जम्मू-कश्मीरमध्ये तब्बल दहा वर्षांनंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचे निरीक्षण करण्यासाठी १५ देशांचे राजनैतिक शिष्टमंडळ काश्मीरमध्ये दाखल झाले. या शिष्टमंडळामध्ये अमेरिका, नॉर्वे, फिलिपिन्स, अल्जेरिया, स्पेन कोरिया, रवांडा, अल्जेरिया, नायजेरिया, पनामा, सोमालिया, तांझानिया, गायाना, मेक्सिको, सिंगापूर आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या देशांचा समावेश आहे.
निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकांचा सहभाग जाणून घेण्यसाठी हे शिष्टमंडळ जम्मू-कश्मीरमध्ये आले आहे. पहिल्या टप्प्यात झालेल्या तब्बल ६१ टक्के मतदानमुळे येथील नागरिकांचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ झाल्याचे दिसून आले आहे. या पार्श्वभूमीवर परदेशी शिष्टमंडळाने दिलेली ही भेट भारतातील लोकशाहीच्या यशाचे प्रतीक मानले जात आहे.
ओम्पोरा (बुदगाम) मधील मतदान केंद्रांना भेट दिली, त्यानंतर त्यांनी लाळ चौक विधानसभा मतदारसंघातील अमीरा कादल आणि एसपी कॉलेज, चिनार बाग येथे थांबले.
या शिष्टमंडळाने एसपी कॉलेजमध्ये, प्रतिनिधींना विशेष गुलाबी मतदान केंद्रालाही भेटदिली. या गुलाबी केंद्रांची जबाबदारी पूर्णपणे महिलांनी सांभाळली आहे. शिष्टमंडळाने निवडणुकीच्या ठिकाणी भेट देऊन मतदानाची प्रक्रिया अनुभवली. जम्मू-कश्मीरमधील जनता लोकशाही उत्सवाचा आनंद घेत असून नागरिक त्यांचा लोकप्रतिनिधी उत्साहाने निवडत आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील मतदान बुधवार सकाळी ७ वाजता सुरू झाले असून यावेळी मतदान केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. २५.७८ लाख मतदार २३९ उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय घेणार आहेत.
जम्मू विभागातील पूंछ, राजौरी, रियासी आणि काश्मीरमधील श्रीनगर, बडगाम, गांदरबल या सहा जिल्ह्यांमध्ये एकूण ३,५०२ मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या टप्प्यात अनेक प्रमुख नेत्यांचे राजकीय भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे.
यामध्ये माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, जेकेपीसीसी प्रमुख तारीक हामिद कर्रा, भाजप अध्यक्ष रवींदर रैना, तसेच अनेक माजी मंत्री आणि पक्ष प्रमुखांचा समावेश आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान १ ऑक्टोबरला होणार असून मतमोजणी ८ ऑक्टोबरला होणार आहे.