दहशतवाद्यांच्या निशाण्यावर जम्मू आणि काश्मीर

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 2 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गेल्या तीन वर्षांत राजौरी व पूंच जिल्ह्यात हल्ले घडविल्यानंतर दहशतवाद्यांनी आता आपला मोर्चा जम्मू विभागातील सहा जिल्ह्यांकडे वळविला आहे. यंदाच्या वर्षी या विभागात दहशतवादी कारवायांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून यात एकूण ४४ जणांचा मृत्यू झाला. यात १८ जवान व १३ दहशतवाद्यांचाही समावेश आहे. गेल्या काही वर्षांच्या तुलनेत २०२४ मध्ये राजौरी व पूंच जिल्ह्यांत दहशतवादी हल्ल्यात लक्षणीय घट झाली. मात्र, याच वर्षी एप्रिल-मे महिन्यांपासून जम्मूतील रेजसी, दोडा, किश्तवाड, कथुआ, उधमपूर आदी भागांत दहशतवाद्यांचे वाढते हल्ले हा सुरक्षा दलाच्या चिंतेचा विषय बनला आहे. या शांत प्रदेशात दहशतवाद पसरविण्याचा पाकस्थित हस्तकांचा प्रयत्न असून त्याचा सामना करण्यासाठी लष्कराने दुर्गम भागात, विशेषतः घनदाट जंगलात पोलिस व सीआरपीएफच्या मदतीने अथक मोहिमा राबविल्या जात आहेत. 

या वर्षी आत्तापर्यंत दहशतवादी हल्ल्यांत एकूण ४४ जणांचा मृत्यू झाला. यात १८ जवान, १३ दहशतवादी आणि १४ नागरिकांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, १४ नागरिकांत शिवखौरी मंदिरातून परतणारे सात यात्रेकरू व ग्राम संरक्षण दलाचे तिघे आहेत. यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यात बसचालकासह वाहकालाही प्राण गमवावे लागले होते.

दहशतवाद्यांनी लढताना जवानांनाही हौतात्म्य पत्करावे लागले. कधुआत सर्वाधिक सात जवान हुतात्मा झाले. नुकतेच अखनूर विभागात सुरक्षा दलांनी दिवसभर राबविलेल्या मोहिमेत तीन दहशतवाद्यांचा खातमा करण्यात आला. दोडात चार तर कथुआ, उधमपूर आणि राजौरीत प्रत्येकी दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. 

 
सुरक्षा दलांचा कमी झालेला बंदोबस्त दहशतवाद्यांच्या वाढलेल्या कारवायांमुळे पुन्हा वाढविण्यात आला आहे. या प्रदेशात दहशतवाद्यांची घुसखोरी रोखण्यासाठी विशेषतः सीमेवरील गावांत रात्रीची गस्त वाढविण्यात आली आहे. 'ऑपरेशन स‌द्भावना' अंतर्गत वैद्यकीय मदत शिबिरे व इतर उपक्रमांतून जनतेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.

राजौरीत दहशतवादी हल्ल्यांत २०२१ मध्ये १९. २०२२ मध्ये १४ आणि २०२३ मध्ये २८ जणांचा मृत्यू झाला. पूंचमध्ये २०२१ मध्ये १५, २०२२ मध्ये २४, २०२३ मध्ये २४ जणांनी प्राण गमावले.