जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी घेतली अमित शाह यांची भेट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 1 d ago
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री अब्दुल्ला आणि अमित शाह
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री अब्दुल्ला आणि अमित शाह

 

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी बुधवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आणि जम्मू-काश्मीरशी संबंधित 'महत्त्वाच्या बाबींवर' चर्चा केली. अशी माहिती नॅशनल कॉन्फरन्सने X वर ट्विट करत दिली.

मध्य काश्मीरच्या गंदरबलमध्ये रविवारी दहशतवादी हल्ला झाला. यात दहशतवाद्यांनी एका डॉक्टरसह सात जणांची निर्घृण हत्या केली. त्यांनतर लगेचच मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत विविध मुद्द्यांवर आणि जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याबाबत चर्चा केली. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ओमर यांचा हा पहिलाच  दिल्ली दौरा होता.

१७ ऑक्टोबरला ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील जम्मू आणि काश्मीर मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीत जम्मू आणि काश्मीर  राज्याचा दर्जा पुनर्स्थापित करण्याचा ठराव मंजूर केला.  लवकरच मुख्यमंत्री पंतप्रधानांसमोर जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करण्याचा ठराव सादर करतील.

५ ऑगस्ट २०१९ रोजी कलम ३७० आणि ३५A रद्द करण्यात आले होते. यामुळे जम्मू-काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभागणी झाली. नुकत्याच पार पडलेल्या जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीत NC ने विविध मुद्द्यांवर निवडणूक लढवली होती. त्यामधील सर्वात महत्वाचा मुद्दा होता, जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० परत लागू करणे आणि जम्मू कश्मीरला राज्याचा दर्जा बहाल करणे. ज्याची अंमलबजावणी पक्ष करत आहे.