"व्याप्त काश्मीरशिवाय जम्मू काश्मीर म्हणजेच भारत अपूर्ण आहे," असे प्रतिपादन आज संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अखनूर येथील लष्कराच्या एका कार्यक्रमात बोलताना केले. व्याप्त काश्मीर हे पाकिस्तानसाठी परकी भूमी आहे, या जमीनीचा वापर दहशतवादाचा प्रसार करण्यासाठी होत आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
अखनूर सेक्टरमध्ये तांडा आर्टिलरी ब्रिगेडच्या नवव्या आर्म्ड फोर्सेस वेटरंस डे कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उमर अब्दुल्लांचे कौतुक केले. सोनमर्ग बोगद्याच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केलेले असताना आज संरक्षणमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री अब्दुल्लांचे कौतुक केले.
दिल्ली आणि काश्मीरला भाजप सरकारकडून समान वागणूक दिली जाते, असे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. काश्मीर आणि अन्य राज्यांतील अंतर कमी करण्यासाठी उमर अब्दुल्ला प्रयत्न करत असल्याचे प्रतिपादन राजनाथ सिंह यांनी केले.
राजनाथ सिंह म्हणाले, १९६५ मध्ये अखनूरमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध झाले. भारताने पाकिस्तानच्या सैनिकांचे सर्व प्रयत्न हाणून पाडले. आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानला पराभूत केले.
पाककडून बेकायदा घुसखोरी
१९६५ पासूनच पाकिस्तानने बेकायदा घुसखोरीला आणि दहशतवाद्यांना प्रोत्साहन देण्यास प्रारंभ केला. मुस्लिम बांधवांनी दहशतवादाविरोधात लढताना प्राणाची बाजी दिली आहे. आज भारतात घुसखोरी करणाऱ्यांपैकी ८० टक्के दहशतवादी पाकिस्तानातून येतात. १९६५ मध्येच सीमेपलिकडचा दहशतवाद संपुष्टात आला असता, परंतु माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे सरकार युद्धात मिळवलेला सामरिक लाभाला राजनैतिक लाभात परावर्तित करण्यात असमर्थ ठरले.
जम्मू काश्मीर आणि देशातील अन्य भागातील अंतर कमी करण्यास आमचे प्राधान्य आहे. काश्मीर आणि देशाचा अन्य भागातील अंतर लवकरात लवकर कमी व्हावे आणि या दृष्टीने जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला प्रयत्न करत आहेत. या कार्यक्रमात बोलताना उमर अब्दुल्ला म्हणाले, ‘‘माजी जवानांनी देशासाठी सर्वस्व पणाला लावले. तुम्हीच लोकांनी आयुष्याची चिंता न करता देशाच्या सुरक्षेसाठी त्याग करण्याची तयारी केली. त्यामुळे आता तुमची सेवा करण्याची आमची जबाबदारी आहे.