येथे दहशतवाद्यांकडून होणाऱ्या टार्गेट किंलिंगमध्ये वाढ झाली आहे. यात दहशतवाद्यांकडून प्रामुख्याने बाहेरील राज्यांतून आलेले मजूर. काश्मिरी पंडित आणि बिगरमुस्लिम प्रशासकीय कर्मचारी यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

२०२४

१८ आॅक्टोबर - शोपियाँ येथे अशोक चौहान या बिहारी मजुराची हत्या

२२ एप्रिल - राजौरी येथे महंमद रजाक याची हत्या

१७ एप्रिल - अनंतनाग येथे बिहारी मजूर राजू शाह याची हत्या

८ एप्रिल - शोपियाँ येथे कॅबचालक परमजीत सिंग याची हत्या

फेब्रुवारी - श्रीनगर येथे दोघांची गोळी घालून हत्या

२०२३

३० आॅक्टोबर - पुलवामा येथे उत्तर प्रदेशातील महेश या मजुराची हत्या

१८ जुलै - अनंतनाग येथे परराज्यातील दोन मजुरांवर गोळीबार दोघेही गंभीर जखमी

१३ जुलै - शोपियाँ येथे परराज्यातील तीन मजुरांवर गोळीबार, तिघेही गंभीर जखमी

२९ मे - अनंतनाग येथे उधमपूर येथील एका नागरिकाची हत्या

२६ फेब्रुवारी - पुलवामा येथे एका काश्मिरी पंडिताची हत्या

२०२२

२ जून - कुलगाम येथे मूळच्या राजस्थानातील एका बँक व्यवस्थापकाची हत्या

३१ मे - कुलगाम येथे रजनी बाला या काश्मिरी पंडित महिलेची हत्या

२५ मे - काश्मीरमधील दूरदर्शन कलाकार अमरिना भट यांची आणि त्यांच्या भाच्याची बडगाम येथे हत्या

१७ मे - बारामुल्ला येथील ग्रेनेड हल्ल्यात राजौरी येथील रणजित सिंह या नागरिकाचा मृत्यू

१२ मे - राहुल भट्ट या काश्मिरी पंडिताची बडगाम येथे तर रेयाज अहमद थोकर या पोलिस कर्मचाऱ्याची पुलवामा येथे हत्या

१५ एप्रिल - बारामुल्ला येथील सरपंच मंजूर अहमद बांगरू याची हत्या

२६ मार्च - बडगाम येथील विशेष पोलिस अधिकारी इश्फाक अहमद डार यांची हत्या

११ मार्च - कुलगाम येथील सरपंचाची हत्या

९ मार्च - पीडीपी पक्षाच्या एका सरपंचाची श्रीनगर येथे हत्या

२ मार्च - कुलगाम येथील पंचायत समिती सदस्य महंमद याकूब डार यांची हत्या

जम्मू काश्‍मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी घटनेचा निषेध करत प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, "सोनमर्ग भागात गगनगीर येथे स्थलांतरित मजुरांवर भ्याड हल्ला करण्यात आला. हे मजुर प्रकल्पावर काम करत होते. या निष्पाप लोकांच्या हत्येचा निषेध करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी आहे. जखमी लोक लवकरात लवकर बरे होवोत."

माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, "मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी गंदरबलच्या हल्ल्यास ‘दहशतवादी हल्ला’ म्हणण्याचे टाळले आहे. काश्‍मीरच्या गंदरबलच्या मजुराच्या हत्येचा तीव्र निषेध करते आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त करते."

नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी प्रतिक्रियेत म्हटले आहे की, "गगनगीरच्या नागरिकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. हल्ल्यामागे असलेल्या दोषी लोकांना सोडले जाणार नाही, याची मी खात्री देतो. आम्ही जम्मू काश्‍मीर पोलिस, लष्कर आणि सुरक्षा दलाला पूर्णपणे मोकळीक दिली आहे."