जम्मू आणि काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं आपलं संकल्प पत्र जाहीर केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. यामध्ये विविध योजनांसह काश्मिरी पंडितांच्या पुनर्वसन योजनेचाही समावेश आहे. त्याचबरोबर कलम ३७० बाबतही महत्वाचं विधान अमित शहा यांनी केलं आहे.
६००० लोकांचं होणार पुनर्वसन
जम्मू आणि काश्मीरमधून विस्थापित व्हावं लागलेल्या काश्मिरी पंडितांचं पुनर्वसन करणारी योजना अमित शहा यांनी जाहीर केली. ही योजना विस्तृत स्वरुपात असेल असं त्यांनी सांगितलं. यामध्ये ६००० विस्थापितांचं पुनर्वसन करण्यात येणार असून त्यांचं पूर्णपणे पुनर्वसन करण्यात येईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
दहशतवादानं इथं सर्वोच्च टोक गाठल्यानं इथल्या काश्मिरी पंडितांना आणि शीख समुदायाला आपल्या संपत्ती विकून इथून बाहेर पडण्यास भाग पडावं लागलं होतं. यासंदर्भात आम्ही काम सुरु केलं आहे. त्यानुसार, एकतर त्यांची संपत्ती परत केली जाईल किंवा या संपत्तीपोटी त्यांना रक्कम दिली जाईल. आम्ही ६,००० लोकांचं पुनर्वसन पूर्ण करण्यापर्यंत पोहोचलो आहोत, असंही यावेळी अमित शहांनी सांगितलं.
कलम ३७० परत येणार नाही
जम्मू आणि काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यावर अमित शहा म्हणाले, कलम ३७० हटवल्यानं राज्याचा विकास झाला असून ही विकासाची प्रक्रिया अजूनही सुरुच आहे. कलम ३७० आणि ३५ अ आता एका जमान्याची गोष्ट झालीए. आता हा आपल्या संविधानाचा भाग राहिलेला नाही. हे सर्वकाही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कणखर निर्णयामुळं होऊ शकलं. त्यामुळं कलम ३७० आता इतिहासात जमा झाला आहे. आम्ही हे कलम पुन्हा कधीही येऊ देणार नाही.
जम्मू-काश्मीरसाठी 'असा' आहे जाहीरनामा
-
प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ महिलेला वर्षाला १८,००० रुपये मिळणार
-
कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वर्षाला ३००० रुपये मिळणार
-
१० वीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींना लॅपटॉप अन् टॅबलेट मिळणार
-
उज्ज्वला योजनेंतर्गत वर्षाला २ सिलेंडर मोफत मिळणार
-
अटल आवास योजनेंतर्गत भूमिहिनांना 126 मीटर इतकी मोफत जमीन
-
JKPSC आणि UPSC च्या तयारीसाठी २ वर्षांपर्यंत १० हजार रुपये कोचिंग फीस
-
५ लाख लोकांना रोजगार देणार
-
दोडा, किश्तवाड, रामबन, राजौरी, पुंछ, उधमपूर आणि कठुआच्या वरचा भाग पर्यटनस्थळ म्हणून विकसित करणार
-
काश्मीर खोरं, गुलमर्ग तसंच पहलगामला मॉडर्न टुरिस्ट सिटी बनवणार
-
श्रीनगरमध्ये तवी रिव्हरफ्रन्ट प्रकल्प राबवणार
-
रणजीत सागर धरणपट्ट्यात तलाव विकास प्राधिकारण बनवणार
-
जम्मूमध्ये स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या रुपात आयटीहब बनवणार
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter