जम्मू काश्मीर : लष्कराने घातले दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

Story by  आवाज़ मराठी | Published by  Pradnya Shinde • 8 d ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

गुप्तचर संस्था आणि जम्मू-काश्मीर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनंतर लष्कराने 8 सप्टेंबरच्या मध्यरात्री लाम आणि नौशेरा येथील नागरी भागात घुसखोरीविरोधी कारवाई सुरू केली होती.

यादरम्यान लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात युद्धसामुग्रीही जप्त करण्यात आली आहे. व्हाईट नाइट कॉर्प्सच्या म्हणण्यानुसार, ऑपरेशन अजूनही सुरू आहे.

जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत दहशतवादी मोठी घटना घडवण्याचा प्रयत्न करत असल्याची गुप्तचर माहिती मिळाली होती. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलांनी पाकिस्तानच्या सीमेवर आपल्या हालचाली वाढवल्या आहेत.

गुप्तचर संस्था आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी राजौरीतील नौशेरा सेक्टरमधील लाम भागात नियंत्रण रेषेवर घुसखोरीच्या प्रयत्नाबाबत भारतीय लष्कराला अलर्ट दिला होता. या इशाऱ्याच्या आधारे भारतीय लष्कराने या भागात कडक गस्त सुरू केली.

रविवार-सोमवारच्या मध्यरात्री काही दहशतवाद्यांनी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सुरक्षा दलांनी त्यांना आव्हान दिले. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले आहेत.

व्हाईट नाइट कॉर्प्सने दिलेल्या माहितीनुसार, घुसखोरीविरोधी कारवाईत ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांच्या ताब्यातून मोठ्या प्रमाणात दारूगोळा जप्त करण्यात आला आहे. त्याचे अन्य साथीदारही या परिसरात लपून बसल्याची शक्यता आहे. यामुळे अद्यापही कारवाई सुरूच आहे. हे दोन दहशतवादी एवढा दारूगोळा कशासाठी घेऊन आले होते, याचाही शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.